सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील साखरवाडी या जेमतेम दोन-तीन हजार लोकसंख्येच्या गावात शालेय व उच्च महाविद्यालयीन शिक्षण. ‘सामान्य विद्यार्थी’ हे बिरुद मागे लागलेले, स्वत:च्या मर्यादा ओळखून, त्यावर जिद्दीने मात करून, देशातील ‘विद्या-वाचस्पती (पीएच. डी.) ही पदवी, जोडीला परदेशातील दोन प्रतिष्ठित

संस्थांतून प्राप्त केलेल्या पदव्युत्तर पदविका, विक्री व विपणन क्षेत्रात विक्रेता म्हणून केलेली पहिली नोकरी आणि निसर्ग इतिहासातील एक उत्तम संशोधन संस्था असलेल्या ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएनएचएस) या संस्थेचे संचालक.. ही वाटचाल आहे डॉ. दीपक आपटे यांची.

पुण्यात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण न जमल्यामुळे ते साखरवाडीत परत आले. पुढे जगातील पन्नासहून अधिक देशांत विषयतज्ज्ञ म्हणून दौरे केले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये शिक्षणाधिकारी म्हणून कामाला सुरुवात करताना आरशासमोर उभं राहून विद्यार्थ्यांना माहिती देण्याचा सराव करणारे

डॉ. आपटे पुढे हजारो संशोधक व शासनकर्त्यांना सहज संबोधन करू लागले. लक्षद्वीप प्रवाळबेटांसंदर्भात त्यांनी केलेले कार्य एकमेवाद्वितीय आहे.

बीएनएचएस ही संस्था डॉ. सलीम अली यांनी नावारूपाला आणली. पक्षीविज्ञान हा संस्थेचा मुख्य विषय. तिथे सागरी जैवविविधता, सागरी किनारा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास व पर्यावरण रक्षण-संवर्धन अशा विषयांवर दीर्घकालीन व प्रायोजित प्रकल्प रुजवणे, हे महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी दिले. बीएनएचएस संस्थेत शिक्षणाधिकारी, प्रकल्पप्रमुख, मुख्य शास्त्रज्ञ, साहाय्यक संचालक, उपसंचालक, संचालक असा प्रवास त्यांनी अडीच दशकांत केला. 

त्यांची भारतीय समुद्री शिंपले व स्लग्ज (गोगलगायी) यांवरील पुस्तके ‘संदर्भकोश’ गणली जातात. ‘सृष्टी कन्झर्वेशन फाऊंडेशन’ या २०२१ साली स्थापन केलेल्या संस्थेमार्फत डॉ. आपटे अधिक प्रभावीपणे निसर्गसंवर्धनाचे काम करत आहेत. एका छोटय़ाशा गावातून येऊन त्यांनी पर्यावरण क्षेत्रात दिलेले योगदान वाखाणण्याजोगे आहे. 

– डॉ. प्रसाद कर्णिक

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org