‘माझ्यात तसं काही विशेष टॅलेंट नाही. फक्त मला फारच कुतूहल वाटत असतं,’ असं अल्बर्ट आइनस्टाइन यांनी म्हटलं आहे.

कुतूहल ही माणसाला मिळालेली एक फार आगळीवेगळी अशी देणगी आहे. व्यवहारात कदाचित आपण कुतूहल या गोष्टीचं महत्त्व विसरून गेलो आहोत. कुतूहल या एका गोष्टीमुळेच प्रत्येक नवा शोध लागला आहे. झाडावरून फळ नेहमी खालीच का पडतं? आकाशातले ग्रह, गोल आपल्याला लांबून जसे दिसतात तसेच ते प्रत्यक्षात असतात का? ते प्रत्यक्षात कसे असतात? या पृथ्वीचा शोध कसा लागला असेल? पृथ्वी निर्माण कशी झाली असेल? चंद्रावर गेलं तर काय होईल? माणसाला पंख असते तर काय झालं असतं? आपल्याला जर समुद्राच्या तळाशी जाऊन बघायचं असेल तर त्यासाठी काय करावे लागेल? असे प्रश्न आपल्याला पडतात. त्या वेळी महत्त्वाची असते ती कुतूहलाची भावना. कुतूहल निर्माण झालं की डोपामाइन निर्माण होतं. ते प्रश्नाचं उत्तर शोधायला प्रवृत्त करतं.

मनात प्रश्न उभे राहणं हीसुद्धा मेंदूची एक विशेष क्षमता आहे. योग्य आणि अर्थपूर्ण प्रश्न मनात उभे राहण्यासाठीसुद्धा मानसिक परिस्थिती ताणतणावविरहित असायला लागते.

जे प्रश्न मनात निर्माण होतात, त्या प्रश्नांना योग्य संदर्भ असायला लागतात.  मनात निर्माण झालेला एखादा प्रश्न योग्य आहे की नाही, हे समजण्याचीदेखील एक किमान क्षमता असावी लागते. कारण अर्थहीन आणि संदर्भहीन प्रश्नसुद्धा मनामध्ये येतात. त्या वेळी थोडा विचार केल्यानंतर हे संदर्भहीन आणि अर्थहीन आहेत हे आपल्याला कळू शकतं आणि असे प्रश्न आपोआपच आपण रद्द करतो. हे निर्णय वेळोवेळी आपलं मन घेत असतं.

मनात प्रश्न निर्माण झाल्यावर पुढची पायरी असते ती या अर्थपूर्ण प्रश्नांचा शोध घेण्याची. कुतूहल कोणत्याही बाबतीत निर्माण होऊ शकतं.

– आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो ही जाणीव,

– उत्तर शोधायलाच हवं ही ऊर्मी आणि

– कोणाला तरी विचारून किंवा पुस्तकात शोधून उत्तरापर्यंत पोहोचण्याइतकी किमान परिस्थिती उपलब्ध असली पाहिजे.

यामुळे कोणताही माणूस कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com