सण समारंभ म्हटलं की आवाज, गोंगाट आलाच. लग्न, बारसे, वाढदिवस.. वाहनांचा गोंगाट, कारखान्यातील यंत्रांचा आवाज. असे कितीतरी लक्ष विचलित करणारे आवाज आपल्याला त्रासदायक वाटतात.
आवाज कसा मोजतात? कशाने मोजतात? आवाज कितपत मोठा असावा? असे अनेक प्रश्न येतात.
प्रत्यक्षपणे आवाजाचे (ध्वनीचे) मापन करणे खूपच कठीण असते. कारण प्रत्येक मानवी कर्णेद्रियाच्या मर्यादा भिन्न भिन्न असतात. म्हणूनच ध्वनीचे मापन करताना त्याचा मोठेपणा, दाब आणि तीव्रता मोजली जाते.
२०व्या शतकाच्या सुरुवातीला ध्वनीची तीव्रता ‘बेल’ या एककात मोजत असत. पण या मोठय़ा एककापेक्षा हल्लीच्या आधुनिक काळात ‘डेसिबल’ हे एकक वापरण्यात येते. एक डेसिबल म्हणजे ‘बेल’चा एक दशांशवा भाग. डेसिबल हे dB या चिन्हाने दर्शवतात. ध्वनीची तीव्रता पातळी ध्वनीपातळीमापक (sound level meter) च्या साहाय्याने मोजता येते.
प्रत्यक्षात डेसिबल ही लॉगॅरिदमिक श्रेणी आहे. शून्य डेसिबल म्हणजे ऐकू येणारा सर्वात हळू आवाज. त्याच्या दहापट मोठय़ा आवाजाची मात्रा १० डेसिबल. तर २० डेसिबल म्हणजे सर्वात हळू आवाजाच्या १०० पट मोठा आवाज; ३० डेसिबल म्हणजे हजारपट मोठा आवाज.
सर्वसामान्यांचा संबंध सभोवतालच्या ध्वनीपातळीशी येतो. आपली आपापसातील कुजबुज ३० डेसिबल क्षमतेची, दोघांतले संभाषण ६० डेसिबल क्षमतेचे, तर घरगुती आवाज उत्पन्न करणाऱ्या वस्तूंमधून ५० डेसिबल ते ९५ डेसिबल क्षमतेचा ध्वनी निर्माण होतो. आपल्या कर्णेद्रियांच्या क्षमतेनुसार ८५ डेसिबलपुढील ध्वनी इजा पोहोचवतो. तर १२० डेसिबलपुढील ध्वनी कधीही भरून न येणारी हानी पोहोचवतो. ध्वनीचे प्रसारण तरंगांच्या साहाय्याने विविध माध्यमातून विविध क्षमतेने होते. समुद्रसपाटीवरील हवेच्या माध्यमात १९४ डेसिबलचा ध्वनी सर्वात जास्त क्षमतेचा मानला जातो.
८० पेक्षा जास्त क्षमतेच्या ध्वनीचा मानवी आरोग्यावर, मानसिकतेवर परिणाम होतो. हृदयविकार, बहिरेपणा, निद्रानाश, लक्ष केंद्रित न होणे, बोलता न येणे, एकलकोंडेपणा यासारखे विकार संभवतात. तान्ह्य़ा बाळाची कर्णनलिका लहान असल्याने २० डेसिबलपेक्षा मोठा आवाजही त्यांना हानी पोहोचवू शकतो. म्हणूनच आपण आपल्या आवाजाची तीव्रता कमी ठेवणे हितकारक असून ध्वनिप्रदूषण रोखले पाहिजे.
– मृणालिनी साठे
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
केदारनाथ सिंह (हिंदी, २०१३)
भारतीय साहित्यातील उत्कृष्ट योगदानाबद्दल २०१३ चा, म्हणजे ४९ वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे केदारनाथ सिंह हे दहावे हिंदी साहित्यिक आहेत. ८० वर्षीय केदारनाथ सिंह यांना मानचिन्ह व ११ लाख रु. अशा स्वरूपातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यच्या चकिया गावी ७ जुलै १९३४ रोजी जन्मलेल्या केदारनाथ सिंह यांना आपल्या पुरबिहा मातीचा विसर कधीच पडला नाही. गावाशी, मातीशी नाते त्यांच्या अनेक कवितांतून प्रकट नहोते. वाराणसीच्या उदय प्रताप कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर १९५६ मध्ये बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी हिंदी साहित्यात एम.ए. केले. त्यानंतर १९८४ मध्ये ‘आधुनिक हिंदी कवितामें बिंब विधान’ (प्रतिमासृष्टी) या विषयावर त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केली. गोरखपूरला काही दिवस शिक्षक म्हणून काम केल्यानंतर ते नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ते हिंदीचे प्रोफेसर झाले.
ग्रामीण भागातील निसर्गाचे, लोकगीतांचे,शेतीप्रधान जीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत दिसते. ‘अभी बिलकुल अभी’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. ‘जमीन पक रही है’ हा दुसरा कविता संग्रह वीस वर्षांनी- १९८० मध्ये- प्रकाशित झाला. ‘यहाँसे देखो’, ‘अकालमे सारस’, ‘उत्तर कबीर और अन्य रचनाएँ’, ‘तालस्टॉय और साईकल’, ‘बाघ’ हे त्यांचे काव्यसंग्रह. त्यांच्या ‘कुछ चिठ्ठियाँ’ या पत्रसंग्रहातून त्यांच्या कवितेचे गमक उलगडत जाते. ‘कल्पना और छायावाद’, ‘मेरे समयके शब्द’, हे लेखसंग्रह, भाषा व कविता विषयक चिंतन मांडणारे आहेत. याशिवाय ब्रेख्त, बॉदलेअर आदींच्या तसेच रशियन कवितांचे अनुवाद व काही ग्रंथसंपादने त्यांनी केली. माणूस व निसर्ग यांतील नाते, भाषेचे मानवी जीवनातील स्थान, जगण्यातील करुणा, आजचे अवतीभवतीचे प्रश्न अशा अनेक आशयांनी युक्त अशी त्यांची कविता आहे. भोजपुरी बोलीत बोलणारा हा कवी पुढे खडी बोलीत काव्यरचना करू लागला. या दोन्ही भाषांविषयी त्यांना आपलेपणा आहे म्हणून ते लिहितात-
‘हिंदी मेरा देश है; भोजपुरी मेरा घर
मै दोनोंको प्यार करता हूँ..
और देखिए न, मेरी मुश्किल पिछले साठ बरसोंसे
दोनोंको दोनोंमे खोज रहा हूँ’
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com