मराठी भाषेत विज्ञानकथांचा जोमदार प्रवाह आहे. इतर कोणत्याही भारतीय भाषेत विज्ञानकथालेखन फारसं झालेलं आढळत नाही. श्री. बा. रानडे यांनी १९१३ मध्ये लिहिलेली ‘तारेचे हास्य’ ही मराठीतील पहिली विज्ञानकथा मानली जात असली तरी विज्ञानकथांना खरा बहर आला तो विसाव्या शतकाच्या अखेरच्या काळात. पण गेल्या पाऊणशे वर्षांमध्ये या साहित्यप्रवाहाने उत्क्रांतीचे टप्पे वेगाने ओलांडत आज विज्ञानतंत्रज्ञानाच्या विविध नवआयामांतून माणसाच्या जीवनाच्या अनेक अंगावर पडणाऱ्या इष्टानिष्ट प्रभावांचे चित्रण करण्यास सुरुवात केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आविष्काराचाही विचार होणे क्रमप्राप्तच होते. त्या तंत्रज्ञानाच्या नियंत्रणमुक्त वापराविषयी वाचकाला सजग करण्याचे धोरणच प्रामुख्याने विज्ञानकथाकारांनी अवलंबले आहे.
हेही वाचा >>> कुतूहल : सुष्ट की दुष्ट
डीपफेक हा आजचा एक ज्वलंत विषय झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचेच ते एक देणे आहे. त्याचा आपले अनैतिक हेतू साध्य करण्यासाठी कसा गैरवापर होऊ शकतो याकडे सुबोध जावडेकर आणि डॉ. बाळ फोंडके यांनी आपल्या कथांमधून वाचकाचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्या वेळी डीपफेक ही संकल्पना अजूनही संशोधन विकासाच्या स्तरावर होती त्या काळातच या कथा लिहिल्या गेल्या. विज्ञानकथा या भविष्यातील वास्तवाची प्रखर जाणीव करून देतात याचाच प्रत्यय या कथांमधून येतो. डीपफेकच्या पैलूंमधून कथाबीज साकारल्यानंतर त्याचा विकास कथामाध्यमातून केला गेला आहे.
वास्तविक डीपफेकचे काही विधायक उपयोगही आहेत. पण त्या प्रणालीचा बहुतांश वापर व्यक्तीचे अश्लील चित्रण करून त्याला बदनाम करण्याची धमकी देत खंडणी उकळण्यासाठीच केला जात आहे. राजकीय हेतू साध्य करण्यासाठीही त्याचा वापर होत आहे. या संभाव्यतांचा धोका प्रभावीपणे दाखवत विज्ञानकथा वाचकांना जागरूक करत आहेत.
हेही वाचा >>> कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेची गंगोत्री
कृत्रिम बुद्धिमत्तेचा सढळ वापर झाल्यास अनेकांचा रोजगार हुकण्याची समस्या निर्माण होण्याच्या शक्यतेचा उच्चार आज अनेक विचारवंत करत आहेत. माहितीतंत्रज्ञान क्षेत्रात अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता तर आहेच, पण या तंत्रज्ञानाचा वापर करत चालकविरहित मोटारी तयार होऊ लागल्या आहेत. घरात साफसफाई करण्यासाठीचे यंत्रमानवही बनवले जात आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विज्ञानकथा यांचे हे हितकारी नाते निर्माण झाले आहे.
– डॉ. बाळ फोंडके
मराठी विज्ञान परिषद
ई-मेल: office@mavipa.org
संकेतस्थळ: http://www.mavipa.org