13 August 2020

News Flash

कुतूहल – जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन- १

दुग्धव्यवसायात जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. परंतु आजही दुग्धउत्पादक चाऱ्याचे नियोजन न करताच व्यवसाय चालवतात. जो चारा उपलब्ध होईल त्यावर त्यांचा व्यवसाय

| August 1, 2013 01:01 am

दुग्धव्यवसायात जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. परंतु आजही दुग्धउत्पादक चाऱ्याचे नियोजन न करताच व्यवसाय चालवतात. जो चारा उपलब्ध होईल त्यावर त्यांचा व्यवसाय चालतो. शेतातून निघणारे गवत, ऊस, उसाचे वाढे, वाळलेला उपलब्ध चारा असे जे मिळेल त्यावर व्यवसाय करणे म्हणजे या व्यवसायाला मागे घेऊन जाण्यासारखे होईल.
आजही एकूण शेती उत्पादनाच्या २० ते २५ टक्के उत्पादन देणाऱ्या या व्यवसायासाठी केवळ दोन-तीन टक्के क्षेत्र वापरले जाते. जनावरांना त्यांची शारीरिक वाढ आणि दूध उत्पादनासाठी आवश्यक पोषणमूल्ये हिरव्या चाऱ्यापासून मिळतात. सकस व संपन्न हिरव्या चाऱ्यामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ, शर्करा, खनिजे, जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. काष्ठमय पदार्थ कमी असतात व पाण्याचा अंश जास्त असतो. पोषणमूल्य सहज विद्राव्य स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे हिरव्या चाऱ्याचे शोषण आणि प्रक्रिया सहजपणे होऊन त्यांची जास्त शक्ती खर्च होत नाही. त्यामुळे जनावरांची चांगली वाढ होते तसेच दुधाचे प्रमाणही वाढते.
हिरव्या चाऱ्यामध्ये प्रामुख्याने ज्वारी (कडवळ), मका, लसूणघास, बाजरी, नेपीयर, गिन्नी गवत, ओट, मारवेल यांसारख्या पिकांचा वापर केला जातो. चाऱ्याची पिके घेताना एकदल आणि द्विदल पिकांचा योग्य मेळ घालावा जेणेकरून दूध उत्पादन चांगले मिळेल. तसेच खाद्यावर होणारा खर्चही कमी करता येईल. आज चारा म्हणून सर्वात जास्त वापर ज्वारी (कडवळ) पिकाचा केला जातो. ज्वारी वाळल्यानंतरही त्याचा वाळलेला चारा म्हणून चांगला वापर होतो. तीनही हंगामांत येणाऱ्या या पिकामध्ये ८-१० टक्के प्रथिने असतात. तसेच चाऱ्याचे उत्पादनही चांगले मिळते. फुले अमृता तसेच काही खासगी कंपन्यांनी मल्टीकट ज्वारी (दोन-तीन खोडवा देणाऱ्या ज्वारीचे वाण) विकसित केले आहे. याचाही फायदा चारा पीक म्हणून करता येईल. बाजरीचे पीक चारापीक म्हणून घेण्याचे प्रचलित नाही. परंतु जाएंट बाजरी विकसित करून चांगला चारा वर्षभर तयार करता येतो. यामध्ये प्रथिनांचे प्रमाणही सात ते नऊ टक्के मिळते.

