कारखान्यात वापरले जाणारे औद्योगिक यंत्रमानव एकच एक काम सतत न दमता २४ तास करू शकतात किंवा त्यासाठीच ते तयार केले जातात. उदाहरणार्थ असेम्ब्ली लाइनवरून येणाऱ्या प्रत्येक सॉसच्या बाटलीला झाकण लावणे किंवा झाकणावरचा एखादा स्क्रू घट्ट करणे इ. कामे हे यंत्रमानव अतिशय जलदपणे आणि अचूक करतात. या सर्व आज्ञा एक प्रोग्रॅम म्हणून त्यांच्यातल्या नियंत्रकात साठवल्या जातात. या प्रोग्रॅमची चाचणी झाल्यावर तो यंत्रमानव शिकतो आणि प्रत्येक वेळी प्रोग्रॅम सुरू केल्यावर तो आपल्या हालचाली विशिष्ट क्रमानेच करत राहतो.

सुरुवातीला कारखान्यातले यंत्रमानव एकाच जागी स्थिर असत. पण कालांतराने त्यांना हालचाल करण्याची गरज वाटू लागली. यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यंत्रमानव शास्त्रामध्ये होऊ लागला. उदाहरणार्थ एखाद्या यंत्रमानवाला खडबडीत पृष्ठभागावरून जायचं असेल तर त्याच्या पायांची हालचाल कशा प्रकारे व्हावी हे ठरवण्यासाठी प्रथम कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो. त्यासाठी आधी पायाच्या रचनेची सर्व माहिती यंत्रमानवामध्ये साठवावी लागते. त्यांच्या वाटेत अडथळा आला तर ते कळावे म्हणून संगणक दृष्टीचा वापर केला जातो. यासाठी यंत्रमानवामध्ये कॅमेरे बसवलेले असतात. हे कॅमेरे डोळ्यांसारखे काम करतात. याला ‘स्टिरीओ व्हिजन’ असेही म्हटले जाते. यामुळे यंत्रमानवाला एखाद्या जागेची लांबी, रुंदी आणि खोली किती असेल याचा अंदाज येऊ शकतो.

हेही वाचा >>> कुतूहल: यंत्रमानवाची वाटचाल

कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपल्या मेंदूत जसे न्युरॉन्सचे जाळे असते तसे जाळे आपल्याला यंत्रमानवाकडून काम करून घेताना त्यांच्यातल्या संगणकात कृत्रिमरीत्या निर्माण करावे लागते. त्यांना ‘कृत्रिम न्युरल नेटवर्क’ असे म्हणतात. या नेटवर्क्समुळे भाषांतर करणे, चेहरा ओळखणे यासारख्या अनेक गोष्टी शिकता येतात. यालाच मशीन लर्निंग असेही म्हणतात. न्युरॉनच्या पातळ्यांची संख्या खूप वाढली की त्याला सखोल शिक्षण ‘डीप लर्निंग’ म्हणतात. सखोल शिक्षणामुळे यंत्रमानव चित्रे किंवा प्रतिमाही ओळखू शकतात. यासाठी त्यांच्या कंट्रोलर्समध्ये ‘‘डीप लर्निंग सॉफ्टवेअर’’ असावे लागते.

आज माणसांच्या बरोबर काम करणारे ‘कोलॅबरेटिव्ह’ यंत्रमानव निघाले आहेत. यांना ‘कोबॉट’ म्हटलं जातं. ज्या प्रकारच्या कामात माणसांना यंत्रमानवासोबत काम करावे लागते अशा ठिकाणी हे कोबॉट वापरले जातात. कोबॉट्सना माणसांसारखा सभोवतालचा अंदाज घेता येतो आणि जर काही आकस्मिक धोका निर्माण झाला तर काम थांबवताही येते. हे यंत्रमानव वापरण्यास अतिशय सोपे असल्यामुळे त्यांच्याकडून काम करवून घेणे कामगारांना सहज शक्य होते. निरनिराळ्या प्रकारच्या औद्याोगिक यंत्रमानवांमुळे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे कारखान्यांमधील काम आता सोपे आणि बरेच निर्धोक झाले आहे, हे मात्र नक्की.

– प्रा. माधवी ठाकूरदेसाई

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : http://www.mavipa.org