जांभा पाषाण पृथ्वीवर अनेक ठिकाणी सापडत असला, तरी हा एक वेगळा पाषाण म्हणून भूविज्ञानाला त्याची ओळख पटली ती भारतातच. ही गोष्ट खूप जुनी, म्हणजे १८०७ या वर्षांतील आहे. एक वेगळा पाषाण म्हणून त्याची नोंद करणाऱ्या संशोधकाचे नाव होते फ्रान्सिस ब्यूकानन-हॅमिल्टन. एप्रिल १८०० मध्ये या स्कॉटिश सर्वेक्षकाने आत्ताच्या तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळच्या काही भागाचे सर्वेक्षण केले. सुमारे चार हजार किलोमीटर अंतर कापत, या भागातील सर्वेक्षणाच्या त्यांनी तपशीलवार नोंदी ठेवल्या. खरे तर  फ्रान्सिस ब्यूकानन-हॅमिल्टन ईस्ट इंडिया कंपनीत डॉक्टर होते. पण वैद्यकीय ज्ञानाबरोबरच त्यांना वनस्पतीविज्ञान, प्राणीविज्ञान आणि भूविज्ञान या निसर्गविज्ञानांमध्ये उत्तम गती होती.

ईस्ट इंडिया कंपनीची १७९९ मध्ये टिपू सुलतान यांच्याबरोबर जी निर्णायक लढाई झाली, त्यात ४ मे १७९९ रोजी टिपू सुलतान मारले गेले. ती लढाई ईस्ट इंडिया कंपनीने जिंकली आणि म्हैसूर प्रांत कंपनी सरकारच्या ताब्यात गेला. त्यावेळी कंपनी सरकारने फ्रान्सिस ब्यूकानन-हॅमिल्टन यांची ख्याती लक्षात घेऊन त्यांना दक्षिण भारताच्या नैसर्गिक संपत्तीचे सर्वेक्षण करण्याचे काम सोपवले. या सर्वेक्षणातून केरळमध्ये काही ठिकाणी भूपृष्ठालगत एक लालसर रंगाचा, मऊसर पाषाण आढळतो, असे त्यांच्या निदर्शनास आले. सुरुंग न लावताच त्याचे खाणकाम करता येते, केवळ लोखंडांच्या हत्यारांनी त्याचे सुबक चिरे पडतात, आणि खाणीतून वर काढल्यानंतर हवेच्या संपर्कात आल्यानंतर ते चिरे मजबूत होतात, हेही त्यांच्या लक्षात आले. केरळमध्ये याच चिऱ्यांचा उपयोग करून घरे बांधायचा प्रघात फार जुना आहे, याची त्यांनी नोंद घेतली. केरळमधील अंगाडीपुरम या गावाच्या अवतीभवती त्यांनी ही निरीक्षणे केली.

विटेसारख्या दिसणाऱ्या आणि विटेप्रमाणेच घरे बांधण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या या खडकाला काहीतरी अर्थपूर्ण नाव देण्याची गरज होती. तेव्हा वीट या अर्थाच्या ‘लॅटेर’ या लॅटिन शब्दावरून ब्यूकानन-हॅमिल्टन यांनी त्या खडकाला ‘लॅटेराइट’ असे नाव दिले.

१९७९ यावर्षी ११ ते १४ डिसेंबर रोजी भारतात ‘जांभा पाषाण निर्मितीविषयी आंतरराष्ट्रीय परिसंवाद’ (इंटरनॅशनल सेमिनार ऑन लॅटेरिटाइजेशन प्रोसेस) आयोजित केला होता. त्यानिमित्ताने भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या विभागाने  केरळमधील अंगाडीपुरम या गावी जांभ्या पाषाणाच्या (लॅटेराइटच्या)  ‘शोधा’ची स्मृती साजरी करण्यासाठी जांभ्या पाषाणाचे (लॅटेराइटचे) चिरे वापरूनच स्मृतिस्तंभ बांधला आहे. भारतातील राष्ट्रीय भूवैज्ञानिक स्मारकांपैकी हा एक असून यावर हिंदी, इंग्रजी, मल्याळी आणि तमिळ भाषेत शिलालेख आहे.

– डॉ. कांतिमती कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org