व्यापक कृत्रिम बुद्धिमत्तेकडे वाटचाल करत असताना अनेक प्रश्न उभे राहतात. बुद्धिमान प्रणाली किती शक्तिशाली संगणक वापरते, तिला किती स्मृतिक्षमता (मेमरी) लागते, तिच्याकडे किती प्रमाणात डेटा गोळा होतो, अशासारखे. काही तज्ज्ञांच्या मते इतकी संसाधने वापरणारी प्रणाली आणि माणूस यांची तुलना करता येणे अशक्य आहे. तर काही तज्ज्ञांना वाटते की माणसाच्या मेंदूइतकी स्मृतिक्षमता असल्याशिवाय व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता शक्य नाही. आपल्या मेंदूची क्षमता सुमारे अडीच पेटाबाइट आहे. ओळखीच्या भाषेत सांगायचे तर २५ लाख जीबी, किंवा साधारण अडीच हजार लॅपटॉपइतकी. एवढी क्षमता वेगाने वापरणाऱ्या प्रणालीचा पल्ला गाठायला अद्याप बराच अवकाश आहे.

हेही वाचा >>> कुतूहल: व्यापक कृत्रिम बुद्धिमत्तेकडे..

lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

एकीकडे तांत्रिक क्षमतेवर चर्चा होत असताना दुसरीकडे बुद्धिमत्तेत काय काय असते याचे विश्लेषण होत आहे. त्यातली कोणती कौशल्ये व्यापक कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी आवश्यक आहेत यावर ऊहापोह सुरू आहे. पण त्याहूनही कळीचा प्रश्न आहे, की एखादी प्रणाली माणसाइतकी बुद्धिमान आहे की नाही, हे कसे ओळखायचे? त्यासाठी संशोधकांनी विविध चाचण्या तयार केल्या आहेत. कॉफी टेस्ट, आयकिया टेस्ट, कॉलेज स्टुडंट टेस्ट या त्यातल्या काही.

ॲलन ट्यूरिंग या संशोधकाने सुचवले की, प्रश्नोत्तरे किंवा संवाद करताना समोर माणूस आहे की यंत्र हे ओळखता आले नाही, तर ते यंत्र माणसाच्या समतुल्य बुद्धिमान म्हणता येईल. आज अनेक संशोधक व्यापक कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी धडपडताना या ट्यूरिंग चाचणीचा वापर करून आपण कुठवर आलो आहोत याचा अंदाज घेतात. ट्यूरिंग चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या यंत्राला लोब्नर पारितोषिक १९९० ते २०२० दरम्यान देण्यात आले. त्यात कांस्य पदक मिळाले तरी सुवर्ण पदक मात्र कोणीही पटकावू शकलेले नाही! अजूनही व्यापक बुद्धिमत्ता आवाक्यात आलेली नाही, असा त्याचा अर्थ.

हेही वाचा >>> कुतूहल : तंत्रज्ञानातील तत्त्वज्ञ माँटगोमेरी चर्चलँड

काही शास्त्रज्ञांना आता व्यापक बुद्धिमत्ता चाचणीचे स्वरूप बदलणे गरजेचे वाटते. फक्त ठरावीक क्षमता अजमावणे पुरेसे नाही, तर खूप उच्च पातळीवर परीक्षा घेऊन कृत्रिम बुद्धिमत्ता किती व्यापक आहे याचे सखोल विश्लेषण आवश्यक वाटते. काही बाबतीत माणसापेक्षा हुशार, तर काही बाबतीत एकदमच चूक अशा चॅटजीपीटीच्या युगात ते पटण्यासारखे आहे.

पण फक्त क्षमता आणि कौशल्ये तपासून व्यापक बुद्धिमत्ता ठरवता येईल का? की माणसाची बरोबरी करण्यासाठी त्यापलीकडे काही हवे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

डॉ. मेघश्री दळवी                                                                                                            

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org                        

संकेतस्थळ : http://www.mavipa.org