योगेश सोमण
सोने आणि तांब्याप्रमाणे चांदीसुद्धा निसर्गात शुद्ध स्वरूपात सापडू शकते. त्यामुळे चांदीचा शोधही शुद्ध चांदीचे तुकडे नदीच्या पात्रात किंवा इतरत्र सापडून लागला असावा. इ.स. १९०० साली कॅनडामध्ये नदीच्या पात्रात तोफेच्या गोळ्याच्या आकाराएवढे मोठे शुद्ध चांदीचे गोळे मिळाले होते. परंतु चांदी ही सोन्यापेक्षा अधिक क्रियाशील असल्याने, निसर्गात शुद्ध स्वरूपात चांदी सापडण्याचे प्रमाण सोन्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे खनिजापासून चांदी वेगळी करण्याची पद्धत विकसित होईपर्यंत चांदी सोन्यापेक्षा दुर्मीळ होती आणि म्हणूनच ती सोन्यापेक्षा महाग होती!
ग्रीस आणि तुर्कस्तानमध्ये इ.स.पूर्व ४०००च्या सुमारास तयार केलेल्या चांदीच्या वस्तू सापडल्या आहेत. सुमेरियातल्या (म्हणजे सध्याचा इराक आणि सीरिया) किश शहरात सापडलेल्या चांदीच्या वस्तू इ.स.पूर्व ३०००च्या आसपासच्या आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रीसमध्ये सापडलेल्या वस्तू या खनिजापासून शुद्ध केलेल्या चांदीपासून बनवलेल्या असल्याचे दिसून आले आहे. याचा अर्थ चांदी शुद्ध करण्याची कला, माणसाला इ.स.पूर्व ४००० किंवा त्यापूर्वीपासून अवगत आहे. यावरून चांदीचा शोध हा कांस्ययुगाच्या आधी, ताम्रयुगात तांब्याच्या बरोबरच लागला असावा, असा अंदाज बांधता येतो. युरोपप्रमाणे इ.स.पूर्व ४०००च्या सुमारासच भारत, चीन आणि जपान येथेही चांदीचा वापर सुरू झाल्याचे पुरावे आढळले आहेत. गॅलेना (शिशाचे सल्फाइड) या शिशाच्या खनिजात शिशासोबत चांदी आढळते. या खनिजातून शिसे वेगळे करताना, शिशाबरोबर चांदीही वेगळी होते. ही चांदी त्यानंतर ‘क्युपेल’ हे विशिष्ट प्रकारचे सच्छिद्र भांडे वापरून शुद्ध केली जाते.
युरोपात ग्रीस, स्पेन, इटली या भागांत चांदीची खनिजे मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध होती. परंतु चांदी हा धातू लोह किंवा कांस्याप्रमाणे ताकदवान नसल्याने सुरुवातीपासून त्याचा उपयोग फक्त दागिने आणि चलनी नाणी म्हणूनच झाला. ग्रीक संस्कृती बहराला येऊ लागली, तोपर्यंत चांदीच्या नाण्यांचा वापर चलन म्हणून सर्रास सुरू झाला होता. इ.स.पूर्व ६०० ते इ.स.पूर्व ३०० या काळात अथेन्सजवळील खाणींतून वर्षांला तीन टन इतके चांदीचे उत्पादन होत होते. पुढे रोमन साम्राज्याच्या काळात, इ.स. १०० नंतरच्या काळात स्पेनमधील खाणींमधून वर्षांला दोनशे टन इतकी चांदी मिळत होती. पंधराव्या शतकात, दक्षिण अमेरिकेचा शोध लागेपर्यंत रोमन लोकांचा हा विक्रम कायम होता!
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
