– डॉ. मुकुंद बोधनकर, मराठी विज्ञान परिषद
आज पुन्हा एकदा ‘करोना’ अर्थात कोविड-१९ने डोके वर काढले आहे आणि अशातच ‘तो नक्की कुठून आला?’ हे पुस्तक वाचनात आले. पुस्तकाच्या लेखिका डॉ. मोनाली रहाळकर-बहुलीकर या आघारकर संशोधन संस्थेमध्ये सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत तर पुस्तकाचे सहलेखक, राहुल बहुलीकर बायफ संस्थेमध्ये शाश्वत शेती आणि जैव-तंत्रज्ञानाचे संशोधक आहेत. हे पुस्तक, कोविडमध्ये बळी गेलेल्या सुमारे २ कोटी मृतांना अर्पण करण्यात आले आहे.
लेखकांनी अनेक वैज्ञानिक शोधनिबंध, संकेतस्थळे बारकाईने तपासून पाहिली. तशातच कोविड विषाणूच्या जवळ जाणाऱ्या एका विषाणूबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांना मिळाली. त्यातील पूर्वमुद्रित माहिती त्यांनी प्रसिद्ध केली. ब्लॉग्ज आणि लेख लिहिले. वुहान येथील संस्थेत नेमके कोणते प्रयोग केले जात, याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. या अभ्यासाचा त्यांना पुढील अनेक गोष्टी स्पष्ट होण्यासाठी उपयोग झाला. यासाठी त्यांनी ‘ड्रॅस्टिक’ नावाचा एक गट स्थापन केला. गटात डेटा शास्त्रज्ञ आणि अभियंतेसुद्धा होते. या गटातील एक सदस्य प्रसनजीत रे यांना तर मँडरिन भाषेचीसुद्धा माहिती होती. यात वुहान संस्थेचा मुख्य डेटाबेस कोविड सुरू व्हायच्या आधी ‘डिलीट’ होणे, वुहान-अमेरिकेचे संयुक्त प्रकल्प आणि वुहान प्रयोगशाळेला अमेरिकेकडून मिळत असलेले अर्थसहाय्य इत्यादी अनेक गोष्टी पुस्तकात विस्ताराने मांडलेल्या आहेत.
पुस्तकात अमेरिकी काँग्रेसमधील सुनावण्या आणि प्रमुख गुप्तहेर खात्यांचे अहवाल याबद्दलही माहिती आहे. विषाणूंना प्रयोगशाळेमध्ये अधिक धोकादायक आणि संक्रमणशील बनवणे म्हणजेच ‘गेन ऑफ फंक्शन’. अशाच एका प्रयोगात कोविड विषाणूचा जन्म झाला असावा, असा निष्कर्ष निघतो. परंतु त्या वेळी ‘प्रयोगशाळा गळती सिद्धांत’ दाबून टाकण्याचे प्रयत्न झाले. नैसर्गिकरीत्या या विषाणूचा प्रसार झाल्याचा आजदेखील कुठलाही पुरावा मिळालेला नाही. सध्या संपूर्ण जगामध्ये जेएन.१ हा आणि त्याचे दोन उपप्रकार म्हणजेच एलएफ.७ आणि एनबी. १.८.१ सक्रिय आहेत.
संपूर्ण जगाला अनेक पातळ्यांवर ग्रासणाऱ्या या विषयावर पुण्याच्या डॉ. मोनाली रहाळकर-बहुलीकर आणि डॉ. राहुल बहुलीकर या मराठी शास्त्रज्ञांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. एवढा सखोल अभ्यास करून लिहिलेले या विषयावरील पुस्तक भारतीय भाषेत उपलब्ध असल्याचे ऐकिवात नाही. ‘तो नक्की कुठून आला?’ हे २०० पानी पुस्तक २ मार्च २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आले असून ते रसिक साहित्य, पुणे येथे आणि ऑनलाइनसुद्धा उपलब्ध आहे.
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org