पूर्वापार वापरात असलेली ही प्रक्रिया सुती कापडाच्या प्रक्रियेतील महत्त्वाची प्रक्रिया आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ही प्रक्रिया सुताकरिता तसेच कापडाकरिता केली जाते. सुताची प्रक्रिया कापडाच्या प्रक्रियेपेक्षा थोडी महाग असते. त्यामुळे बहुतेक वेळा कापडावरच मर्सरायिझग करण्याला प्राधान्य दिले जाते. कापडावर ही प्रक्रिया करताना कापडाची धुलाई झाल्यावर ब्लीचिंगपूर्वी किंवा ब्लीचिंगनंतर प्रक्रिया केली जाते. प्रक्रियेचा क्रम कोणता असावा हे त्या कापडाचा अंतिम वापर कशासाठी केला जाणार आहे, त्यावरून ठरवले जाते. कापड उद्योगातील विकेंद्री क्षेत्रात मर्सरायिझग ब्लीचिंगच्या आधी केले जाते, त्यामुळे खर्च थोडा कमी येतो. पण एकत्रित कापड गिरणीत तसेच नामांकित उत्पादकांकडे मर्सरायिझग प्रक्रिया ब्लीचिंगनंतर केली जाते.
कापडाचा आकार एकसारखा राहण्यासाठी, कापडाची असलेली चमक वाढवण्यासाठी किंवा चमक आणण्यासाठी, तसेच कापड रंगवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मर्सरायिझग प्रक्रिया केली जाते. याद्वारे कापडाची ताकदही काही प्रमाणात वाढते. ह्य़ा पद्धतीत रासायनिक आणि यांत्रिक अशा दोन्ही प्रक्रियांचा वापर केला जातो. दोन्हीला तितकेच महत्त्व आहे. प्रथम रासायनिक प्रक्रिया केली जाते, त्या वेळी कापड आटते. हे आटलेले कापड पुन्हा दोन्ही दिशेने ताण देऊन पूर्वपदावर आणले जाते. रासायनिक पद्धतीत नेहमी वापरले जाणारे रसायन म्हणजे कॉस्टिक सोडा. मर्सरायिझग करताना कॉस्टिक सोडय़ाच्या द्रावणाची तीव्रता, तापमान आणि प्रक्रियेचा कालावधी या तीनही बाबी तितक्याच महत्त्त्वाच्या आहेत. त्यामुळे मर्सरायिझग करण्यासाठी विशिष्ट यंत्राचा वापर केला जातो. ही यंत्रे तीन प्रकारची असतात. ज्या कापडाचे मर्सरायिझग करावयाचे त्यानुसार यंत्राची निवड केली जाते. कापडाचा वापर कशासाठी केला जाणार आहे हा घटकही यंत्राची निवड करताना लक्षात घेतात.
प्रथम कापड कॉस्टिक सोडय़ाच्या द्रावणात बुडवले जाते. तिथे होणारी प्रक्रिया आणि तिचा कालावधी याची आधी निश्चिती केलेली असते. नंतर स्थिरीकरण करून कापड ताणण्याचे काम केले जाते. ते झाल्यावर कापड पुन्हा धुऊन घेतात, जेणेकरून ते उदासीन होईल. त्यामध्ये कॉस्टिक सोडय़ाचा अंश राहणार नाही. मग ते कापड वाळवले जाते. या प्रक्रियेत सुताच्या बाहेर डोकावणारे तंतू सुताबरोबर चिकटून बसतात. त्यावर एक प्रकारचा पातळ थर बसतो. त्यामुळे कापडाला तजेलदारपणा आणि एकसारखेपणा येतो.

 

– सतीश दिंडे (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

 

 

संस्थानांची बखर

भोर संस्थानचा कारभार

भोर संस्थानाचे संस्थापक शंकराजी देशपांडे यांनी आत्महत्या केल्यावर शाहूने त्याचा अज्ञान, अल्पवयीन पुत्र नारोपंतास सचिवपदाची वस्त्रे देऊन त्याची आई आणि मुतालीक यांच्याकडे संयुक्तपणे राज्यकारभार सोपविला. नारोपंत निपुत्रिक असल्याने त्याचा दत्तकपुत्र चिमणाजी नारायण हा गादीवर आला. पेशव्यांनी याला तुंगतिकोना किल्ला देऊन त्याच्याकडून सिंहगड किल्ला घेतला.
भोरच्या पुढील राज्यकर्त्यांपकी पंतसचिव चिमणाजी शंकर यांची कारकीर्द बरीच खळबळजनक झाली. त्यांच्या कारकीर्दीत सातारा दरबार आणि पुण्याचे पेशवे यांना पंतसचिवांनी देण्याचा मोठय़ा रकमेचा भरणा बाकी होता. त्यासाठी चिमणाजींनी वाठारकर िनबाळकर यांच्याकडून कर्ज घेतले. या कर्जवसुलीची अनेक वेळा मागणी करूनही ते मिळेनात म्हणून िनबाळकरांनी त्यांच्या अरब सनिकांकरवी भोरच्याच राजवाडय़ात पंतसचिवानाच नजरबंद करून ठेवले. या काळात िनबाळकरांनी भोरच्या जनतेचे फार हाल केले. भोरच्या जनतेला त्यांनी दिलेल्या हालअपेष्टांना ‘िनबाळकरी बदा’ असे नाव पडले होते. पुढे रावबाजीने बापू गोखल्यांना सन्यासह पाठवून पंतसचिवांची सुटका केली.
चिमणाजीची कारकीर्द इ.स. १७९८ ते १८१८ अशी झाली. १८३० साली ब्रिटिशांच्या साहाय्याने पुढील पंतसचिव रघुनाथने कोकणचा काही परिसर आपल्या राज्यात आणला. चिमणाजी रघुनाथ ऊर्फ नानासाहेब (कारकीर्द इ.स. १८३६ ते १८७०) यांनी नीरा नदीस घाट बांधून धरण बांधले. भोर शहरी व्यापारी पेठ वसवून दक्ष आणि नेटका कारभार केला. कुलदैवत श्रीराम यांचे नानासाहेब हे भक्त. रामनवमीस होणाऱ्या उत्सवातही त्यांनी सुधारणा केल्या. भोर संस्थानच्या चलनाच्या नाण्यावर ‘श्रीराम’ असा शिक्का त्यांनी सुरू केला. या चलनाला ‘चावडी रुपया’ म्हणत. बागा आणि इमारती बांधण्याचा शौक असलेल्या नानासाहेबांनी त्यांच्या कारकीर्दीत ब्रिटिशांचा अधिक्षेप केला नाही.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com