यंत्रमानवशास्त्राच्या मदतीने मानव शेकडो वर्षे जिवंत राहू शकेल, ही भविष्यवाणी आहे प्रख्यात ब्रिटिश सायबरनेटिक्स संशोधक केविन वॉरविक यांची! केविन वॉरविक हे कोव्हेंट्री विद्यापीठाचे उप-कुलगुरू आहेत. त्यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. संगणक प्रणाली आणि मानवी मज्जासंस्था यांच्यातील थेट संवाद (इंटरफेस) अभ्यासासाठी ते ओळखले जातात. वॉरविक यांना सुरुवातीपासून यांत्रिक मेंदू, यांत्रिक बुद्धिमत्ता, शरीरात यंत्रे बसवून क्षमता वाढवलेले सायबोर्ग, मानवी मेंदू आणि यंत्रे यांच्यातील थेट संवादावर संशोधन करणाऱ्या सायबरनेटिक्स क्षेत्रात रस होता. त्यांनी १९९८ मध्ये आपल्या स्वत:च्या शरीरात एक इलेक्ट्रॉनिक चिप बसवली. या चिपमुळे वॉरविक यांना संगणकाच्या माध्यमातून विविध कार्ये नियंत्रित करण्याची क्षमता प्राप्त झाली. अशी चिप बसवणारे ते पहिले मानव! या प्रयोगामुळे मानव-यंत्र संवादक्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा संभव दिसू लागला. वॉरविक यांचे हे प्रयोग यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या संशोधनात महत्त्वाचे ठरले. ज्यामुळे मानव आणि यंत्र यांमधील समन्वयाचे आणि एकात्मतेचे नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाले.

एका प्रकल्पात त्यांनी ‘रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन’ (आरएफआयडी) चिप आपल्या हातात बसवून संगणक, दारे आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे नियंत्रित करून दाखवली. तसेच आपल्या मेंदूला अंतर्चिप जोडून मेंदूच्या संदेशातून यंत्रमानवाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रयोगांमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाच्या वापराला नवा दृष्टिकोन मिळाला. कृत्रिम बुद्धिमत्तेत संगणक प्रणालींना मानवाप्रमाणे बुद्धिमत्ता प्राप्त करणे, डेटा विश्लेषण, निर्णय घेणे आणि शिकणे यांसारख्या क्षमतांचा समावेश असतो; तीच तत्त्वे वॉरविकनी त्यांच्या प्रयोगांत प्रभावीपणे वापरली. त्यांनी मानव आणि यंत्रांतील समन्वय सुधारण्यासाठी केलेल्या प्रयोगांमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाला आधार मिळाला.

यंत्र-माणूस संवाद : इलेक्ट्रॉनिक चिप्सचा वापर करून यंत्र आणि मानव यांच्यातील संवाद सुधारला जातो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणालींना संवाद सुधारण्याच्या तत्त्वांमुळे अधिक सुसंगत बनवता येते, हे वॉरविक यांनी दाखवले.

संगणक नियंत्रण: वॉरविकच्या प्रयोगांनी यंत्राला अधिक योग्य रीतीने नियंत्रित करण्याचे मार्ग मिळाले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात यंत्राला अधिक समजून घेण्यास आणि निर्णय घेण्यास हे तंत्रज्ञान मदत करते.

मानव-संगणक संवाद: वॉरविकच्या कामामुळे यंत्राबरोबर मानवी संवादाचे अधिक सुसंगत आणि नैसर्गिक तंत्र तयार झाले, ज्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणालींना मानवी भावनांचे आणि वर्तनाचे अधिक अचूक विश्लेषण करण्यास मदत होते.

केविन वॉरविकच्या कामाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात अनेक नवीन विचारधारांना जन्म दिला आणि संशोधक, विद्यार्थ्यांना नवनवीन दृष्टिकोनांतून अभ्यास करण्यासाठी प्रेरित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चारुशीला स. जुईकर,मराठी विज्ञान परिषद