चाक हा मानवजातीच्या प्रगतीच्या इतिहासातला एक अतिशय महत्त्वाचा शोध आहे. काहींच्या मते चाक हा पूर्णपणे मानवी प्रज्ञेचा आविष्कार आहे; तर इतरांच्या मते चाक तयार करण्यास मानवाने, गडगडत जाणाऱ्या शेणकिडय़ासारख्या, निसर्गातील जीवांपासून स्फूर्ती घेतली असावी. एखादी अवजड वस्तू उचलून किंवा ओढत नेण्यापेक्षा ती गडगडत नेणे तुलनेने सोपे पडते, तसेच अवजड वस्तूच्या खाली लाकडाचा ओंडका ठेवला तर ती सहजपणे सरकवत नेता येते, हे मानवाला ज्ञात होते. इजिप्तमध्ये पिरॅमिडचे दगड वाहून नेण्यासाठी या संकल्पनेचा वापर झाला असावा. परंतु या संकल्पनेपासून प्रत्यक्ष चाक अस्तित्वात येण्यास खूप काळ जावा लागला. धातूची योग्य अशी हत्यारे अस्तित्वात नसणे, हे त्याचे कारण असण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इ.स.पूर्व ४००० ते इ.स.पूर्व ३५०० या काळात मेसोपोटेमियामध्ये (आजचा इराक) चाक प्रथम अस्तित्वात आले असावे. सुरुवातीला चाकाचा उपयोग मातीची भांडी घडवण्यासाठी केला गेला. त्यानंतर पाणचक्कीच्या आणि पवनचक्कीच्या स्वरूपातील चाकाचा उपयोग, धान्य दळण्यासाठी आणि पाणी उपसण्यासाठी केला जात होता. चाक वापरून गाडीसारखे किंवा रथासारखे प्रवासी वाहन तयार करण्याची कल्पना त्यानंतर काही शतकांनी सुचली असावी. चाकासाठी आसाचा वापर सुरू झाल्यानंतर चाक मुक्तपणे फिरवता येऊ  लागले. पोलंडमध्ये सापडलेल्या, इ.स.पूर्व ३५०० ते इ.स.पूर्व ३००० या दरम्यान घडवल्या गेलेल्या एका भांडय़ावर, आसाने जोडलेल्या चाकांच्या गाडीचे चित्र रेखाटलेले आढळले आहे. भारतात चाकाचा उपयोग इ.स.पूर्व २५००च्या सुमारास सुरू झाला असावा.

सुरुवातीची चाके लाकडाची आणि भरीव स्वरूपाची असायची. इ.स.पूर्व २००० सालानंतर चाकाच्या मूळ स्वरूपात मोठे बदल झाले. चाकाचे वजन कमी करण्यासाठी त्याला भोके पाडली जाऊ  लागली आणि त्यानंतर आरे असलेले चाक वापरात आले. वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या रथासारख्या वाहनांच्या चाकांवर इ.स.पूर्व १०००च्या सुमारास लोखंडाची धाव बसवण्यास सुरुवात झाली. यामुळे चाकाचे आयुष्य वाढले. सामान वाहून नेण्यासाठी एकचाकी गाडी अस्तित्वात आली ती प्रथम ग्रीसमध्ये – इ.स.पूर्व सहाव्या ते चौथ्या शतकाच्या दरम्यान. त्यानंतर ती अल्पकाळातच चीनमध्ये आणि युरोपात पोहोचली. चाकाचा उपयोग कालांतराने घडय़ाळासारख्या इतर यंत्रांतही सुरू झाला आणि चाकाने ‘वेगाने’ जीवनाची विविध क्षेत्रे पादाक्रांत केली.

– शशिकांत धारणे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History of the wheel
First published on: 18-02-2019 at 00:19 IST