पृथ्वीवरील विविध वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांच्यामुळे अतिशय समृद्ध अशी जैवविविधता येथे कित्येक शतके दिसून येत होती. मानवाने निर्माण केलेली पिके आणि गाई-गुरे यांच्या विविध प्रजाती हा देखील जैवविविधतेचा भागच! त्याचप्रमाणे सर्व परिसंस्था उदा. जंगले, वाळवंटे, जलाशय इत्यादी देखील जैवविविधतेची रेलचेल दाखवतात. या सर्व सजीवांत आणि मानवात परस्परसंबंध घडत राहतात. मानवाचे अस्तित्व जैवविविधतेवरच अवलंबून असते, उदा. तीन अब्ज लोकांसाठी  पुरवठा होणाऱ्या प्रथिनांचा २० टक्के भाग मासे पुरवतात तर ८० टक्के मानवी आहार हा वनस्पतींवर अवलंबून असतो. जैवविविधता ही मानवी संस्कृतीचा आधारस्तंभ असून देखील तिचा खूप मोठय़ा प्रमाणात आणि अतिशय वेगाने ऱ्हास होत चाललेला आहे. या ऱ्हासामुळे विविध प्रकारचे प्राणिजन्य रोग पसरत चालले आहेत, हे शास्त्रीय सत्य आहे. भविष्यकाळातील मानवी पिढय़ांसाठी जैवविविधता सुरक्षित असणे, अतिशय महत्त्वाचे आहे, हे समाजाला कळावे, या हेतूने संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने दरवर्षी २२ मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन’ साजरा केला जातो. सुरुवातीला १९९३ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने (जनरल असेंब्ली) सर्वप्रथम २९ डिसेंबर रोजी जैवविविधता दिनाचा ठराव संमत केला आणि त्याच दिवशी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा करण्याचे ठरवले. परंतु त्यानंतर  डिसेंबर २००० साली, २२ मे हा दिवस यासाठी निश्चित करण्यात आला, कारण २२ मे १९९२ रोजी ‘रिओ  परिषदेत’ जैवविविधतेच्या संकल्पनेवर ठराव करण्यात आला होता. २२ मे रोजी जागतिक स्तरावर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक देशांत राष्ट्रीय पातळीवर तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रम मसुद्यानुसार ठिकठिकाणी कार्यक्रम राबवले जातात. यात स्थानिक पातळीवर जैवविविधतेसंदर्भात भाषांतरित पुस्तिका देणे; शैक्षणिक साधने तयार करणे; शाळा, कॉलेज, विद्यापीठ, वर्तमानपत्र, रेडिओ, दूरदर्शन अशा ठिकाणी  जैवविविधतेची माहिती प्रसारित करणे, विविध प्रदर्शनांचे आणि परिषदा, सेमिनार अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे अशा उपक्रमांचा समावेश असतो. यामुळे विद्यार्थी, व्यावसायिक आणि सामान्य जनतेला पर्यावरणाच्या समस्यांची माहिती मिळते. संकटग्रस्त प्रजाती आणि अधिवासांचे संरक्षण व संवर्धन करण्यासंदर्भात जनजागृती केली जाते. झाडे लावून जमिनीची धूप थांबवण्यासारख्या उपाययोजनाही केल्या जातात. जैवविविधता दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवले जातात.

– डॉ. नंदिनी विनय देशमुख

मराठी विज्ञान परिषद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org