सतराव्या शतकात अनेक मूलद्रव्यांचे शोध लागत होते. या मूलद्रव्यांच्या गुणधर्मात कधी साम्य तर कधी फरक आढळत होता. या गुणधर्मानुसार मूलद्रव्यांचे वर्गीकरण करण्याची आवश्यकता वैज्ञानिकांना वाटत होती. त्या दृष्टीने प्रयत्नही चालू होते. योहान डय़ोबेरायनर या जर्मन संशोधकाला भौतिक आणि रासायनिक गुणधर्म समान असणारी काही मूलद्रव्ये तीनच्या गटात मांडता येत असल्याचे दिसून आले. १६१७ सालाच्या सुमारास या पद्धतीने त्याने कॅल्शियम, स्ट्रोन्शियम आणि बेरियम असा तीन मूलद्रव्यांचा गट तयार केला. या गटाच्या बाबतीत आणखी एक गोष्ट डय़ोबेरायनरच्या लक्षात आली. अणुभाराच्या चढत्या क्रमाने जर या तीन मूलद्रव्यांचा गट मांडला, तर मधल्या मूलद्रव्याचा अणुभार इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुभाराच्या सरासरीइतका असतो. त्यानंतर आणखी काही वर्षांतच डय़ोबेरायनरला क्लोरिन-ब्रोमिन-आयोडीन तसेच लिथियम-सोडियम-पोटॅशियम असे इतर गटही सापडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सन १८६० साली जर्मनीतील कार्लस्रूह येथे झालेल्या रसायनतज्ज्ञांच्या परिषदेत इटलीतील रसायनतज्ज्ञ स्टानिस्लाव कानिझारो याने अ‍ॅव्होगाद्रोच्या गृहीतकाचा वापर करून काढलेले, अनेक मूलद्रव्यांचे अणुभार आपल्या शोधनिबंधाद्वारे सादर केले. ही पद्धत उपलब्ध झाल्यामुळे आता परत एकदा मूलद्रव्यांची मांडणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. १८६५च्या आसपास इंग्लंडच्या जॉन न्यूलँड्स याने त्याकाळी माहीत असलेली सगळी मूलद्रव्ये त्यांच्या अणुभाराच्या चढत्या क्रमाने मांडली. यातून त्याला क्रमाने येणाऱ्या प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे असल्याचे आढळले. न्यूलँड्सने या आवर्तनाच्या स्वरूपाची संगीतातील सप्तकाशी तुलना केली. न्यूलँड्सचे हे निरीक्षण कॅल्शियम (अणुभार ४०) या मूलद्रव्यापर्यंत बरोबर ठरले, नंतरच्या मूलद्रव्यांसाठी ते जुळत नव्हते. त्यामुळे न्यूलँड्सची खिल्ली उडवली गेली. लंडनच्या जर्नल ऑफ केमिकल सोसायटीने त्याचा शोधनिबंध नाकारला.

खरे तर, अजूनही अनेक मूलद्रव्यांचा शोध लागायचा असल्यानेच न्यूलँड्सची कॅल्शियमच्या पुढील निरीक्षणे चुकीची ठरली होती. प्रत्यक्षात न्यूलँड्सचा शोध अतिशय महत्त्वाचा होता. डय़ोबेरायनरने या अगोदर अणूभार आणि मूलद्रव्यांच्या गुणधर्माचा संबंध शोधला होता, परंतु त्यातून मूलद्रव्यांची त्रिकुटे ही स्वतंत्र असल्याचे दिसून येत होते. त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध स्पष्ट झाला नव्हता. न्यूलँड्सने मात्र सर्वच मूलद्रव्यांचे गुणधर्म हे अणुभाराशी निगडित असल्याचे सूचित केले होते. न्यूलँड्सच्या या शोधामुळे मूलद्रव्यांच्या आधुनिक मांडणीकडील वाटचालीला सुरुवात झाली होती.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrangement of element elements layout elements presentation zws
First published on: 01-08-2019 at 01:04 IST