डॉ. यश वेलणकर

‘लोगो’ या ग्रीक शब्दाचा अर्थ उद्देश असा आहे. व्हिक्टर फ्रँकल यांनी ‘मॅनस् सर्च फॉर मीनिंग’ या पुस्तकात या थेरपीची रूपरेषा मांडली आहे. माणसाला शरीर, मन आणि ‘स्पिरिट’ असते. माणसाचे शरीर-मन व्याधीग्रस्त असले तरी ‘स्पिरिट’ हे कधीच आजारी होत नाही. मी म्हणजे ‘स्पिरिट’देखील आहे- केवळ शरीर/मन नाही, याचे भान ठेवले तर आजारपणाला, कोणत्याही त्रासाला माणूस धर्याने सामोरा जाऊ शकतो. हा संघर्ष त्याच्या संपूर्ण आयुष्याला अर्थपूर्णता देतो. आयुष्याचा अर्थ इतरांशी असलेल्या नातेसंबंधांतूनही गवसतो. वैयक्तिक सुखोपभोग माणसाला जगायचा उद्देश देतो; मात्र तो दीर्घकाळ टिकत नाही. कारण सुख उपभोगण्याच्या क्षमतांना मर्यादा असतात. जिव्हासुख किंवा कामसुख उपभोगण्याची क्षमता संपली, की आयुष्य अर्थहीन होते. याउलट ‘आपण दुसऱ्याला मदत करू शकतो’ हा भाव आयुष्याला दीर्घकाळ अर्थपूर्णता देतो. जगण्याचा उद्देश वयानुसार बदलू शकतो. संसारी माणसाच्या आयुष्याला त्याच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या अर्थ देत असल्या, तरी मुले मोठी झाल्यानंतर पोकळी जाणवू शकते. त्या वेळी सामाजिक कार्यातील सहभाग माणसाचे आयुष्य अर्थपूर्ण बनवतो. आध्यात्मिक उन्नतीवर विश्वास असेल तर साधना किंवा नास्तिक व्यक्ती असेल तर त्या विचारांचा प्रसार हेही जगण्याला उद्देश देते. सकाळी जाग आल्यानंतर अंथरुणातून बाहेर कशासाठी यायचे, या प्रश्नाचे उत्तर म्हणजे त्या माणसाचा जगण्याचा उद्देश असतो. कोणत्याही ध्येयाने प्रेरित व्यक्तींचे आयुष्य अर्थपूर्ण असते. प्रत्येक व्यक्ती ही अद्वितीयच असते; त्यामुळे दोन माणसांचा जगण्याचा उद्देश सारखाच असेल असे नाही. कोणता तरी साक्षात्कार होऊन उद्देश गवसतो, हेही खरे नाही. माणसाला तो शोधावा लागतो, प्रयत्नपूर्वक निर्माण करावा लागतो. अन्यथा उदासी येते. मी केवळ शरीर/मन नसून ‘स्पिरिट’ही आहे, हे भान मृत्युशय्येवरील माणसाच्या आयुष्यालाही अर्थ देते.

लोगो थेरपीतील ‘स्पिरिट’ म्हणजे साक्षीभावाला दिलेला वेगळा शब्द आहे, हे स्पष्ट आहे. हा साक्षीभाव विकसित करणारा सराव केला, लक्ष पुन: पुन्हा वर्तमान क्षणात आणून शरीरातील संवेदना आणि मनातील विचार यांचा खेळ तटस्थपणे पाहू लागलो, तर आपल्या प्रत्येक कृतीचा आणि पूर्ण आयुष्याचादेखील अर्थ उमजू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

yashwel@gmail.com