‘निसर्ग आणि विज्ञान’ या कुतूहलच्या विषयातील हा शेवटचा लेख. काल आपण दोघांच्या प्रतिक्रिया वाचल्या. आज आणखी काही प्रतिक्रिया पाहू..

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अरुण गद्रे यांनी ‘आणि जीवनाचे सूप तयार झाले’ हा डॉ. रंजन गर्गे यांचा लेख वाचून यातील जेनेटिक्स आणि मायक्रोबायोलॉजीची माहिती जुनाट झाली. त्यावर गेल्या ३० वर्षांत बरेच संशोधन झाले असल्याची प्रतिक्रिया दिली. डॉ. रंजन गर्गे यांनी त्याचे उत्तर म्हणून एक सविस्तर पत्र कुतूहल संपादकांना लिहिले.  

‘फुलपाखरे’ या विषयावरील डॉ. नागेश टेकाळे यांचे लेख पालघरच्या आश्रमशाळेत वाचून दाखवण्यात आले आणि विद्यार्थ्यांना त्यावर प्रश्नपत्रिका देऊन परीक्षा घेतली गेली. प्रियंका देवरे यांनी प्रा. नंदिनी देशमुख यांचा ‘कीटकांमार्फत रोगोपचार’ हा लेख वाचून, ‘मल्टीपल स्क्लेरॉसिस’ रोगावर काही उपचार आहेत का, कोणी रुग्ण बरे झाले आहेत का, याविषयी चौकशी केली. दीपाली कात्रे यांनी या सदरातील लेख वाचून शालेय विद्यार्थ्यांसाठी काही नाटिका लिहिल्या आणि अनेक लेखांची ध्वनिफीत तयार करून विवेकानंद संस्कार केंद्रात कथांच्या स्वरूपात सादर केली.

अजेय केळकर यांनी प्रा. टेकाळे यांचे ‘मियावाकी जंगले’ या विषयावरील लेख वाचून, पुण्यातील वेताळ टेकडीवर असे जंगल करता येईल का, त्याचा सल्ला कोठे मिळेल, खर्च किती, हे विचारले. मेहनत आणि खर्च करायला स्वत: तयार असल्याचे त्यांनी कळवले. डॉ. मिलिंद गोखले यांनी मियावाकीवरील लेख वाचून कोकणात पठारावर येणाऱ्या देशी झाडांचे प्रारूप मियावाकी जंगलासाठी तयार केले आहे का, असे विचारले. डॉ. श्रीपाद पाठक यांनी प्रा. विद्याधर बोरकरांचे जीवाश्मावरचे लेख वाचून यावर मी कोणते पुस्तक वाचावे हे विचारले. डॉ. विकास आमटे यांनी सतनूरचा जीवाश्म कुठे आहे, याची चौकशी केली.

प्राची देशमुख यांनी वातावरणात ऑक्सिजन कसा आला, असा प्रश्न विचारला. त्याला डॉ. सुधाकर आगरकर यांनी उत्तर दिले की, २५० कोटी वर्षांपूर्वी सायनोबॅक्टेरिया निर्माण झाले. हे जिवाणू ऑक्सिजनविरहित वातावरणात जगू शकत होते. त्यांना लागणारा ऑक्सिजन ते कार्बन-डाय-ऑक्साइडचे विघटन करून मिळवत. या श्वसनक्रियेला अ‍ॅनोरोबिक श्वसनक्रिया म्हणतात. या क्रियेतून थोडा थोडा ऑक्सिजन हवेत जमा होऊ लागला. ५४ कोटी वर्षांपूर्वी बहुपेशीय प्राणी जगू शकतील एवढे ऑक्सिजनचे प्रमाण झाले. यादरम्यान वनस्पतींची वाढ झाली. त्यांनी हवेत आणखी ऑक्सिजन सोडला आणि वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण कमी झाले.

विलास रबडे यांचा ‘वेधशाळा’ लेख वाचून शासनाला जिल्हा परिषदेच्या १०० शाळांत त्या बसवता येतील का, अशी विचारणा झाली. निसर्ग सफर आणि त्यातील विज्ञान समजून घेण्यासाठी २५४ दिवस फारच कमी आहेत, पण दरवर्षी नवीन विषय या संकल्पनेला धरून या वर्षीसाठी इथेच विराम. पुन्हा भेटू नवीन वर्षांत नवीन विषयासह..

– अ. पां. देशपांडे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org