डॉ. अंजली कुलकर्णी
वैद्यकशास्त्रात विविध मानवी अवयवांच्या प्रत्यारोपणाचे प्रयत्न चालू असतानाच, अमेरिकेतील रॉकफेलर संस्थेतील वैद्यकतज्ज्ञ सायमन फ्लेक्सनेर याने १९०९ साली शिकागो येथील एका वैद्यकीय परिषदेत हृदयाच्या प्रत्यारोपणाची शक्यता व्यक्त केली. या दृष्टीने पहिली पायरी म्हणता येईल ती रशियन संशोधक व्लादिमिर डेमिखोव याने १९५० च्या दशकात केलेले प्राण्यांवरचे प्रयोग. हृदयाचे काम बाहेरून करता येईल, असे उपकरण त्याने बनवले. हृदयाला जोडलेल्या रक्तवाहिन्यांचे ‘बायपास ऑपरेशन’ करून रक्तप्रवाह पूर्ववत करण्याचा पहिला प्रयोग त्याचाच. डेमिखोव आणि इतरांनी प्राण्यांचे हृदय माणसाच्या शरीरात बसवण्याचे काही प्रयोग केले. त्यातलाच एक प्रयोग म्हणजे १९६४ साली जेम्स हार्डी या अमेरिकन शल्यविशारदाने केलेले, चिम्पान्झीच्या हृदयाचे माणसाच्या शरीरातले प्रत्यारोपण. हे हृदय एका तासातच बंद पडले.
हृदयाचे पहिले यशस्वी प्रत्यारोपण इ.स. १९६७ साली दक्षिण आफ्रिकेतील शल्यविशारद क्रिस्टियान बर्नार्ड याने केले. लुई वॉशकान्स्की या पंचावन्न वर्षे वयाच्या गृहस्थाचे हृदय खराब अवस्थेत होते. क्रिस्टियान बर्नार्ड याच्या चमूने, वाहन-अपघातात मरण पावलेल्या एका पंचवीस वर्षे वयाच्या महिलेचे हृदय या वॉशकान्स्कीच्या शरीरात बसवले. ही शस्त्रक्रिया करताना, अमेरिकेतील स्टॅनफर्डच्या डॉ. नॉर्मन शुमवे यांनी विकसित केलेली पद्धत वापरली गेली. यानुसार, हृदयाचे प्रत्यारोपण करताना रुग्णाच्या शरीरातला रक्तप्रवाह हा ‘हार्ट-लंग मशीन’द्वारे चालू ठेवण्यात आला. तसेच शरीरातील पेशींच्या चयापचयाचे प्रमाण किमान पातळीवर राखण्यासाठी या रक्तप्रवाहाचे तापमान सर्वसाधारण तापमानापेक्षा दोन-तीन अंश सेल्सियसने कमी ठेवले गेले. या शस्त्रक्रियेनंतर लुई वॉशकान्स्की अठरा दिवस जगला. त्याला मृत्यू आला तो हृदय चालेनासे झाल्यामुळे नव्हे, तर न्यूमोनियाच्या संसर्गाने!
यानंतर अशा शस्त्रक्रियांची लाटच आली; परंतु या शस्त्रक्रियांनंतर रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण मोठे असल्याने ही लाट अल्पकाळात ओसरलीही. शरीर बाहेरच्या ऊती सहजपणे स्वीकारत नसल्यानेच या शस्त्रक्रिया अयशस्वी ठरत होत्या. १९७०च्या दशकात मात्र यावर सायक्लोस्पोरिन हे एका बुरशीपासून बनवलेले औषध वापरात आले आणि शरीराचा नव्या ऊती न स्वीकारण्याचा कल कमी करणे वैद्यकतज्ज्ञांना शक्य झाले. कालांतराने इतर औषधेही वापरात आली. हे सर्व औषधी उपाय प्रत्यारोपणाच्या तंत्राला पूरक ठरले आणि हृदयाची प्रत्यारोपणे अधिक प्रमाणात यशस्वी ठरू लागली.
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२