जगभरात एक कोटीपेक्षा जास्त लोकांचे कुपोषण होत आहे. कारण त्यांच्या अन्नात प्रथिने आणि कर्ब पदार्थाची कमतरता असते. आणखी एक कोटी माणसांच्या अन्नात लोह, जस्त आणि जीवनसत्त्व ए या आवश्यक घटकांची वानवा असते. यामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होतो. वाढत्या शहरीकरणामुळे विकसनशील देशांतील जनतेची प्रथिनांची गरज वाढत आहे. बदलते हवामान आणि झपाटय़ाने वाढणारी लोकसंख्या यांमुळे अन्नाची समस्या अधिक बिकट होण्याची चिन्हे आहेत. केवळ असेंद्रिय खते वापरून आणि मुबलक पाणीपुरवठा करून किंवा सेंद्रिय शेती करून अन्नधान्याची निपज वाढवता येणार नाही. मर्यादित भूमीवर पुरेशा अन्नाची निपज होण्यासाठी शेतीव्यवसायात नावीन्यपूर्ण शोध लागायला हवेत. यासाठी जनुक अभियांत्रिकीचा वापर करायला हवा.
जगभरचे संशोधक आपापल्या परीने या समस्येची उकल करण्यात गुंतलेले आहेत. वनस्पतीच्या पेशीभित्तिकांची रचना अफलातून असते. त्यांच्या अतिपातळ आवरणातून विषारी धातूंचे कण व जंतुनाशके यांची गाळण होते. साखरेची साठवणूक करण्यात आणि पाण्याचे बाष्पीभवन अडवण्यास या भित्तिका कारणीभूत ठरतात. पदार्थाची ही जी देवाणघेवाण पेशीभित्तिकेतून होते, त्यावर नजर ठेवून संशोधक वनस्पती सृष्टीकडून जगाची गरज भागेल, इतकी ऊर्जा व अन्न तयार करून घेण्याच्या पवित्र्यात आहेत.
वनस्पतीच्या पेशीभित्तिकेतून विविध घटकांची ने-आण करण्यासाठी विशिष्ट प्रथिने वाहतूक दलालाचे कार्य करतात. मातीतून अन्नद्रव्ये शोषून घेणे, साखरेची वाहतूक करणे, क्षार आणि अ‍ॅल्युमिनियम यांसारख्या विषारी घटकांना रोखणे ही काय्रे ती करत असतात. या बाबी कशा घडतात, याचा छडा शास्त्रज्ञ लावत आहेत व या क्लृप्तींद्वारा पुरेसा अन्नसाठा निर्माण करण्याच्या प्रयत्नात ते आहेत.
वनस्पतींच्या पेशीभित्तिकेत कार्यरत असलेले क्षार वाहतूक प्रथिन झाडाझुडपांना क्षार तणावापासून मुक्ती देते. जलसिंचित जमिनीवरील पिकांचा क्षारांमुळे विध्वंस होतो व कमी धान्य पिकते. जनुक अभियांत्रिकीद्वारा या क्षार वाहतूक प्रथिनांचे रोपण करून गव्हाचे पीक २५ टक्क्यांनी वाढवण्यास ऑस्ट्रेलियातील शेतीतज्ज्ञ यशस्वी झाले आहेत.
-जोसेफ तुस्कानो
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  ऋऋ्रूी@ें५्रस्र्ंे४ेुं्र.१ॠ

आजचे महाराष्ट्रसारस्वत        २ नोव्हेंबर
१८७१ > दिवाळी अंकांची परंपरा मराठीत सुरू करणारे ‘मासिक मनोरंजन’चे संस्थापक-संपादक काशिनाथ रघुनाथ मित्र यांचा जन्म. विविध भाषांतील साहित्य त्यांनी अनुवादित केले, काही स्वत: लिहिले. ‘जागा झालेला बंगाल’ हे नाटक तसेच ‘प्रियंवदा’, ‘धाकटय़ा सूनबाई’, ‘गरीब बिचारी यमुना’,  या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.
