भानू काळे

राजकीय चळवळीतून नवे शब्द निर्माण होतात. लोकमान्य टिळकांनी वापरात आणलेला एक शब्द म्हणजे ‘जहाल’. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांमध्ये दोन प्रमुख गट होते. एका बाजूला ब्रिटिश राजवटीचा फायदा घेऊन हळूहळू सामाजिक सुधारणा करून घ्याव्यात असे मानणारा, गोपाळ कृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता यांच्या नेतृत्वाखालील गट होता; तर दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांना आमच्या समाजात ढवळाढवळ करू देण्याऐवजी, राजकीय सुधारणाच झटपट करून घ्यायला हव्यात, असे मानणारा लोकमान्य टिळक आणि लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखालील गट होता.

१९०७ साली सुरत येथे भरलेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनात ही दुही विकोपाला गेली, तिला हिंसक वळणही लागले. या दोन गटांना ‘मवाळ’ आणि ‘जहाल’ म्हटले गेले. ‘सौम्य’ या अर्थाने मराठीत ‘मऊ’ हा शब्द पूर्वीपासून रूढ होता व त्यामुळे ‘मवाळ’ हा शब्द स्वयंस्पष्ट होता. ‘मवाळ गटाच्या विरोधातील’ या अर्थाने ‘जहाल’ हा नवा शब्द टिळकांनी केसरीतील अग्रलेखात वापरला आणि आपल्या समर्थकांसाठी रूढ केला. याचा शब्दकोशीय अर्थ आहे तीष्ण किंवा तिखट. फारसीतील ‘जहालीम्’ किंवा ‘जालीम्’ या शब्दावरून तो आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘डावे’ आणि ‘उजवे’ असे दोन गट आपण नेहमीच करत असतो. या शब्दांची व्युत्पत्तीही मजेशीर आहे. १७८९ साली फ्रेंच राज्यक्रांतीच्या दरम्यान त्यांच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रचंड गोंधळ उडाला आणि कोणाचेच बोलणे इतरांना समजेनासे झाले. त्या वेळी सभापतींनी ‘‘जुन्या व्यवस्थेच्या समर्थकांनी उजव्या बाजूला बसावे आणि बंडखोरांनी डाव्या बाजूला बसावे,’’ असा आदेश दिला. त्यानुसार सदस्यांची विभागणी झाली आणि कोण कुठल्या बाजूला बसला आहे यावरून त्यांची मते लगेचच स्पष्ट झाली. हीच परंपरा फ्रान्समध्ये आणि जगातील इतरही देशांत रूढ झाली. कालांतराने ‘उजवे’ म्हणजे परंपरा, सुव्यवस्था, राष्ट्रवाद, मुक्त अर्थव्यवस्था यांना प्राधान्य देणारे म्हणजेच ‘प्रतिगामी’ आणि ‘डावे’ म्हणजे नवता, न्याय, समाजवाद, नियंत्रित अर्थव्यवस्था यांना प्राधान्य देणारे म्हणजेच ‘पुरोगामी’ असे मानले जाऊ लागले. आज ‘प्रतिगामी’ आणि ‘पुरोगामी’ यांच्या व्याख्याच विवाद्य झाल्या आहेत; पण ‘डावे’ आणि ‘उजवे’ हे शब्द मात्र वापरात आहेतच.