डॉ. किशोर कुलकर्णी
सागरावरील आणखी काही माहितीपटांची ओळख आजच्या लघुलेखातून करून घेऊ या.. सुमारे चार वर्षे हिंडून महासागरांच्या वेगवेगळय़ा २० ठिकाणी चित्रीकरण करून प्लास्टिकने महासागराला कसा घातक विळखा घातला आहे, हे ‘प्लॅस्टिक ओशन’ चित्रपटातून दाखवले आहे. त्याचबरोबर हा धोका कसा कमी करता येईल याचे उपायही दर्शवण्यात आले आहेत. सागर वाचवण्याचे मार्ग स्पष्ट करण्यात दिग्दर्शक क्रेग लीसन यशस्वी झाले आहेत.
‘एंड ऑफ द लाइन’ हा लघुपट रूपर्ट मरे यांनी बनवला असून सागरी जीवांशिवाय सागर कसे दिसतील? कसे वाटतील? पृथ्वीवासीयांना सागरी अन्न मिळाले नाही तर? सागरातील रंगीबेरंगी आणि विविध सजीव दिसेनासे झाले तर काय? अशाच इतर काही गोष्टींचा अभाव निर्माण झाला तर माणूस काय करेल? हे प्रश्न या लघुचित्रपटातून दर्शवण्यात आले आहेत.
‘मिशन ब्ल्यू’ या लघुपटातून सिल्विया अर्ल या सागरी अभ्यासकाने सागर आणि सागरी जीव कसे संरक्षित केले जावेत, प्रमाणाबाहेर मासेमारी का करू नये, प्लास्टिक तसेच इतर घनकचरा सागरात गेल्याने कसे दुष्परिणाम होतात, त्याचबरोबर हवामान बदलामुळे महासागर कोणत्या समस्येतून जात आहेत, भविष्यात त्यांची काय स्थिती असेल यांचे सुरेख चित्रण केले आहे. हा चित्रपट २०१५ चा ‘अॅमी पारितोषिक’ विजेता आहे. पॉल वॉट्सन हा ‘ग्रीनपीस आणि सी शेफर्ड’चा संस्थापक असून ४० वर्षांपेक्षा जास्त काळ त्याने सागर संरक्षणाच्या प्रयत्नात घालवला आहे. समुद्री जीवांची कत्तल आणि अवैध मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध त्याने मोहिमा काढल्या आहेत. त्याचे व त्याने राबविलेल्या मोहिमांची सुरेख माहिती ‘वॉटसन’ लघुपटातून देण्यात आली आहे.
‘चेसिंग कोरल’ हा लघुपट जेफ ओर्लोव्हॉस्कीने दिग्दर्शित केला असून छायाचित्रकार, पाणबुडे आणि वैज्ञानिक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून निर्माण करण्यात आला आहे. कोरल किंवा प्रवाळ हे समुद्रातील वर्षांवन समजले जातात. मात्र ते नष्ट करताना माणूस हे विसरतो. माणसाच्या विविध क्रियाकलाप आणि वातावरण बदल यांमुळे प्रवाळांची संख्या कमी होत चालली आहे, त्यामुळे सागरी पर्यावरणावर, जलचरांच्या अधिवासावर अनिष्ट परिणाम होत आहेत, हे त्यातून दाखवण्यात आले आहे.