१८८२ >  जादूकलेला वाहिलेले ‘गुरुकिल्ली’ हे नियतकालिक सुरू करणारे ‘जादूगारांचे जादूगार’ डॉ. के. बी. लेले यांचा जन्म. त्यांनी जादूकलेवर काही पुस्तकेही लिहिली होती.
१८८५ > संगीत नाटकांचे लेखक, नट आणि दिग्दर्शक अण्णासाहेब किलरेस्कर यांचे निधन. ‘संगीत सौभद्र’ हे त्यांचे आजही रसिकप्रिय असलेले नाटक.
१९८४ > कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि कलात्मतेला अंतर न देता सामाजिक/ राजकीय व्यवस्थेवर टीका करणारे शरच्चंद्र माधव मुक्तिबोध यांचा मृत्यू. ‘नवी मळवाट’, ‘यात्रिक’ आणि ‘सत्याची जात’ हे काव्यसंग्रह; ‘क्षिप्रा’, ‘सरहद्द’ आणि ‘जन हे वोळतु जेथे’ हे कादंबरीत्रय, तसेच ‘जीवन आणि साहित्य’, ‘सौंदर्य आणि साहित्यमूल्य’, ‘काही निबंध’ ही ललितेतर पुस्तके त्यांनी लिहिली.
संजय वझरेकर

वॉर अँड पीस                ऑटिझम  बालकांचा : आयुर्वेदिय उपचार
लहान बालकांची स्वमग्नता (ऑटिझम)  हा विकार त्या अभागी मुलांच्या कमी-अधिक वागण्यामुळे होत नाही. आई गर्भारपणात काही चुकलीमाकली तरी, शंभरात एखादा टक्का बालकांना कळतनकळत ऑटिझमसारखा विकार जडतो. त्या मुलांच्या बरोबर जन्मलेल्या अन्य मुलांची शारीरिक, मानसिक वाढ व्यवस्थित असते पण ऑटिझमग्रस्त मुलांच्या वागणुकीमध्ये चित्रविचित्र बदल दिसून  येतात. असे बालक इतर बालकांशी मिसळत नाही. त्यांच्यात खेळत नाही. त्यांना सवंगडी नको असतात. ते एकांत पत्करतात. एखादे लहानसे शेजारचे मूल त्याच्याबरोबर खेळायला आले तर त्याला ढकलतात. इतर लहान मुलांचे आचारविचार, भावनिक आंदोलने आई-वडिलांना व पालकांना लगेच कळतात. पण ऑटिझमग्रस्त स्वमग्न मुलाचे सगळेच वर्तन अनाकलनीय असते.
एखाद्या घरात अशा ऑटिझम मुलाला सांभाळण्याकरिता घरच्यांना खूप मोठी कसरत करावी लागते. त्या दुर्दैवी मुलाला मोठी भावंडे असल्यास त्यांना विश्वासात घेऊन त्याची काळजी का व कशी घ्यावी याचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते. कुणीकडून तरी लाडीगोडी करून त्या अपत्याला विविध खेळ, करमणुकीची साधने याचे आकर्षण निर्माण करावे लागते. अलीकडे बाजारात विविध प्रकारचे रोबोट व छोटेमोठे खेळ उपलब्ध आहेत. पण अशा खेळांपेक्षा आसपासच्या चार-पाच लहान-मोठय़ा मुलांमध्ये ऑटिझमग्रस्त बालकाला दंगामस्ती करावयास संधी  द्या. लपाछपी, धावपळ, दोरीच्या उडय़ा,  टेबल टेनिस, छोटय़ांचे बॅडमिंटन खेळ अशा सांघिक खेळात गुंतवावे.
