नवदेशांचा उदयास्त : लातविया सध्या

१९१८ मध्ये पहिल्या महायुद्धाच्या अस्तकाळात लातवियन नेत्यांनी स्वतंत्र लातवियाची घोषणा केली.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

बाल्टिक देशांपैकी लातवियन प्रदेशाचा ताबा मिळविण्यासाठी त्याचे शेजारी पोलंड-लिथुआनिया राष्ट्रसंघ, रशिया आणि स्वीडन यांच्यात रस्सीखेच चालू होती. या कारणासाठी या तीन सत्तांमध्ये १७०० साली सुरू झालेले ‘ग्रेट नॉर्दर्न वॉर’ हे युद्ध पुढे दहा वर्षे चालले. या युद्धानंतरही तेथील राजकीय परिस्थिती पूर्ववतच राहिली परंतु १७२१ मध्ये निस्ताद येथे या तीन सत्तांमध्ये तह होऊन लातवियाचा सर्व प्रदेश रशियन झारच्या अमलाखाली आला. त्यासाठी रशियाने २० लाख थेलर हे चांदीचे स्वीडिश चलन एवढी प्रचंड किंमत मोजली. १९ व्या शतकात रशियन साम्राज्यात नवनवीन तंत्रज्ञान वापरात आणून औद्योगिकीकरण सुरू झाले. गावांचे शहरीकरण सुरू झाले. १८६० ते १९१४ या काळात लातवियाची काही शहरे उद्योग केंद्रे बनली, त्यात रिगा हे वरचढ होते. खेडय़ांमधले अनेक शेतकरी शहरात येऊन कारखान्यात नोकरी करू लागले, काही जण कलेच्या प्रांतात, काही जण व्यापार उद्योगात पुढे आले. आणि यातूनच या लोकांमध्ये लातवियन राष्ट्रीयत्व, संस्कृती आणि भाषा याबाबत अस्मिता जागृत झाली, तो अभिमान जोपासण्यासाठी, रशियन सत्तेपासून स्वातंत्र्य मिळविण्याची मागणी जोर धरू लागली.

१९१८ मध्ये पहिल्या महायुद्धाच्या अस्तकाळात लातवियन नेत्यांनी स्वतंत्र लातवियाची घोषणा केली. स्वतंत्र लातवियाला दोन वर्षांनी १९२० मध्ये सोव्हिएत रशियाने मान्यता दिली आणि इतर युरोपियन देशांनी १९२१ मध्ये. १९३४ मध्ये कार्लीस उलमानीस याने लातवियाच्या शासन व्यवस्थेवर आपले वर्चस्व स्थापन करीत त्याचे हुकूमशाही सरकार स्थापन केले. या काळात लातवियाची आर्थिक परिस्थिती अत्यंत डबघाईला आली. या परिस्थितीचा फायदा घेत जून १९४० मध्ये सोव्हिएत युनियनने आक्रमण करून लातवियाचा ताबा घेतला आणि सोव्हिएत युनियनमध्ये सामील केले. १९४१ ते १९४४ या दुसऱ्या महायुद्ध काळात लातवियाचा ताबा नाझी जर्मनीकडे आल्यावर लातविया पुन्हा एकदा सोव्हिएत रशियाच्या अमलाखाली गेला. १९४५ ते १९९१ ही ४६ वर्षे येथे कम्युनिस्ट विचार प्रणालीचे लातवियन सोव्हिएत साम्यवादी प्रजासत्ताक सरकार होते. १९९१ सालच्या सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर लातविया २१ ऑगस्ट १९९१ रोजी मुक्त होऊन एक स्वायत्त देश म्हणून अस्तित्वात आला. सध्या तिथे संसदीय प्रजासत्ताक प्रणालीचे सरकार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Current latvia country zws