चक्रीवादळे, अतिवृष्टी, ढगफुटी, बर्फाचे जलद वितळणे, त्सुनामी यांसारख्या नैसर्गिक घटनांमुळे पूर येतो. गेल्या काही वर्षांत मानवनिर्मित हवामान बदलांमुळे पूर येण्याची वारंवारिता वाढत आहे. पुरांमुळे होणारे जैविक, भौतिक व आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी पुरांचा अचूक अंदाज मांडणे अत्यंत गरजेचे असते. आता त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होऊ लागला आहे.

पुरांचा अंदाज व्यक्त करण्याच्या प्रचलित पद्धती नदी किंवा सागरकिनारी उपलब्ध असणाऱ्या पर्जन्यमापकांवर अवलंबून असल्याने त्याला मर्यादा आहेत. जागतिक पूर नियंत्रण प्रणाली (ग्लोबल फ्लड मॉनिटरिंग) ही पर्जान्यमापके, पाण्याची पातळी मोजणारी यंत्रणा, उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा, विजांची निरीक्षणे व आगाऊ इशारा देणारी प्रणाली, रडार, जलवैज्ञानिक प्रारूपे, पुरांच्या शक्यतेच्या जागांचे नकाशे, हवामानाचा अंदाज, भूतकाळातील पुरांची माहिती असणारी विदा, पुरांचा आगाऊ इशारा देणारी यंत्रणा यांद्वारे मिळवलेल्या विदेचे विश्लेषण करून जगभरातील पुरांचे अंदाज तयार करते व पुरांचे सतत निरीक्षण करत राहते. ही प्रणाली पूर्णपणे स्वयंचलित आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यंत्रशिक्षणाच्या विविध प्रकारच्या गणनविधी वापरल्या जातात. यामध्ये कृत्रिम चेतासंस्थेचे जाळे, सपोर्ट व्हेक्टर मशीन, वेव्हलेट न्युरल नेटवर्क आणि मल्टीलेअर परसेप्ट्रॉन या गणनविधींचा व समस्या सोडवणारे फजी लॉजिक यांचा विशेष उपयोग केला जातो.

कुतूहल : वणव्यांच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता

प्रचलित प्रणाली पुरांचा अंदाज फक्त एक दिवस आधी देते तर कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रणाली पाच दिवस आधी देते, त्यामुळे ती प्रचलित प्रणालीपेक्षा सरस ठरली आहे. गूगलच्या संशोधन विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पुराच्या सात दिवस आधी अंदाज देणाऱ्या प्रारूपामध्ये दोन प्रकारची प्रारूपे एकत्र केलेली आहेत. एक प्रारूप संभाव्य पुराच्या पाण्याचे प्रमाण दर्शवते, तर दुसरे पुराचा धोका असलेला परिसर आणि पाण्याची अत्युच्च पातळी दर्शवते. या अंदाजाची माहिती जागतिक स्तरावर उपलब्ध असते. भारताचा केंद्रीय जल आयोग व गूगल यांच्यात २०१८ साली झालेल्या परस्पर सहकार्याच्या करारानुसार जल आयोगाने पुरवलेल्या विदेचा वापर करून गूगल कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे भारताला पुरांचे अचूक अंदाज देते. आसाममधील कचार जिल्ह्याच्या प्रशासनाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पुराच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जनता, संरक्षण विभाग आणि प्रशासन यामध्ये संपर्काची मजबूत यंत्रणा तयार केली आहे.

अनघा शिराळकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : http://www.mavipa.org