पहिल्या औद्योगिक क्रांतीचा उगम ग्रेट ब्रिटनमध्ये झाला तर दुसरी औद्योगिक क्रांती मुख्यत्वेकरून ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, इटली आणि जपान या देशांमध्ये सुरू झाली. १८७० ते १९१४, म्हणजे अमेरिकन यादवी युद्ध संपण्याच्या सुमारापासून ते पहिले महायुद्ध सुरू होण्याच्या सुमाराचा हा काळ इतिहासकारांच्या मते दुसऱ्या क्रांतीचा काळ आहे. पण इथे एक लक्षात घ्यायला हवे की दुसऱ्या क्रांतीची काही बीजे पहिल्या क्रांतीच्या काळात किंवा दोन क्रांतींमधील काळात रुजली होती.

दुसरी औद्योगिक क्रांती ही तंत्रज्ञानाधारित क्रांती होती असे मानले जाते. विशेषत: पोलाद, वीजनिर्मिती आणि रसायन या तीन क्षेत्रांनी या काळात फार मोठी झेप घेतली. पोलादनिर्मितीमधील नवनवीन तंत्रांमुळे पोलादाचे उत्पादन झपाटयाने होऊ लागले आणि किंमतही कमी झाली. त्यामुळे ज्या ज्या क्षेत्रांमध्ये पोलादाचा वापर होत होता त्या सर्व क्षेत्रांमध्ये एकदम तेजी आली. उदाहरणार्थ, दोन क्षेत्रे म्हणजे रेल्वे आणि जहाजबांधणी. रेल्वेचे मोठे जाळे निर्माण झाले. तसेच पोलादाच्या वापराने मोठमोठी आणि वेगवान जहाजे बांधणे सुकर झाले. त्यामुळे जशी प्रवासी वाहतूक वाढली तशीच उत्पादित मालाला प्रचंड मोठी बाजारपेठ निर्माण झाली आणि त्यामुळे उत्पादकता आणि उत्पादन या दोन्हींत प्रचंड वाढ झाली.

हेही वाचा >>> कुतूहल: वाफेच्या ‘कृत्रिम शक्ती’मुळे पहिली औद्योगिक क्रांती

विद्युतनिर्मिती आणि पारेषणामध्ये सुधारणा झाल्यामुळे विजेचा वापर विविध क्षेत्रांमध्ये होऊ लागला. त्यातील एकदम नवीन अस्तित्वात आलेली क्षेत्रे म्हणजे तारायंत्राच्या साहाय्याने संदेशवहन (टेलिग्राफी), दूरध्वनी (टेलिफोन) आणि रेडिओ ही होत. यामुळे माहितीची देवाणघेवाण आणि संदेशवहन यांच्यात आमूलाग्र बदल झाला. तसाच आणखी एक महत्त्वाचा बदल घडला १८७९मधील विजेच्या दिव्याच्या शोधाने.

दुसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या काळात रसायननिर्मितीमध्ये घोडदौडच सुरू झाली. विविध कृत्रिम रसायने, रासायनिक खते, कृत्रिम रंगद्रव्ये, स्फोटके, अ‍ॅस्पिरीनसारखी औषधी द्रव्ये अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठया प्रमाणावर शोध लागले आणि उत्पादनात मोठी वाढ झाली. रसायन क्षेत्रातील या काळातील एक सर्वात महत्त्वाचा आणि मानवी जीवनशैलीवर दूरगामी परिणाम करणारा शोध म्हणजे १९०७ मधील प्लास्टिकचा शोध. त्या वेळी आणि अगदी आतापर्यंत वरदान वाटणारा आणि आता प्रदूषणाच्या भस्मासुराचा मोठा भाग असणारा हा शोध.

दुसऱ्या औद्योगिक क्रांतीमुळे समाजव्यवस्थेत मोठे बदल झाले. लोकांचे शहरांकडे मोठया प्रमाणावर स्थलांतर झाले, शहरे ही रोजगाराची आणि अर्थव्यवस्थेची केंद्रे झाली आणि शहरीकरणाच्या भेडसावणाऱ्या समस्यांची सुरुवात झाली.

– शशिकांत धारणे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org