News Flash

कुतूहल : गॅलिअम

कोंबडय़ाला लॅटिनमध्ये ‘गॅलस’ म्हणतात, त्यावरून ‘गॅलिअम’ हे नाव दिलं असावं.

गॅलिअम – ३१व्या क्रमांकाचे मूलद्रव्य. मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीनुसार ४थ्या आवर्तातील १३व्या गणात त्याला स्थान दिलं गेलंय. शुद्ध असताना रंग चांदीसारखा चमकदार! या गणातील अ‍ॅल्युमिनिअम, इंडिअम, थॅलिअम धातूंप्रमाणे गॅलिअमदेखील हलका धातू आहे.

१८७५ मध्ये फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ पॉल-एमिल लिकॉक दी बॉईसबॉड्रन (Paul-Emile Lecoq de Boisbaudran)  यांना  स्फॅलेराइट या खनिजाच्या वर्णपटात गॅलिअमचं अस्तित्व दिसलं. नंतर विद्युतविघटनाने हा धातू वेगळा मिळवण्यातही त्यांना यश आलं. फ्रान्समधील गॉल हे त्यांचं गाव. त्यावरून त्याला नाव दिलं ‘गॅलिया’ आणि त्यावरून ‘गॅलिअम’. पण काहीना असं वाटतं की, हे मूलद्रव्य शोधणाऱ्या लिकॉकने स्वत:च्या नावावरून ‘गॅलिअम’ नाव दिलं.  लिकॉकचा अर्थ होतो कोंबडा. कोंबडय़ाला लॅटिनमध्ये ‘गॅलस’ म्हणतात, त्यावरून ‘गॅलिअम’ हे नाव दिलं असावं.

अचंबित करणारी गोष्ट म्हणजे मेंडेलिव्हनी ‘इका-अल्युमिनिअम’च्या गुणधर्मासंबंधित केलेलं भाकीत आणि गॅलिअम धातूचे प्रत्यक्षातील जवळपास तसेच असणारे गुणधर्म!

सोबतच्या तक्त्यावरून मेंडेलिव्हनी अचूकतेच्या किती जवळ जाणारं भाकीत सांगितलं होतं, याची कल्पना येईल.

मेंडेलिव्हनी वर्तवल्याप्रमाणे गॅलिअम धातू आम्लात तसंच अल्कलीतही विरघळतो. सामान्यत: गॅलिअम अ‍ॅल्युमिनिअमसारखा उभयधर्मी आहे. गॅलिअम हा कोरडय़ा हवेत स्थिर असतो. दमट हवेत मात्र ऑक्सिजनचा परिणाम होऊन गॅलिअमच्या पृष्ठभागावर ऑक्साइडचा पातळ थर बनतो, पण जास्त विक्रिया होत नाही.

गॅलियमची माहीत असलेली   Ga-५६ ते Ga-८६  अशी ३१ समस्थानिकं आहेत. त्यापैकी GaGa-६९व Ga-७१ ही स्थिर आहेत. बाकीची किरणोत्सारी आहेत. नैसर्गिकरीत्या मिळणाऱ्या गॅलियमपैकी  Ga-६९चं प्रमाण जास्त म्हणजे ६०.१% आहे. तर Ga-७१चं प्रमाण ३९.९% आहे. बाकीच्या किरणोत्सारी समस्थानिकांपैकी Ga-६७  (अर्धआयुष्य काळ  ३.२६१ दिवस) व Ga-६८ (अर्धआयुष्य काळ  ६७.७ मिनिटं) ही समस्थानिकं त्यातल्या त्यात जास्त काळ राहणारी आहेत.

चारुशीला सतीश जुईकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 6:04 am

Web Title: gallium chemical element
Next Stories
1 जे आले ते रमले.. : राजपूत पठाण
2 कुतूहल- आहारातील जस्ताचे महत्त्व
3 जे आले ते रमले.. : नजीब खान रोहिला
Just Now!
X