कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेली वाहन-उत्पादन प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम वाहने वाहन उद्योगाचा चेहरामोहरा बदलत आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर स्मार्ट पार्किंग, स्मार्ट सुकाणू (स्टीयरिंग), वेग वाढवणे/ कमी करणे, वळण घेणे, अडथळा ओळखणे इत्यादी सर्व प्रक्रिया स्वयंचलित वाहने एकत्रित आणि सक्रियपणे हाताळत आहेत. काही नुकत्याच बाजारात आलेल्या वाहनांमध्ये चालकाच्या आराम आणि सुरक्षिततेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता संलग्न श्राव्यसाहाय्यक (व्हॉइस असिस्टन्ट) सुसज्ज आहेत. वाहनांमधील विविध भागांच्या तपासणीसाठी संगणक दृष्टी वापरली जाते, जेणेकरून अगदी लहानसहान बारकावे आणि विसंगतीदेखील अधोरेखित होते.

स्वयंचलित वाहनांसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधांच्या टक्केवारीत भारत ३० देशांमध्ये २९व्या क्रमांकावर होता. भारताची सद्या:स्थिती आणि जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा थोडा अंदाज घेऊ या. सोसायटी ऑफ ऑटोमोबाइल इंजिनीअर्स यांनी स्वयंचलित वाहनांचे शून्य ते पाच अशा सहा स्तरांत वर्गीकरण केले आहे. स्तर शून्यमध्ये स्वायत्त वैशिष्ट्ये नसलेली वाहने येतात. स्तर एकमध्ये अगदी मूलभूत चालक-साहाय्य प्रणालींचा उदा.: आवश्यकतेनुसार वेग नियंत्रण (अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल) समावेश असलेली वाहने आहेत, स्तर दोनमध्ये अंशत: स्वयंचलित वाहनाला काही विशिष्ट परिस्थितींमध्ये एकाच वेळी स्टीयरिंग आणि प्रवेग नियंत्रित करण्यास सक्षम असणारी वाहने येतात, तर स्तर तीनमध्ये सशर्त स्वयंचलन असणारी वाहने ज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संलग्न तंत्रज्ञानाची प्रणाली वाहन चालवण्याच्या विविध पैलूंचे नियंत्रण करू शकते; परंतु काही विशिष्ट परिस्थितीत मानवी हस्तक्षेपावर अवलंबून असते. शेवटी स्तर चार व पाचमध्ये अनुक्रमे उच्चस्तरीय स्वयंचलन आणि संपूर्ण स्वयंचलन समाविष्ट आहे, तिथे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाची आवश्यकता नाही.

हेही वाचा : कुतूहल: स्मार्ट वाहनांसाठी स्मार्ट गुणवत्ता नियंत्रण प्रणाली

सध्या भारतात पहिल्या आणि दुसऱ्या स्तरावरची स्वयंचलित वाहने दृष्टीस पडतात. ज्यात वेग नियंत्रण (अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल), मार्गिका राखण्यासाठी साहाय्य (लेन कीपिंग असिस्टन्स), स्वयंचलित आपत्कालीन गतिनिरोध साहाय्य (ऑटोमेटेड इमर्जन्सी ब्रेकिंग) इत्यादी प्रणालींचा समावेश आहे. दुसऱ्या स्तरावरून तिसऱ्या स्तरावर जाण्यासाठी भारताला सेन्सर फ्युजन, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि सुधारित कनेक्टिव्हिटी स्वीकारणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर तंत्रज्ञानाचा अधिक व्यापक वापर आणि जनमानसामधील सार्वजनिक भान यांमुळे नक्कीच येणाऱ्या काळात आपला प्रवास अधिक वेगवान, आरामदायी आणि सुरक्षित होईल.

कौस्तुभ जोशी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : http://www.mavipa.org