अंटाक्र्टिकावर लाल रंगाचा बर्फ आढळून आला आहे. ही बर्फ पृष्ठभागावर झालेली एकपेशीय लाल रंगाच्या शैवालाची वाढ आहे. लाल रंगाची शैवाले ही इतर शैवालांप्रमाणेच बर्फाळ प्रदेशात, ओलसर जमिनीवर किंवा समुद्राच्या, नद्यांच्या, तलावांच्या पाण्यातही दृष्टीस पडतात. शैवाल हे मिलिमीटरच्या हजाराव्या भागांइतकी सूक्ष्म आकाराची एकपेशीय किंवा काही मीटर लांबीची बहुपेशीयसुद्धा असू शकतात. आपल्या वातावरणातील प्राणवायूचा मोठा भाग हा या शैवालांकडून पुरवला जातो. तसेच ही शैवाले म्हणजे इतर अनेक सजीवांचा आहारही आहेत. या शैवालांचे पृथ्वीवरील जीवनचक्रातील महत्त्व मोठे आहे. बहुसंख्य शैवालांना असणारा हिरवा रंग हा अर्थातच त्यांच्यातील हरितद्रव्यामुळे येतो. हे हरितद्रव्य प्रकाशसंश्लेषणाद्वारे कार्बन डायऑक्साइडचे विशिष्ट प्रकारच्या साखरेच्या रेणूंत रूपांतर करण्यात मुख्य भूमिका बजावते. याच जैवरासायनिक क्रियेतून प्राणवायूची म्हणजेच ऑक्सिजनचीही निर्मिती होते. लाल रंग धारण करणाऱ्या शैवालांकडे हरितद्रव्य ‘सी’ आणि ‘डी’सुद्धा असते. मात्र त्यांचा लाल रंग हा त्यांच्याकडील कॅरॉटेनॉइड या सेंद्रिय रसायनामुळे येतो. हे कॅरॉटेनॉइड, शैवालातील हरितद्रव्याचे संरक्षण करते. सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांचा या हरितद्रव्यावर विपरीत परिणाम होऊ  नये म्हणून काही प्रजातींची शैवाले कॅरॉटेनॉइडसारख्या द्रव्याची निर्मिती करतात. हे कॅरॉटेनॉइड अतिनील किरणांचा काही भाग शोषून घेतात. बर्फात वाढणाऱ्या लाल शैवालाच्या काही कॅरॉटेनॉइडयुक्त प्रजातींमुळे तिथला बर्फ लाल दिसायला लागतो. त्यामुळे या लाल शैवालांची अतिवाढ ही हवामानाच्या दृष्टीने घातक ठरण्याची शक्यता आहे. बर्फाच्या लाल रंगाला कारणीभूत ठरणारी क्लॅमिडोमोनास निवालिस (Chlamydomonas nivalis) आणि रॅफिडोनेमा (Raphidonema), या लाल शैवाल प्रजातींचा हवामानाशी असलेला थेट संबंध दिसून आला आहे. या सूक्ष्मजीवातील एस्टाक्झानथिन हा लाल रंगद्रव जास्तीच्या सूर्यप्रकाशाचे रूपांतर उष्णतेत करतो. हे शैवाल माणसासाठी विषारी असते. लाल रंगांच्या शैवालांकडून कॅरॉटेनॉइडची निर्मिती ही जरी स्वसंरक्षणासाठी होत असली तरी, या शैवालांचे वाढलेले प्रमाण उलट स्वरूपाचे परिणामही घडवू शकते. पांढरा शुभ्र बर्फ हा सूर्यकिरण मोठय़ा प्रमाणात परावर्तित करतो. याउलट, लाल रंगाचा बर्फ सूर्यप्रकाश मोठय़ा प्रमाणात शोषून घेतो. या लाल शैवालांच्या अस्तित्वामुळे बर्फाची प्रकाश परावर्तित करण्याची क्षमता २० टक्क्य़ांपर्यंत कमी होत असल्याचे आढळले आहे. प्रकाश अधिक प्रमाणात शोषला जात असल्यामुळे, लाल रंगाचा बर्फ तापमानवाढीस कारणीभूत ठरत असल्याचे शास्रज्ञांना आढळून आले आहे.

– डॉ. रंजन गर्गे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org