सामान्यांना माहीत असलेली बुरशी, म्हणजे कवक. या कवकातून एक खास विकर स्रावते. त्याचे नाव केरॅटिनेज. विकर हा रसायन प्रकार आहे. विकरे कमी ऊर्जा खर्चून, जास्तीत जास्त ३७-३८ अंश सेल्सिअस या शरीर तापमानाला वेगाने रासायनिक क्रिया घडवून आणतात. थंड रक्ताच्या प्राण्यांत, वनस्पतींत ३७-३८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी शरीर तापमानालाही वेगाने रासायनिक क्रिया घडवतात.

केराटिनेसेस सहसा एस्परजिलस, क्रायसोस्पोरियम, ट्रायकोफायटन आणि मायक्रोस्पोरमसारख्या वेगवेगळ्या बुरशीजन्य प्रजातींद्वारे स्रावित होणारे बाह्यपेशीय प्रेरकविकर आहे. ते विविध उद्याोगांमध्ये व्यापक प्रमाणात वापरले जाते. हे प्रथिनांचे खंडन करणारे प्रोटिएज वर्गातील विकर आहे. कारखान्यात याचा विविध प्रक्रियांसाठी वापर केला जातो. विविध जिवाणू प्रजातीदेखील केराटिनेसेस तयार करतात. यात बॅसिलस, विब्रिओ, सुडोमोनास, मायक्रोबॅक्टेरियम, ह्रोडोकोकस या प्रजातींचा समावेश होतो. केरॅटिनेज या विकरामुळे केरॅटिनमधील गंधकयुक्त बंध तुटतात. मग अन्य प्रथिन पाचक विकरे केरॅटिनमधील घटकद्रव्ये अलग करण्यात मदत करतात. ते घटक नंतर वेगवेगळ्या जलभूरासायनिक चक्रांत प्रवेश करतात.

जगात सर्वात मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या तीन बहुवारिकांपैकी (पॉलिमर्सपैकी) एक रेणू आहे झ्र केरॅटिन! केरॅटिन हे तंतुमय, रचनात्मक, संरक्षक प्रथिन कोठे आढळते ते बघू या. केरॅटिन माणसांच्या नखांत, केसांत, कातडीच्या वरच्या मेलेल्या पेशींच्या थरात असते. इतर प्राण्यांच्या लोकरीत, शिंगांत, खुरांत असते. पक्ष्यांची पिसे, चोची, खवले यात असते. साप, सरडे, कासवे, मगरी यांच्या खवल्यांतही केरॅटिन असते.

वेळोवेळी आपले केस गळतात. कातडीच्या थरातील कोंडा निघून जात असतो. शिवाय आपण नखे, केस कापतो. पक्ष्यांची पिसे गळतात. जगभर केरॅटिनचा टनावारी कचरा रोज जमा होतो. केरॅटिन प्रथिन जलरोधी आहे. सामान्य तापमानाला केरॅटिन विरघळवू शकेल अशी द्रावके निसर्गात विरळाच! पेप्सिन, ट्रिप्सिनसारखी विकरेही, सहजासहजी केरॅटिन पचवू शकत नाहीत. पण केरॅटिनेज विकरे केरॅटिनचे रेणू फोडू शकतात. साप, अजगर केरॅटिन पचवू शकत नाहीत. ते भक्ष्य अख्खे गिळतात. खाल्लेल्या प्राण्याचे, बरेचसे भाग अन्नमार्गात पचतात. पण खाल्लेल्या प्राण्यांचे केस, खूर हे केरॅटिनयुक्त भाग पचवण्यास लागणारी केरॅटिनेज विकरे अजगरांत बनत नाहीत. हे केस, खूर अजगरांच्या विष्ठेतून बाहेर पडतात.

केरॅटिनेज विकरे मुरुमांच्या आणि भोवऱ्यांच्या उपचारात वापरली जातात. आपले शरीरापासून अलग झालेले केस विघटित व्हायला, कुजून मातीत मिसळायला सुमारे दोन वर्षे लागतात. केरॅटिनेज विकरे नसतील तर कचऱ्याची जगड्व्याळ समस्या निर्माण होईल.

नारायण वाडदेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org