– डॉ. निधी पटवर्धन

‘आपलं चायनीज काही खरं नाही, ते तर भारतीय चवीनुसार हवं तसं बनवून घेतलेलं आहे’, चीनला आठ वर्षे राहून आलेली स्नेही सर्वाना सांगत होती, ‘खरे सॉस हवे असतील तर व्यापारी दुव्यांवर उपलब्ध आहेत, थोडे महाग आहेत.’- अधिकृत चायनीज येते असे वाटून ती उद्गारली. सॉसला पर्यायी शब्द सुचवा कुणीतरी.

मग वाटले चुकीचे ते काय, आपल्या चवीचे करून माणूस खाऊच शकतो. तसेच परकीय शब्द पण तो हवे तसे बदलून घेतोच की! आता ‘सिचुआन’ भागाला आपण ‘शेजवान’ केलेच की! इंग्रजीतील कॅम्पला कंपू, कॅप्टनला कप्तान, कॉन्ट्रॅक्टला कंत्राट, केटलला किटली, टँकला टाकी, डॅम्ड बीस्टला डँबीस, सॉनेटला सुनीत, मिनिट्स – मिंटं, अशी अपभ्रष्ट म्हणजे ‘मूळ स्थानापासून ढळलेल्या’ इंग्रजी शब्दांची एक यादी म. अ. करंदीकर यांनी मराठी संशोधन पत्रिकेत दिली होती. याला एका अर्थाने इंग्रजीतून मराठीत आलेले ‘तद्भव शब्द’ असेही म्हणता येऊ शकते.

मराठीत संस्कृतातून जसेच्या तसे जे शब्द येतात त्यांना ‘तत्सम’ शब्द अशी संज्ञा आहे. जसे की, देव, कन्या, पुत्र, स्त्री, पुरुष, मंत्र, मोदक, नंदन असे अनेक शब्द तत्सम आहेत. पण मूळ संस्कृत शब्दांचे परिवर्तन होऊन आलेले ‘तद्भव’ शब्दही खूप आहेत. जसे कमलचे कमळ झाले, अद्यचे आज झाले, पर्णचे पान झाले, हस्तचा हात झाला, पदचा पाय झाला, चक्राचे चाक झाले, सप्तचे सात झाले, दीपयष्टीची दिवटी झाली, प्रसादचे पसाय झाले, हरिद्रेची हळद झाली, निद्रिस्तचा निद्रित झाला, यंत्रमंत्रचे जंतर-मंतर झाले, उपवासाचा उपास झाला, उत्तलचा उलथा झाला, तिलकची टिकली झाली, दुग्धचे दूध झाले. बरेचदा ही परिवर्तने सुलभीकरणासाठी होतात.

आता मराठी ही संस्कृत- प्राकृत- अपभ्रंश- मराठी अशा परंपरेने सिद्ध झाली आहे. तेव्हा संस्कृत – प्राकृत -अपभ्रंश भाषेतून मराठीने शब्दऋण घेतलेले आहे यात नवल नाही. त्याला ऋण न म्हणता वारसाच म्हणावे लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

nidheepatwardhan@gmail.com