भानू काळे
देशाच्या विकासात विदेशव्यापाराला खूप महत्त्व आहे आणि तो व्यापार मुख्यत: बंदरांतून होतो. चेन्नई, कोलकाता आणि मुंबई ही आजची महानगरे म्हणजे सतराव्या शतकात छोटी छोटी गावे होती, पण तिथे ईस्ट इंडिया कंपनीने आपली ठाणी उभारल्यानंतरच त्यांचा झपाटय़ाने विकास होत गेला. बॉम्बे या नावाची व्युत्पत्ती बॉन आणि बईया (Buon Bahia, म्हणजे उत्तम बंदर) या दोन पोर्तुगीज शब्दांवरून झालेली आहे. बंदर आणि गोदी या समुद्रकिनाऱ्याशी जोडल्या गेलेल्या आणि म्हणून काहीशा समानार्थी वाटणाऱ्या शब्दांचा अर्थ वस्तुत: वेगळा आहे. किनाऱ्याचा समुद्रालगतचा खालचा भाग म्हणजे बंदर (पोर्ट) आणि जमिनीलगतचा वरचा भाग म्हणजे गोदी (डॉक). किनाऱ्याला बोट लावणे यालाही ‘टू डॉक’ असे म्हणतात आणि ते काम ज्यांना पायलट म्हणतात ते स्थानिक खलाशीच करतात. सातासमुद्रापार बोटी नेणाऱ्या कप्तानाला बंदरात बोट लावायची मात्र अनुमती नसते. ते काम स्थानिक पायलटचेच! फारसीतील बंर्दि या शब्दावरून ‘बंदर’ शब्द आला. बोट किनाऱ्याला लागते ती याच जागी. इंग्रजीतील गोडाउन या शब्दावरून गोदाम शब्द आला आणि त्याचे अपभ्रष्ट रूप म्हणजे ‘गोदी.’ ‘सामान ठेवण्याची जागा’ हा त्याचा अर्थ. बोटीवरून उतरवलेला किंवा बोटीत चढवायचा माल गोदीत साठवला जाई. पुढे सत्तरच्या दशकात कंटेनरमधून माल पाठवणे सुरू झाल्यावर गोदीचे महत्त्व काहीसे कमी झाले. अर्थात आजही बोटींची दुरुस्ती-देखभाल करण्यासाठी गोदीचे महत्त्व आहेच.
एकेकाळी मुंबईतील बंदरात आणि गोद्यांमध्ये लाखभर कामगार काम करत आणि जुन्या मुंबईचा एक तृतीयांश भूभाग पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीत होता. गोदीतील कामगार पूर्वी डोक्यावर वजन उचलत व म्हणून त्यांना ‘माथाडी’ म्हणत; पुढे ओझे उचलणाऱ्या सगळय़ाच हमालांना माथाडी म्हटले जाऊ लागले. किनारा विदेशव्यापाराशी जोडलेला असल्याने साहजिकच किनाऱ्याशी निगडित अनेक शब्द परदेशांतून आलेले आहेत. ‘खलाशी’ शब्द ‘खलास्’ या अरबी शब्दावरून आला आहे. जहाजाला दिशा देणारा कर्ण, म्हणजेच सुकाणू, धरणारा हा त्याचा अर्थ. गल्बत् या फारसी शब्दावरून ‘गलबत’ हा शब्द आला. आर्मेर या लॅटिन शब्दावरून आर्माडा हा शब्द पोर्तुगीज व स्पॅनिश भाषांत गेला आणि त्याचेच एक रूप म्हणजे आपला ‘आरमार’ हा शब्द.
bhanukale@gmail. com