आपल्या देशात पूर्वी चलन म्हणून सोन्याच्या मोहरा वापरल्या गेल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. पुढे पुढे चलन म्हणून चांदीची नाणी प्रचलित झाली. पण फार पुरातन काळापासून ते आजतागायत सोन्याचा उपयोग दागिने तयार करण्यासाठी मात्र केला जातो. दागदागिन्यांच्या क्षेत्रात सोन्याला एवढं महत्त्व असण्यामागे त्याचे ‘गुण’ आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वात पहिला गुण म्हणजे त्याचं सोनेरी तेज! दुसरी गोष्ट म्हणजे सोनं, त्याच्यापेक्षा कमी किमतीच्या बऱ्याचशा धातूंबरोबर अगदी बेमालूमपणे मिसळतं. म्हणजे तांबं किंवा जस्त यांच्याबरोबर सोन्याचं संमिश्र तयार करता येतं. आणि तरीही त्याचं तेज बऱ्याच अंशी अबाधित राहतं. सोन्याचा आणखी एक गुणधर्म म्हणजे त्याच्यावर हवेचा किंवा आद्र्रतेचा काहीही परिणाम होत नाही. म्हणजेच सोन्याचे दागिने गंजत नाहीत किंवा काळेही पडत नाहीत.

सोन्याचा आणखी एक खूप महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे त्याची लवचीकता! सोनं खूप लवचीक आहे, कारण ते खेचून त्याची तार बनवता येते. तसं बघायला गेलं तर जवळपास सर्वच धातू लवचीक असतात. पण सोनं इतकं लवचीक आहे की एक ग्रॅम सोन्यापासून २३०० मीटर लांब तार (जरी) तयार करता येते. त्यामुळेच तर वस्त्रांवरही सोन्याचं जरीकाम करता येतं किंवा अन्य काही वस्तूंवर सोन्याची कलाकुसर करता येते. त्याचप्रमाणे सर्व धातू ‘वर्धनीय’ असतात. सोनं याही बाबतीत इतरांपेक्षा थोडं उजवं आहे. सोनं इतकं वर्धनीय आहे की, ठोकून त्याचा अक्षरश: अर्धपारदर्शक पत्रा तयार करता येतो. अशा अतिशय पातळ आणि मुलायम पत्र्याचा उपयोगही दागदागिन्यांसाठी केला जातो.

सोनं आणखी एक लाखमोलाचं काम करतं. पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी सोन्याचे कण वापरतात. काही वेळा कारखान्यातून सोडल्या जाणाऱ्या रसायनांमुळे पाणी प्रदूषित होतं. अशा पाण्यातली घातक द्रव्यं काढून टाकण्याची किंवा त्यांचा परिणाम कमी करण्याची कामगिरी, सोनं आणि पॅलॅडिअमचे सूक्ष्म कण बजावू शकतात. तसंच, संधिवाताची दुखणी कमी करण्यासाठी ‘सोनं’ असलेली इंजेक्शन्स दिली जातात.

एका वर्षांत सोनं कुठे आणि किती प्रमाणात वापरल जातं याचा एके काळी अभ्यास केला गेला होता. तेव्हा दागदागिन्यांसाठी ६२.५ टक्के, इलेक्ट्रॉनिक्समध्ये ५ टक्के, दंतवैद्यकात ५ टक्के, इतर उत्पादनांमध्ये ५ टक्के (यामध्ये सुवर्णपदकांचाही समावेश होतो) आणि आर्थिक गुंतवणुकीत ७.५ टक्के अशा प्रकारे सोन्याचा विनियोग होत असल्याचं आढळलं होतं.

डॉ. मानसी राजाध्यक्ष मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interesting facts about gold
First published on: 27-09-2018 at 00:50 IST