News Flash

कुतूहल – कापसापासून सूतनिर्मिती – भाग ४

विंचरण : अंतिम खेच साच्यानंतर सूत कताईसाठी लागणारे सर्व गुणधर्म असणारा पेळू तयार झालेला असतो.

| June 17, 2015 01:02 am

विंचरण :  अंतिम खेच साच्यानंतर सूत कताईसाठी लागणारे सर्व गुणधर्म असणारा पेळू तयार झालेला असतो. यानंतर पेळूची जाडी कमी करत सूत कातणे ह्य़ा पुढील प्रक्रिया असतात. परंतु कापूस जेव्हा शेतात पिकतो त्यावेळी एका कापसाच्या बोंडामधील सर्व तंतू एकाच लांबीचे नसतात. काही तंतू अतिशय आखूड, काही मध्यम लांबीचे तर काही मोठय़ा लांबीचे असतात. अंतिम खेच साच्यामधून बाहेर पडणाऱ्या पेळूपासून सूत कातल्यास सुतामध्ये आखूड ते मोठय़ा लांबीपर्यंतचे सर्व तंतू समाविष्ट केले जातात. सूतकताई करताना आखूड लांबीच्या तंतूंमुळे सुताचा दर्जा कमी होतो आणि त्याची ताकद खूपच कमी होते. या तंतूंमुळे सूत अधिक केसाळ बनते. यासाठी कापसामधील आखूड तंतू काढून टाकून सुताचा दर्जा उंचाविण्यासाठी विंचरण प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रास विंचरक (कोंबर) असे म्हणतात.
विंचरण ही प्रक्रिया तलम व अतितलम सुतांसाठीच वापरतात. या सुताची किंमतही अर्थातच अधिक असते. विंचरण केलेल्या कापसापासून काढल्या जाणाऱ्या सुताची ताकद अधिक असते, हे सूत अधिक एकसारख्या जाडीचे असून या सुताचा केसाळपणा खूपच कमी असतो. विंचरण प्रक्रियेनंतर विंचरकामधून बाहेर पडणारा पेळू एकसारख्या जाडीचा असत नाही. त्यामुळे या पेळूला सर्व ठिकाणी एकसारख्या जाडीचा बनविण्यासाठी पुन्हा अंतिम खेच साच्याचा उपयोग केला जातो.
वात बनविणे : अंतिम खेच साच्यामधून बाहेर पडणारा पेळू हा सूत तयार करण्यासाठी सर्वतोपरी योग्य असतो. या पेळूमध्ये सर्व तंतू सरळ, एकमेकांस व पेळूच्या आसाशी समांतर असतात, आणि पेळू सर्व ठिकाणी समान जाडीचा झालेला असतो. यानंतर या पेळूची जाडी कमी करून ती त्यापासून बनवायच्या सुताएवढी करणे ही पुढील प्रक्रिया असते. सर्वसाधारणपणे  पेळूची जाडी १५० ते ४०० पटीने कमी करावी लागते. अर्थात हे सुताच्या जाडीवर अवलंबून असते.
पेळूची जाडी कमी करण्याची ही प्रक्रिया एकाच टप्प्यात करता येत नाही. कारण एकाच टप्प्यात जाडी कमी करण्याचा प्रयत्न केल्यास सुताचा दर्जा बराच कमी होतो. म्हणून जाडी कमी करण्याची ही प्रक्रिया पूर्वी तीन ते चार टप्प्यात करण्यात येत असे. परंतु तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज ही प्रक्रिया दोन टप्प्यांत करण्यात येते.
चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – जामनगरचे शाही जडजवाहीर
जामनगरचे महाराजा रणजीतसिंहजी जडेजा यांना रत्ने, मोती आणि इतर जडजवाहरांची उत्तम पारख होती आणि ते जडजवाहरांचे चोखंदळ संग्राहक होते. जामनगर शासकांच्या जवाहरांच्या संग्रहातील पाचू आणि मोत्यांचा दोन पदरी हार संपूर्ण भारतीय बनावटीचा आणि वडिलोपार्जति संपत्तीचा महत्त्वाचा हिस्सा होता. या हाराच्या पेंडंटमध्ये बसविलेल्या दोन पाचूंपकी एक लंबगोलाकृती, १५५ कॅरटचा सतराव्या शतकातला तर दुसरा षटकोनी आकाराचा, २०० कॅरट वजनाचा १८व्या शतकातला होता.
रणजीतसिंहजीच्या मृत्यूनंतर बहुतेक दागिने त्यांच्या वारसांकडे आले. ‘क्वीन ऑफ हॉलंड’ हा जगप्रसिद्ध हिरा बसवलेला रत्नजडीत हार वारसांनी ‘काíतए’ला विकला. परंतु वडिलोपार्जित पाचूजडित हार मात्र गायब झाला; तो ७२ वर्षांनी म्हणजे २००५ साली लंडनच्या ‘ख्रिस्टीज ऑक्शन हाऊस’ या जागतिक लिलावांच्या ठेकेदाराकडे विक्रीसाठी आला. लिलाव ठेकेदारांना या हाराची अपेक्षित किंमत होती १६ लाख पौंड! जामनगरचे सध्याचे नामधारी महाराजा शत्रुशल्यजी यांना ही बातमी कळताच त्यांनी लंडनला धाव घेतली. ठेकेदारांना त्यानी गळ घातली की तो पाचूजडित हार आमच्या घराण्यातील पूर्वजांपासून चालत आलेला ठेवा आहे व तो त्यांनी विकू नये. पुढे आम्हीच तो विकत घेऊ. लिलाव ठेकेदारांनी ते मान्य करून हाराचा लिलाव रद्द केला.
जाम श्रींच्या शाही पोशाखावर खांद्यापासून कमरेपर्यंत परिधान करण्याची एमराल्ड कॉलर चोकरसारखी, २० चौकोनी पाचूंनी जडवलेली होती. पाचूंच्या प्रत्येक जोडीत लहान गोलाकृती हिरे आणि पुढे मध्यावर असलेला पेअर फळाच्या आकाराचा मोठा पाचू अशी ही कॉलर मोठे प्रतिष्ठेचे लक्षण होते. महाराजांच्या पगडीवर बसविण्यासाठी असलेल्या हिरेजडित शिरपेचाच्या मध्यावर असलेला ‘आय ऑफ द टायगर’ हा व्हिस्की रंगाचा मोठा हिरा हे मोठेच आकर्षण होते. ६१ कॅरेट वजनाचा, आफ्रिकेतील ऑरेंज नदीकाठी सापडेलला हा हिरा प्लॅटिनमच्या कोंदणात बसवून शिरपेचात लावलेला होता.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2015 1:02 am

Web Title: thread production from cotton part 4
टॅग : Cotton,Navneet
Next Stories
1 कुतूहल – कापसापासून सूतनिर्मिती – भाग ३
2 अव्वल क्रिकेटपटू रणजीतसिंह
3 जामनगरच्या रणजीतसिंहांची कारकीर्द
Just Now!
X