29 January 2020

News Flash

मेंदूशी मैत्री : भीती

शाळेची भीती, काही वेळा विशिष्ट शिक्षकांची, कधी वर्गमित्रांचीही भीती वाटते.

प्रतिनिधिक छायाचित्र

श्रुती पानसे contact@shrutipanse.com

लहान मुलांपासून मोठय़ा माणसांपर्यंत प्रत्येकाला कशाची ना कशाची भीती असते. मोठय़ा माणसांना आपल्याला कशाची भीती वाटते आहे, हे समजतं. त्यांचे ते मार्ग काढू शकतात. पण लहान, विशेषत: शालेय मुलांना भीती वाटते- भीती दाखवली जाते, ते त्यांना नेहमीच घरी येऊन सांगता येतं असं नाही.

शाळेची भीती, काही वेळा विशिष्ट शिक्षकांची, कधी वर्गमित्रांचीही भीती वाटते. कधी कधी कोणी कसली तरी धमकी दिलेली असते. कधी आक्रमक वर्तन केलेलं असतं. व्हॅनमध्ये हवी ती जागा पकडणं, विनाकारण दुसऱ्याच्या वस्तू पळवणं, वस्तू मुद्दाम दुसरीकडे ठेवून गोंधळात पाडणं किंवा मारहाण करणं, असे प्रकार होत असतात. शाळेत या प्रकारे कोणाला तरी भीती दाखवली जाते, हे शिक्षकांना किंवा मोठय़ा माणसांना नेहमीच कळत नाही. सगळं लपवून केलं जातं.

आपलं वागणं सहन केलं जातं आहे हे लक्षात आल्यावर पुन्हा पुन्हा त्रास दिला जातो. यामुळे मुलं अजूनच घाबरून जातात. काय करावं, हे त्यांना समजत नाही. पालकांना सांगितलं तर स्वत:ची बाजू ठामपणे मांडता आली पाहिजे. अजिबात घाबरायचं नाही, आमच्यापर्यंत तक्रारी येऊ  द्यायच्या नाहीत, असं जर पालकांनी सांगितलं तर मुलांना कसलाच आधार मिळत नाही.

काही एका मर्यादेपर्यंत आजच्याही काळात असं सांगणं हे योग्यच आहे. कारण प्रत्येकाला स्वत:ची लढाई अक्षरश: स्वत:च लढायची असते. मात्र, मुलांनी धीट व्हावं यासाठी आधीच प्रयत्न करणं हे वेगळं आणि मुलांना घाबरट म्हणून चिडवून मग त्याला धीट व्हायला सांगणं हे सर्वस्वी वेगळं. मूल अस्वस्थ असेल, काळजी करत असेल, दु:खी असेल वा घरातल्यांवर चिडचिड करत असेल, तर असं का होतं आहे हे समजून घेऊन त्यांच्या पाठीशी उभं राहावं, त्यांच्याशी स्पष्टपणे बोलावं.

त्यांचं बळ वाढवायला हवं. असे प्रश्न कसे सोडवायचे असतात, कोणत्या वेळेला कोणाची मदत मागायची असते, हे सांगायला हवं. त्याला एकटं आणि एकाकी वाटून उपयोग नाही. कारण यामुळे त्यांना योग्य मार्ग सापडणार नाही. जास्त काळ मूल याच अवस्थेत राहिलं, तर ते त्याच्या मानसिक आरोग्यासाठी चांगलं नाही.

 

First Published on August 16, 2019 4:21 am

Web Title: fear processing in the brain zws 70
Next Stories
1 कुतूहल – प्राचीन अणू
2 मेंदूशी मैत्री : स्पर्धाग्रस्त पालक
3 कुतूहल – सापेक्षतावादाची भाषा