डॉ. रंजन केळकर

पूर्वीच्या काळी सागरी हवामानाच्या नोंदी व्यापारी जहाजांवरून केल्या जात असत. त्यामुळे व्यापारी जहाजांना जेथून ये-जा करायची गरज नव्हती अशा विस्तृत समुद्री प्रदेशांवर हवामानाच्या नोंदी होऊ शकल्या नाहीत. १९६० साली उपग्रहांद्वारे संपूर्ण पृथ्वीचे निरीक्षण होऊ लागल्यानंतरच जगातील सर्व समुद्रांच्या हवामानाची माहिती नियमितपणे मिळू लागली. ही माहितीसुद्धा एका अर्थी मर्यादित राहिली कारण उपग्रहांना केवळ समुद्राचा पृष्ठभाग दिसतो, खोलवरचे थर दिसत नाहीत.

अलीकडच्या काळात सागरी हवामानाचे जागच्या जागी मोजमाप करण्याचे तंत्रज्ञान खूपच विकसित झाले आहे. सागरी हवामानाचे मोजमाप करणारी उपकरणे एका तरंगत्या प्लॅटफॉर्मवर बसवली जातात. ही उपकरणे बॅटरीवर किंवा सौर ऊर्जेवर चालतात आणि त्यांच्या नोंदी उपग्रहांमार्फत प्रक्षेपित होतात. मूर्ड बॉइजमध्ये हा ‘प्लॅटफॉर्म’ एकाच जागी राहावा म्हणून तो समुद्राच्या तळात रोवलेल्या एका दोरीने बांधला जातो. ड्रिफ्टिंग बॉइजमध्ये समुद्रावर तरंगणारा प्लॅटफॉर्म सागरी प्रवाहांबरोबर वाहत जातो. फ्लोटमधील उपकरणे एका लहानशा नळीत ठेवली जातात जी समुद्रात २ किलोमीटर खोल राहते. सागरी तापमानाबरोबर सागरी लवणता आणि दाबदेखील ही उपकरणे मोजतात. फ्लोट दर १० दिवसांनी वर येतो आणि नोंदलेली माहिती उपग्रहांमार्फत प्रक्षेपित करतो. फ्लोट सागरी प्रवाहाबरोबर जागा बदलत असल्याने सागरी प्रवाहांची माहिती मिळवता येते. 

चक्रीवादळांच्या निर्मितीचे आणि त्यांच्या पुढील प्रवासाचे अचूक पूर्वानुमान करण्यासाठी सागरी तापमान, समुद्रावर वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा आणि त्यांचा वेग जाणणे महत्त्वाचे असते. तसेच त्सुनामीची पूर्वसूचना देण्यासाठी समुद्रावर उसळणाऱ्या लाटांविषयीची माहिती अत्यंत गरजेची असते. अशा प्रकारची माहिती व्यापारी जहाजांवरून मिळत नाही कारण ती स्वत:च्या सुरक्षेसाठी वादळी स्थितीपासून दूर निघून जातात. समुद्राच्या वरच्या थरातील लवणतेच्या नोंदी सागरी प्रक्रिया समजून घेण्यासाठी महत्त्वाच्या असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरावरील डेटा बॉइज आणि फ्लोट्स यांचे प्रस्थापन करणे, त्यांना सुस्थितीत ठेवणे, त्यांच्या नोंदी उपलब्ध करून देणे, हे सर्व एक मोठे काम आहे. ते चेन्नई येथील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी’ ही संस्था करते. भारताभोवतीच्या समुद्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांच्या अंतर्गत सुमारे २० फिरत्या बॉइज, ३० स्थानबद्ध बॉइज आणि ४० फ्लोट्स सध्या कार्यरत आहेत.