News Flash

स्पर्श महत्त्वाचा!

घरात लहान बाळ असेल तर ते सतत ‘उद्योग’ करत असतं. पसारा करत असतं.

घरात लहान बाळ असेल तर ते सतत ‘उद्योग’ करत असतं. पसारा करत असतं. एखादी वस्तू घ्यायची आणि ती दुसरीकडेच नेऊन ठेवायची, हे सारखंच चालू असतं. या जीवाला जराही आराम नसतो. असं का होत असेल?

याचं कारण आहे – मूल सतत वस्तू हाताळून आणि कामात राहून अनुभव गोळा करत असतं. हे अनुभव त्याच्या मेंदूसाठी फार आवश्यक असतात. तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू हाताळण्याने त्वचेला जी संवेदना मिळते, त्यातली प्रत्येक संवेदना मेंदूपर्यंत पोहचून सिनॅप्स तयार करण्याचं काम करते. ही प्रक्रिया सातत्याने चालू असते. त्वचेला होणाऱ्या विविध स्पर्शाच्या संवेदना या फार महत्त्वाच्या असतात.

एक तास वयाच्या बाळालाही थंडी वाजली तर ते रडतं. दुपटं ओलं झालं तर रडतं. कारण त्वचेला या स्पर्श संवेदना कळतात. त्वचा हे मेंदूला कळवते. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून बाळ रडतं. या उलट मायेचा उबदार स्पर्शही कळतो. ओळखीच्या स्पर्शाने ती रडायची थांबतात.

बाळं रांगायला लागली की,  दिसेल त्या वस्तूंना हात लावतात. एखाद्या वस्तूच्या दिशेने जोरदार रांगत जातात. कधी एकदा ती वस्तू हातात घेईन असं त्याला झालेलं असतं. एकदा का ती वस्तू हातात घेतली की बरं वाटतं. जेव्हा रांगता रांगता एखादी वस्तू दिसते, तेव्हा आधी मूल त्याला हात लावून बघतं. फरशीवरचा बारीकसा खड्डा, एखादी फट, मुंगी, लहानसा कण यातलं काहीही त्यांच्या नजरेतून सुटत नाही. त्या वस्तूला हात लावायचाच असतो. वस्तू हलते आहे का? ती आपल्या हातात येईल का? तिचा स्पर्श कसा आहे? अशा प्रश्नांची उत्तरं हवी असतात. वस्तू हाताला लागली, तिचा स्पर्श कळला, की कुतूहल शमतं. काही प्रश्नांची उत्तरं कळतात. या उत्तरांमुळे बाळांच्या मेंदूला ज्ञान मिळतं. नवीन माहिती मिळवण्यासाठी पहिल्या पाच वर्षांतली मुलं अक्षरश: हपापलेली असतात. मॉंटेसरी मॅडमच्या शब्दात सांगायचं तर, अक्षरश: स्पंजसारखी. त्यांना मिळेल ती सर्व माहिती शोषून घ्यायची असते.

त्वचा हेच काम आयुष्यभर करत राहते. तांदूळ शिजला आहे हा संदेश त्वचेमार्फत पोचवला जातो. किंवा तळपायाच्या अंगठय़ावर डास बसलेला आहे, ही माहिती मिळाल्यावर डास हाकलण्याचं काम हात करतो, तेही अध्र्या क्षणात!

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 12:12 am

Web Title: human brain facts and functions 2
Next Stories
1 शिसे आणि रोमन साम्राज्य!
2 लग्नघर
3 लोहयुग
Just Now!
X