अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत वीज पडून अनेक उंच इमारतींची नासधूस होत असे. त्यानंतरच्या काळात मात्र अमेरिकी संशोधक बेंजामिन फ्रँकलिन (इ.स. १७०६ – १७९०) याने तयार केलेला ‘विद्युतनिवारक (लाइटनिंग कंडक्टर)’ उंच इमारतींचे विजेपासून रक्षण करण्यास उपयोगी ठरू लागला. फ्रँकलिनने फिलाडेल्फिया येथे १७५२ साली केलेला, गडगडाटी वादळात पतंग उडविण्याचा ऐतिहासिक प्रयोग विद्युतनिवारकाच्या या निर्मितीला कारणीभूत ठरला. फ्रँकलिनने आकाशातील वीज, तसेच दोन वस्तू एकमेकांवर घासल्यावर निर्माण होत असलेली घर्षणजन्य वीज- या दोन्ही एकच असल्याचे या प्रयोगातून दाखवून दिले.
फ्रँकलिनने सीडर लाकडाच्या दोन पट्टय़ांवर रेशमी कापड बांधून एक पतंग तयार केला. पतंगाच्या वरच्या टोकाला त्याने एक धातूची तार बसवली. या तारेला त्याने पतंगाची दोरी जोडली. दोरीच्या दुसऱ्या टोकाला त्याने लोखंडी किल्ली बांधली. किल्लीपासून खालच्या भागात एक कोरडी रेशमी फीत बांधली आणि ती धरून तो छताखाली उभा राहिला. वादळी ढग आकाशात जमले असताना त्याने पतंग ढगांत उंच उडवला. पावसामुळे पतंग व दोरी भिजली. ढगांत असलेला विद्युतभार या भिजलेल्या पतंगात आणि त्यानंतर त्या तारेद्वारे दोरीच्या दुसऱ्या टोकापर्यंत उतरला. दोरीवरचे धागे उभे राहत असलेले दिसताच, त्याने आपले बोट किल्लीच्या जवळ आणले. त्याबरोबर त्याला जाणवण्याइतका जोरदार विजेचा झटका बसला. ढग हे विद्युतभारित असल्याचे स्पष्ट झाले. घर्षणजन्य विद्युत ज्यात साठवता येते, ती लेडन बरणी त्याने आता या किल्लीजवळ आणली. लेडन बरणीच्या विद्युतवाहक पत्र्याला किल्ली टेकवल्याबरोबर ती बरणी विद्युतभारित झाली. या प्रयोगावरून फ्रँकलिनने दाखवून दिले, की आभाळात कडाडणारी वीज आणि प्रयोगशाळेतील घर्षणजन्य विद्युत यांमध्ये काहीच फरक नाही.
विजेचे स्वरूप स्पष्ट झाल्यानंतर, फ्रँकलिन याने १७५३ साली विद्युतनिवारकाची कल्पना मांडली. इमारतीवर एखादा धातूचा दांडा बसवायचा, त्याला लांबलचक धातूची पट्टी जोडायची आणि या पट्टीचे दुसरे टोक जमिनीच्या संपर्कात आणायचे. यामुळे गडगडाटी वादळात त्या वास्तूवर जमा होणाऱ्या विद्युतभाराला धातूच्या दांडय़ाद्वारे सुलभ वाहक मार्ग मिळेल आणि वीज तिच्यातून निघून जाऊन जमिनीत सहजपणे विसर्जित होईल. परिणामी, विजेपासून इमारतीचा बचाव होईल. फ्रँकलिनने सुचवलेल्या या विद्युतनिवारकाचा लवकरच सर्वत्र वापर सुरू झाला.
– डॉ. सुनंदा करंदीकरमराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org