लिथियमचा सर्वात महत्त्वपूर्ण वापर विद्युतघटात (बॅटरीत) करण्यात येतो. मोबाइल फोन प्रभारित (चाìजग) करणं म्हणजे दैनंदिन जीवनातील आवश्यक बाब झाली आहे. तशा वेगवेगळ्या पण ठराविक मूलद्रव्यांचे विद्युतघट वापरात आहेत त्यापैकीच एक आपण वापरतो ते लिथियम आयन पॉलिमर विद्युतघट. मोबाइल फोन, लॅपटॉप, डिजिटल कॅमेरे, विजेवर चालणाऱ्या मोटारी यांमध्ये पुन:पुन्हा प्रभारित करता येणाऱ्या विद्युतघटात लिथियम आयन वापरतात. लिथियमच्या अणूतील एक इलेक्ट्रॉन सहजरीत्या गमावला जाऊन लिथियम आयन तयार होतो. प्रभाररहित होताना इलेक्ट्रॉन लिथियमच्या विद्युत अपघटनी (आयनयुक्त) संयुगातून धनाग्राकडून (अॅनोड) ऋणाग्राकडे (कॅथोड) जातात. प्रभारित होताना या उलट प्रक्रिया होते. घडय़ाळे, खेळणी इत्यादी वस्तूंमध्ये बटणासारखे चपटे विद्युतघट असतात. यात लिथियम धातू वापरलेला असतो आणि ते विद्युतघट पुन्हा प्रभारित करता येत नाहीत.
लिथियम आयन पॉलिमर विद्युतघट असलेल्या मोबाइल फोन आणि इतर विद्युत उपकरणांचा वापर वाढल्याने, लिथियम आता दुर्मीळ मूलद्रव्य झाले आहे. आज पृथ्वीवर उपलब्ध साठा अंदाजे फक्त २५ वर्षे पुरेल. त्यासाठी लिथियम आयन विद्युतघटाला पर्याय शोधण्याची गरज आहे. यासंबंधाने संशोधन सुरू आहे. लिथियम-अॅल्युमिनियम यांची संमिश्रे वजनाला हलकी पण मजबूत असल्याने विमाने, चिलखते, सायकली आणि वेगवान रेल्वे यांचे भाग तयार करण्यासाठी वापरतात. संयुगांच्या स्वरूपात लिथियमचे विविध उपयोग आहेत. जगभरातील काच व सिरॅमिक उद्योगात सिलिका वितळविण्यासाठी, सिलिकाचा वितळिबदू (मेिल्टग पॉइंट) खाली आणण्यासाठी आणि वस्तूंना झिलई (चकाकी) देण्यासाठी लिथियम ऑक्साइड वापरतात. लिथियमपासून उच्च तापमानाला वापरण्यात येणारी वंगणेदेखील बनवितात. लिथियम हायड्रॉक्साइड आणि चरबी एकत्र तापविली असता लिथियम स्टिअरेट (लिथियम सोप) बनतो. हा सोप वंगणांमध्ये वापरतात. तसेच लिथियम हायड्रॉक्साइड हे संयुग हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेते त्यामुळे अवकाश यान आणि पाणबुडय़ांमध्ये ते वापरले जाते. नराश्यावर उपचारासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांमध्ये लिथियम काबरेनेटचा वापर करतात.
लिथियमच्या ज्वलनामुळे भडक किरमिजी रंगाची ज्योत निर्माण होत असल्यामुळे शोभेची दारू, तसेच लष्करासाठी लागणारी स्फोटके यांसाठी लिथियमच्या संयुगांचा वापर केला जातो. अणुभट्टीमध्ये अणुसम्मीलन प्रक्रियेत न्युट्रॉन शोषून घेण्यासाठी लिथियम वापरतात. लिथियम धातू क्षरणकारी (corrosive) आणि अतिक्रियाशील असल्यामुळे त्वचेला इजा होऊ शकते; म्हणून तो काळजीपूर्वक हाताळतात.