जे देखे रवी.. – पशुपक्ष्यांची ज्ञानेश्वरी-८
माणूस जात हुशार नक्कीच. रानातल्या पोपटांना पकडण्यासाठी पूर्वी फांद्यांना झाडाच्या खोडाच्या रंगाचीच एक नळी बघण्याची प्रथा होती. त्यावर पोपट बसला रे बसला की ती नळी गिरकी घेत असे आणि पोपट अधांतरी टांगल्यासारखा उलटा होत असे. पोपट मग गोंधळायचा, खांदे हलवायचा, उगीचच छाती फुगवायचा, पण हे सगळे करताना चवडय़ाने आणखीनच नळी घट्ट पकडायचा. भीती अशी की मी पडेन. आपल्याला पंख आहेत हेच विसरायला व्हायचे. शेवटी शिकारी यायचा आणि त्याला नळीसकट घेऊन जायचा. ही गोष्ट सांगून झाल्यावर ज्ञानेश्वर त्याला अर्धा जरी कापला तरी तो ती नळी सोडत नसे, असे वर्णन करतात. (मग जरी नेला। तोडुनी अर्धा). इथे कोणी कोणाला संन्यासी व्हायला सांगत नाही आहे. शरीर आणि त्याच्या मागण्यांबद्दल सारासार विचार कर, फार चिकटू नकोस एवढेच म्हणणे आहे. तिथेच जवळपास कोशकीटकाचिये परी ।आपणच आपला वैरी।। अशीही ओवी येते. कोशकीटक कोश बांधतो आणि त्या कोशातच अडकतो असा अर्थ. आपल्याच कोशात आपण फारच अडकत नाही ना हा विचार प्रत्येकानेच करायला हवा. याच सहाव्या अध्यायात माकडही उडय़ा मारते.
‘हे मन एवढे भटके। की त्रिभुवन पडते थोडे। समाधि घेतील माकडे। पण हे नाही॥’ ..अशी ओवी येते. पण त्याच्या पलीकडेच त्याच मनाबद्दल ‘गंमत अशी मनाची। जे होते पटकन लालची। पण त्यालाही लागू शकते गोडी। चांगल्याची.’- अशा अर्थाची ही ओवी आहे. त्यासाठी आपल्या मनाला आपल्याच समोर बसवून त्याच्याशी वाद घालायला हवा.
या वादविवादात मन जिंकते, असा अनुभव आहे, पण हळूहळू वादविवादाचे स्वरूप संवादात होऊ शकते आणि मग शिस्तीचे वावडे असलेले मन इतके ‘लायनीवर’ येते की ते आपले सामथ्र्य ठरते. जणू आपण आणि मन मिळून एक दरवेशाचा खेळच.
सातव्या अध्यायात गाय हलकासा हंबरडा फोडते. तिला दावणीला बांधून लोक तिच्यातून दुधाची अपेक्षा ठेवतात. मला पास कर, मला पैसे दे, माझे दु:ख निवारण कर, असे दूध मागितले जाते. फार फार तर हे दूध येते कसे, कोठून हे शोधण्यासाठी एखादा चौकस दूध काढू इच्छितो. याच्यापैकी काहीच माहीत नसलेले नवे पाडसू जेव्हा गाईच्या आचळाशी लुचुलुचु करीत दूध पिते तेव्हा ते ज्ञानी भक्ताचे लक्षण वठवते, असे ज्ञानेश्वर सुचवतात. इथे गाईला दावणीला बांधण्याची गरज नसते.
अर्थात हा शेवटचा दृष्टांत माझ्या कुवतीच्या पलीकडचा आहे. मी कोशकिडा बहुतेक नसणार; परंतु माझ्यातल्या माकडाच्या लीला मी चांगल्याच ओळखून आहे..
 त्याच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न चालू आहे.
रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – व्यसने कोणी करावी? कोणी करू नये! भाग झ्र् १
तंबाखू, विडी, सिगारेट, गुटखा, मशेरी, तपकीर, तंबाखू, टूथपेस्ट, दारू, ब्रॅन्डी, वाइन, रम अशा विविध निकोटिन व अल्कोहोलच्या उत्पादनांच्या दुष्परिणामांबद्दल मी आपणा सर्वाशी सुसंवाद साधण्याचे कारण नाही, कारण या व्यसनांमुळे काय बरेवाईट होते, ते या व्यसनाचा कमी-अधिक वापर करणाऱ्या, घरच्या नातेवाइकांना वा व्यसन न करणाऱ्या तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लहानथोरांना माहिती आहेच. माझ्या