कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित क्लारा इंडरनॅक (केआय) हे अत्यंत प्रगत असे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने बनवलेले साधन न्यूजरूममध्ये उपयोगात आणले जात आहे. क्लारा हे अत्याधुनिक व प्रभावी साधन असून, खूप प्रमाणात शोधकार्य करून योग्य शब्दांची निवड करते त्यामुळे ते प्रभावी व आशयघन वाक्यरचना करते. हे करताना उपलब्ध माहितीतून केवळ उपयुक्त माहितीच अत्यंत परिश्रमाने परंतु तात्काळ निवडते. क्रिकेट, फुटबॉल किंवा हॉकीसारख्या गतिमान खेळांचे धावते वर्णन करताना ते खूपच उपयुक्त आहे. खेळ गतिमान असल्यामुळे धावते वर्णन करताना आयत्याक्षणी योग्य व चपखल शब्द सुचवते. तसेच ही पद्धत वृत्तपत्रीय आणि वैचारिक लेखनासाठीही अत्यंत उपयुक्त आहे असे अनेक पत्रकारांना वाटते. क्लाराने निर्माण केलेल्या लेखांचे/ लेखनाचे मानवी संपादकांनी नेटके संपादन केल्यास बातमीतील एकसंधता आणि खरेपणा शोधता व अजमावता येतो. या मानव- यंत्र दुकलीच्या ताळमेळामुळे पत्रकारितेतील पारंपरिक मूल्ये अबाधित ठेवता येतात आणि हेच क्लाराचे वैशिष्ट्य आहे. काही पत्रकारांनी तर एकमुखाने या साधनाला पाठिंबा दिला आहे.

काही ठिकाणी असा विचार मांडला जातो की वाचकवर्ग खरोखरच कृत्रिम बुद्धिमत्तानिर्मित लेखांना किंवा लेखनाला नाइलाजाने मान्यता देतात की त्याला प्राधान्य देतात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. एका सर्वेक्षणाने असे दर्शवले आहे की वाचकांच्या लक्षातही येत नाही की हे लिखाण यंत्रांनी निर्माण केलेले आहे की मानवलिखित? असेही आढळून आले आहे की अनेक कंपन्या, एआय आधारित मजकूर असेल तर ‘‘एआय साधन वापरून लेख किंवा माहिती निर्माण केली आहे. जो कोणी या माहितीचा वापर करेल तो त्याला जबाबदार असेल’’ असे लिहून जबाबदारी झटकतात. यंत्रनिर्मित लेखांचे आम्ही समर्थन करत नाहीत असेही ते सांगतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक कृत्रिम बुद्धिमत्ता निगडित कंपन्या माध्यमांच्या पुराभिलेख किंवा संग्रहांत स्वारस्य दाखवत आहेत. त्या संग्रहांत असलेल्या विदेचा उपयोग करून विशाल भाषा प्रारूप ते प्रशिक्षित करू इच्छितात. ज्यांच्याकडे माहितीचे मोठमोठे स्राोत आहेत त्या संस्थांनाही आता असे वाटत आहे की संग्रहातील माहिती (विदा) या कंपन्यांना दिल्यामुळे फायदाच होईल. कारण या पद्धतीने निर्माण केलेली साहित्यकृती दर्जेदार असेल. पण यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता विरुद्ध मानवी बुद्धिमत्ता यात सरस कोण? हा प्रश्न निर्माण होईल का अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.