आपल्या देशात मानसोपचार आणि समुपदेशन ही पद्धती फारशी लोकप्रिय झालेली नाही. अस्वस्थता असताना माणसे स्वत:हून समुपदेशकाची मदत घेताहेत, असे फारसे दिसत नाही. त्याची अनेक कारणे असू शकतात. काही मनोविकारतज्ज्ञ समुपदेशकांना नोकरीला ठेवतात आणि त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांना समुपदेशकाकडे पाठवतात; पण औषधे न देता मानसोपचार करणाऱ्या डॉक्टरांची किंवा मानसोपचारतज्ज्ञांची स्वतंत्र क्लिनिक्स आपल्याकडे दुर्मीळ आहेत. परिस्थितीच्या गत्रेत सापडलेली, भावनिक आधार आवश्यक असलेली माणसे खूप मोठय़ा संख्येने आहेत; पण सध्या ती मदतीसाठी ज्योतिषाकडे किंवा आध्यात्मिक गुरूंकडे जातात. तेथेही आधार मिळत असला तरी ते आदर्श समुपदेशन नाही. कारण समुपदेशनाचे उद्दिष्ट विचार करायला प्रवृत्त करणे हे असते.

समुपदेशक कोणताही सल्ला देत नाही किंवा संस्कार करीत नाही. तो समोरील व्यक्तीला निर्णय घ्यायला आणि त्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारायला प्रवृत्त करतो. माणसे बऱ्याचदा स्वतच्या परिस्थितीसाठी इतरांना दोष देत असतात. बापाने वाईट वागवले, नवरा छळतो, प्रेयसीने फसवले अशा तक्रारी माणसे करतात. समुपदेशक भूतकाळात घुटमळत राहणाऱ्या अशा माणसाला वर्तमान क्षणात आणतो. तुझा आत्ताचा त्रास कमी करण्यासाठी तू काय करू शकतोस असे विचारतो. माणूस उपदेशाने बदलत नाही. कुणीही उपदेश करू लागला की माणूस मनाचे दरवाजे आतून बंद करतो. ते उघडायचे असतील तर त्याला त्याच्यातील चांगल्या गोष्टींची जाणीव करून देणे आवश्यक असते. समुपदेशक तेच करतो. समुपदेशकाने दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याची क्षमता विकसित करावी लागते. त्याला एम्पथी म्हणजे ‘समानुभूती’ म्हणतात. ही सिम्पथी (सहानुभूती)पेक्षा वेगळी आहे. एखादा माणूस विहिरीत पडला असेल आणि वाचवा म्हणून ओरडत असेल तर सहानुभूती असणारी व्यक्ती स्वत:ला पोहता येते की नाही याचा विचार न करता विहिरीत उडी मारते आणि स्वत:ही गटांगळ्या खाऊ लागते. समानुभूती असलेली व्यक्ती मात्र सराट कृती न करता विहिरीतील माणसाला त्यातून कसे बाहेर काढता येईल याचा विचार करून योग्य उपाय योजते.  दुसऱ्याचे दु:ख समजून घ्यायचे, त्याच्या भावनांचा आदर करायचा आणि ते कमी करायचे कोणकोणते उपाय असू शकतात याचा विचार करायला समोरील व्यक्तीला प्रवृत्त करायचे. समुपदेशनाचे हे कौशल्य सरावाने विकसित होते.

– डॉ. यश वेलणकर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

yashwel@gmail.com