वैद्यकीय व्यवसायामुळे माझ्याकडे प्रतिदिनी मंडळी येत असतात. रुग्णांच्या तक्रारींचा मागोवा घेताना; मलावरोध, हाडांचे विकार, प्राणवह स्रोतसांचे विकार, रक्तक्षय, पांडुता, कावीळ, डोळ्यांचे विकार, जलोदर, संधिवात, मुंग्या येणे, हृद्रोग, मूत्रपिंड विकार, सीआरएफ, नपुंसकता, अशा रुग्णांना ‘तुम्हाला काही व्यसन आहे का’ असे विचारावे लागते. हे व्यसन बंद करणार असाल तरच तुम्हाला मी औषधोपचार सुचवू शकतो अशी माझी भूमिका असते. बहुधा अशी ठाम भूमिका घेतली तर रुग्ण व त्यांचे नातेवाइक जरूर ऐकतात. व्यसनमुक्तीचा प्रामाणिक प्रयत्न करतात.
या व्यसनातून बाहेर सुटण्याकरिता मला प्रसंगी कठोर वा क्वचित गोड बोलावे लागते. ‘दारुपेक्षा घोडय़ाचे मूत तुम्ही प्या, ते फुकट मिळतं’ किंवा माझ्या आयुष्यातील एक प्रसंग मी लोकांना सांगतो. ‘माझ्या जवळच्या एका नातेवाइकाला सुमारे पन्नास वर्षांपूर्वी दारुच्या व्यसनाबद्दल मी गुरासारखे मारले. त्यामुळे माझा हात अजूनही दुखतो. त्या नातेवाइकाचे व्यसन तेव्हा सुटले ते सुटलेच.’ त्यामुळे सर्व मायभगिनींना माझे असे आवाहन असते की, दारू पिणाऱ्या कुटुंबियाची गय नको. गल्लीतील बायकांसह त्याची अशी धुलाई करावी की, काय बिशाद तो पुन्हा दारू पिईल ?
‘बुद्धिं लिम्पती यद्द्रव्यं मदकारी तदुच्यते’- अशी आयुर्वेदीय शास्त्रकारांनी मद्याची व्याख्या केली आहे. जे घेतल्याने बुद्धी खलास होते, त्याला मद्य म्हणतात. यापेक्षा वेगळा सांगावा शास्त्र काय देणार?
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत- १ ऑगस्ट
१८३५> मराठीखेरीज संस्कृत व इंग्रजी भाषांत ग्रंथरचना, काव्यरचना करणारे आणि गुजराती, सिंधी, लॅटिन, फारसी व संस्कृत या भाषांचे जाणकार महादेव मोरेश्वर कुंटे यांचा जन्म. सोप्या मराठीत ‘राजा शिवाजी’ हे वीररसप्रधान महाकाव्य त्यांनी लिहिले. ‘व्हिसिसिटय़ूडस ऑफ आर्यन सिव्हिलायझेशन इन इंडिया’ या त्यांच्या प्रबंधाला रोमच्या विद्वत्परिषदेने घेतलेल्या स्पर्धेत बक्षीस मिळाले होते.
१८७९> चतुरस्र लेखक, पत्रकार व नाटककार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचा जन्म. १९१५ साली त्यांनी काढलेल्या ‘संदेश’ने मराठी वृत्तपत्रांना आधुनिक रूप दिले. १० नाटके, दोन कादंबऱ्या व दोन कथासंग्रह त्यांनी लिहिले होते.
१९२०> विद्वत्ता, अभ्यास आणि परखड लेखणी यांची सांगड राजकारणाशी घालणारे ‘लोकमान्य’ बाळ गंगाधर टिळक यांचे देहावसान.  ‘ओरायन’, ‘आक्र्टिक होम ऑफ द वेदाज’ आणि ‘गीतारहस्य’ हे त्यांचे ग्रंथ, तसेच ‘केसरी’ व ‘द मराठा’चे संपादक म्हणून त्यांनी लिहिलेल्या लेखांचे समग्र संग्रह आजही वाचले जातात.
१९२०> कथा, कादंबरीकार व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म. त्यांनी १४ लोकनाटय़े, २५ कादंबऱ्या व १३ कथासंग्रह लिहिले.
– संजय वझरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2013 1:01 am

Web Title: planning for animal fodder
टॅग Navneet,Navnit
Next Stories
1 कुतूहल- दुग्धव्यवसायातील सद्यस्थिती
2 कुतूहल- शाश्वत कृषी विकासासाठी पशुसंवर्धन
3 कुतूहल: संकर पद्धतीने जनावरांची पैदास
Just Now!
X