अशा मुलाला पालकांनी, आजी-आजोबांनी आळीपाळीने चंदनबलालाक्षादि, शतावरीसिद्ध, नारीकेलतेल अशापैकी एका तेलाचे हलक्या  हाताने अभ्यंग करावे. नाकात अणूतेलाचे नस्य आवश्यक आहे. वेखंडकाडी  मधात उगाळून त्याचे  चाटण आठवणीने किमान एकवेळ चाटवावे. सारस्वतारिष्ट, ब्राह्मीवटी याची मदत घ्यावी. हिंमत हारू नये.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      वैद्यकीय क्षेत्रात जाहिरात : योग्य/अयोग्य
वरील विषयाचा परिसंवाद महाराष्ट्राच्या प्लास्टिक सर्जनच्या वार्षिक सभेत लवासा या निसर्गरम्य (!) ठिकाणी झाला. विज्ञानविषयक चर्चा केल्यावर विरंगुळाही हवा हे उद्दिष्ट ठेवून या सभा अशा ठिकाणी होतात. मूळ निमंत्रण मला वाटते मी जाहिरातीविरुद्ध बोलेन या अपेक्षेने आले असणार पण मी बिलंदर असल्यामुळे ‘सांगेन गोष्टी युक्तीच्या चार’ असे मोघम भाषण देण्याची तयारी दाखवली आणि माझ्या ऐहिक नव्हे तर वयोमानातल्या ज्येष्ठतेमुळे ‘ चालेल ’असे उत्तर आले. अर्थात मी जाहिरातीविरुद्धच बोलणार होतो. पक्ष आणि प्रतिपक्ष उभे ठाकण्याआधीच मी प्रस्तावनेत म्हणालो, आपल्या विज्ञानाची माहिती सामूहिक तऱ्हेने कोणाचेही नाव न घेता समाजाला मिळेल अशी व्यवस्था करावी की आपल्या सभासदांना त्यांच्या वृत्तीनुसार आपल्या कौशल्याचे आणि यशाचे प्रदर्शन मांडण्यास  मुभा द्यावी हा विचार आधी केलेला बरा. कारण व्यक्तिस्वातंत्र्य देणार असाल आणि त्यावर आपल्या आमसभेचे किंवा कार्यकारिणीचे काहीच नियंत्रण नसेल तर सभासद एकमेकांच्या नरडय़ाला लागणार नाहीत याची खात्री देता येणार नाही. शिवाय ज्याची खरीखोटी जाहिरात जास्त आकर्षक त्याचे कौशल्य जास्त सरस असे समीकरण तयार होईल. आकर्षक जाहिराती करणाऱ्याची कमी नाही. तुमच्या प्रॅक्टिसचे तारू अशा जाहिरातीने फुगलेल्या शिडावर पळवायचे ठरवलेत तर मग हे जाहिरातदार हळूहळू तुमच्या बोकांडी बसतील. उत्पादन खर्च वाढेल रुग्णांवरचा बोजाही वाढेल जर महागाई झाली आणि धंदा (!) कमी झाला तर आपण आपल्या तंत्रात काटकसर करू आणि रुग्णांचे हित धोक्यात येईल; जर सरसकट सगळेच जाहिरात करायला लागले तर आधी गुणाकार मग भागाकार असे होऊन सगळ्यांचेच व्यावसायिक उत्पन्न परत मूळपदावर येईल. शिवाय वाऱ्याने भरलेले शीड घेऊन चाललेल्या नौका गटांगळ्या खातात हेही लक्षात ठेवलेले बरे. कशाला ह्य़ा भानगडीत पडता? आणि सर्वात महत्त्वाचे सौंदर्याचे दुकान थाटलेल्या मालकांच्या ताटाखालचे मांजर होऊन गुपचीप शस्त्रक्रिया करून उं२ँ खिशात घालणे हा सर्वात उत्तम मार्ग. ना जाहिरात ना कल्लूेी ळं७. ज्ञानेश्वरांची एक ओवी आठवते, अफूचे पीक लावणाऱ्याला पाप लागत नाही. त्याचा उपयोग करणाऱ्याला लागते. ती ओवी मला नीट कळलेली नाही. परंतु इथे पाप दुकानदाराचे आणि तुम्ही सहीसलामत असे होऊ शकेल.
ज्या लवासाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला त्याच्या बाहेर एका विस्तीर्ण जलाशयात पाण्याची कारंजी उडत होती. तोवर महाराष्ट्रात दुष्काळाचे चटके लागणे सुरू झाले होते. मी समारोपात म्हटले, ती कारंजी बघा. असला विकासाचा मार्ग आणि आजचा जाहिरातीचा परिसंवाद यातले साम्य ओळखा.
लवासाबद्दल आता सोमवारी.
रविन मायदेव थत्ते