आपला आवाज न ओरडता दूरवर पोहोचवता यावा, ही मानवाची इच्छा काही नवी नाही. यासाठी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेकजण असे साधन तयार करण्याच्या प्रयत्नात होते. याच काळात ग्रॅहॅम बेल हा स्कॉटिश-अमेरिकी तंत्रज्ञ ‘हार्मोनिक टेलिग्राफ’ हे साधन विकसित करत होता. विद्युतप्रवाहांत वेगवेगळे बदल घडवून, एकाच तारयंत्रातून एकाच वेळी अनेक संदेश पाठवण्याची शक्यता तो पडताळून पाहत होता. दोन खोल्यांतील एकमेकांना जोडलेल्या तारयंत्रांवरील बेलचे प्रयोग चालू असताना, बाजूच्या खोलीतील सहकाऱ्याने आपल्याकडील यंत्रातील घट्ट झालेली एक विशिष्ट पट्टी मोकळी करण्यासाठी वर-खाली केली. यामुळे बेलच्या खोलीतील साधनावर एक हळू, पण स्पष्ट आवाज ऐकू आला. या अनपेक्षित घटनेनंतर बेलने आपले लक्ष तारयंत्रावरून काढून प्रत्यक्ष आवाजाच्या प्रक्षेपणावरील प्रयोगांवर केंद्रित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेलने आपल्या एका प्रयोगात अतिपातळ पटल घेऊन त्याच्या पृष्ठभागाला एक सुई उभी जोडली. त्यानंतर एका भांडय़ात पाणी घेऊन विद्युतप्रवाहाचे वहन होण्यासाठी त्यात थोडेसे आम्ल मिसळले. आता पटलाला जोडलेली सुई या द्रावणात अर्धवट बुडत होती. बेलने नंतर या सुईतून व द्रावणातून विद्युतप्रवाह पाठवला. या पटलाजवळ काही आवाज केला, तर त्यामुळे पटल कंप पावायचे, सुई द्रावणात वर-खाली व्हायची आणि त्यामुळे विद्युतप्रवाहात किंचितसे बदल व्हायचे. विद्युतप्रवाहातील हे बदल याच विद्युतमंडलाजवळ, परंतु दुसऱ्या खोलीत ठेवलेल्या पट्टीपर्यंत पोहोचून ती पट्टी कंप पावायची आणि त्यातून नेमका तोच आवाज निर्माण व्हायचा. हा होता १० मार्च १८७६ रोजी तयार झालेला ग्रॅहॅम बेलचा पहिलावहिला दूरध्वनी!

पाण्याचा वापर करणारा हा दूरध्वनी व्यावसायिक वापराला सोयीचा नसल्याने, त्यानंतर काही आठवडय़ांतच बेलने दूरध्वनीचे स्वरूप यशस्वीरीत्या बदलले. नव्या दूरध्वनी यंत्रात त्याने अतिपातळ पटलाला लोखंडाचा तुकडा जोडला. आवाजामुळे पटलात आणि पर्यायाने लोखंडाच्या तुकडय़ात निर्माण होणारी कंपने थेट जवळच्या विद्युतमंडलातील विद्युतप्रवाहात बदल घडवून आणायची. विद्युतप्रवाहातील या बदलामुळे दूरवरच्या, लोखंड जोडलेल्या पटलात अशाच प्रकारची कंपने निर्माण होऊन तोच आवाज ऐकू यायचा. १८७६ सालच्या जून महिन्यात फिलाडेल्फियात भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ग्रॅहॅम बेलने हे आपले क्रांतिकारी यंत्र सर्वापुढे सादर केले आणि दूरसंपर्कशास्त्राला नवे वळण लाभले.

– सुनील सुळे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alexander graham bell and telephone zws
First published on: 19-09-2019 at 04:19 IST