अणुक्रमांक ६१ असलेल्या या लॅन्थॅनाईडचा अनेक वेळा शोध लागला. आहे ना विचित्र गोष्ट? पण ते सत्य आहे.. आणि एवढंच नव्हे तर दर शोधाच्या वेळेला या मूलद्रव्याला नवीन नाव दिलं गेलं. कधी इलिनिअम, कधी फ्लोरेंशिअम तर कधी सायक्लोनिअम! पण प्रत्येक वेळेला हा शोध ‘चुकीचा’ ठरला आणि ही सारी नावं इतिहासजमा झाली.

अनेक वेळा वैज्ञानिकांनी, पृथ्वीच्या पाठीवर अणुक्रमांक ६१ असलेलं मूलद्रव्य अस्तित्वातच नसावं असाही कयास मांडला. आणि हे मूलद्रव्य नसणं, हा निसर्गाचा विक्षिप्तपणा नसून, हे मूलद्रव्य निसर्गात आहे, पण ते किरणोत्सारी आहे; निसर्गत: त्याचं कोणतंही स्थिर समस्थानिक नाही. किरणोत्सारी असल्यामुळे या मूलद्रव्याचं लगेचच दुसऱ्या मूलद्रव्यात रूपांतर होतं; त्यामुळेच हे मूलद्रव्य निसर्गत: आढळतच नाही, असं विधान अनेक वैज्ञानिकांनी अत्यंत अभ्यासपूर्वक केलं.

तरीही काही वैज्ञानिकांनी त्याचा पिच्छा सोडला नाही. अखेरीस १९४५ साली, एका अणुभट्टीच्या (रिअ‍ॅक्टरच्या) ‘युरेनिअम इंधना’मध्ये अणुक्रमांक ६१ असलेलं मूलद्रव्य आढळलं आणि त्याचं ‘प्रोमेथिअम’ असं नामकरणही करण्यात आलं. रिअ‍ॅक्टरमध्ये युरेनिअम इंधनाचे अणू फुटून त्यातून इतर अनेक, युरेनिअमपेक्षा कमी अणुक्रमांक असलेल्या मूलद्रव्यांचे अणू तयार होतात. अशाच प्रक्रियेत ‘प्रोमेथिअम’ तयार झाल्याचं वैज्ञानिकांना आढळलं होतं. पण तरीही अनेक रसायनशास्त्रज्ञांना, या मूलद्रव्याला प्रत्यक्ष पाहायचं होतं, त्याचे गुणधर्म तपासायचे होते, अगदीच नाही तर प्रोमेथिअमचं एखादं संयुग किंवा एखादा क्षार तरी हाताळायचा होता. आणि म्हणून शुद्ध स्वरूपातलं ‘प्रोमेथिअम’ मिळवण्यासाठी अथक प्रयत्न चालू होते.

प्रोमेथिअम मिळवण्यात नेमकी अडचण कोणती होती? ‘युरेनिअम इंधना’मध्ये आढळणारं  प्रोमेथिअम अत्यंत अल्प प्रमाणात असतं, ही अडचण म्हणावी तर वैज्ञानिकांनी याहीपेक्षा अत्यल्प प्रमाणात आढळणारी मूलद्रव्यं किंवा संयुगं अनेक रासायनिक प्रक्रिया करून मिळवली होती. त्यामुळे प्रोमेथिअम मिळवण्यात, त्याचं अत्यल्प प्रमाण ही अडचण नसून, काहीतरी अन्य रहस्य दडलेलं होतं.

प्रोमेथिअम हे लॅन्थॅनाईडच्या कुटुंबातलं! ‘युरेनिअम इंधना’पासून लॅन्थॅनाईड कुटुंबातली अनेक मूलद्रव्यं तयार होतात. या कुटुंबातल्या साऱ्या मूलद्रव्यांचे गुणधर्म बरेचसे सारखे! एक मूलद्रव्य ज्या परिस्थितीत, जशा प्रकारचा क्षार बनवेल तसेच इतरही सारे करणार.. म्हणूनही प्रोमेथिअमला एकटय़ाला बाजूला काढणं जिकिरीचं होतं.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org