वातावरण आणि पर्यावरण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. वातावरण चांगले असले, की पर्यावरण नेहमीच सुदृढ असते. पर्यावरणावर मानवनिर्मित उद्योग आणि विकासाचे आवश्यकतेपेक्षा जास्त आघात झाले, की वातावरणाचा समतोलपणा बिघडतो आणि त्याचा दृश्य परिणाम आपणास नैसर्गिक आपत्तींबरोबरच वायुप्रदूषणामधून त्वरित अनुभवण्यास मिळतो.
‘वातावरण’ म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते तिच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत असलेल्या विविध वायूंचा आणि इतर घटकांचा थर. वातावरणामध्ये नायट्रोजन (७९ टक्के), ऑक्सिजन (२१ टक्के), कार्बन डायऑक्साइड (०.०३ टक्के), आरगॉन (०.९ टक्के) यासोबत आद्र्रता, इतर वायू आणि धूलिकणांचाही समावेश असतो. यालाच आपण ‘हवा’ असे म्हणतो. थोडक्यात, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रामधील अदृश्य आवरणरूपात असलेल्या हवेच्या मिश्रणालाच ‘वातावरण’ असे म्हणतात. हे वातावरण पृथ्वीच्या पृष्ठभागास ५० कोटी वर्षांपासून असेच बिलगून आहे.
पृथ्वीच्या निर्मितीपासून तिच्या भूगर्भात आणि पृष्ठभागावर सतत सुरू असलेल्या नैसर्गिक आणि रासायनिक घटना-प्रक्रियांमुळे वातावरणाची निर्मिती झाली. आजही ती प्रक्रिया सुरूच आहे. वातावरणातील हवेची घनता आणि दाब आपण जसे भूपृष्ठापासून अधिक उंचीवर जाऊ तसे कमी होत असतात; म्हणूनच उंचावरील भागात वातावरण विरळ असते. भूपृष्ठापासून दहा किमी उंचीपर्यंत वातावरणामधील ९९ टक्के घटक आढळतात. सुदृढ पर्यावरणास हानी पोहोचविणाऱ्या बहुतेक सर्व घटना याच क्षेत्रात घडत असतात.
पृथ्वीला सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेमधील ४० टक्के भाग वातावरणामधील धूलिकणांना धडकून परावर्तित होतो. उरलेली सौरऊर्जा जेव्हा सूर्यकिरणांच्या माध्यमातून वातावरण पार करून पृथ्वीच्या पृष्ठभागावर येते, तेव्हा आपणास उष्णता जाणवू लागते. उच्च वातावरणात- म्हणजे पृष्ठभागापासून दहा किमी उंचीवर ओझोन वायूचा थर असतो. हा थर सूर्यकिरणांमधील घातक नील (अल्ट्राव्हॉयलेट) किरणांना अडवतो, म्हणूनच पृथ्वीवरील सर्व सजीवांचे रक्षण होते. हवामानबदलामुळे सध्या याच थराला जास्त हानी पोहोचत आहे.
हरित वनस्पती सूर्यप्रकाश आणि पाणी यांच्या मदतीने वातावरणामधील कर्बवायू शोषून रासायनिक पद्धतीने शर्करा तयार करतात आणि प्राणवायू बाहेर सोडतात. या प्रकाश संश्लेषणामुळेच हवेमधील कर्बवायू आणि प्राणवायू यांचा समतोल राखला जातो. मात्र त्यासाठी मनुष्य, प्राणी आणि हरित वनस्पती यांच्यामध्ये सुसंवाद असणे आवश्यक असते. यालाच आपण स्वच्छ वातावरण आणि सुदृढ पर्यावरण असे म्हणतो!
डॉ. नागेश टेकाळे
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org