बाळकृष्ण गंगाधर देशपांडे या महाराष्ट्रीय भूवैज्ञानिकाचे नाव ‘तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ’ या संस्थेत आजही मोठ्या आदराने घेतले जाते. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्यांनी भूवैज्ञानिक म्हणून आपली कारकीर्द ‘भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या विभागातून सुरू केली. सध्या पाकिस्तानात असणाऱ्या सिंध आणि बलुचिस्तान प्रांतातल्या पाषाणस्तरांच्या सर्वेक्षणाची कामगिरी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यानंतर छत्तीसगडच्या भिलई पोलाद प्रकल्पासाठी लोहखनिजाच्या साठ्याचा शोध घेण्याचे कामही त्यांनी केले. तसेच अहिल्यानगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांमधील पाण्याचा तुटवडा असणाऱ्या भागांमधल्या भूजलशोध प्रकल्पातही ते कार्यरत होते.

१९४८ मध्ये भारतीय खनिकर्म कार्यालयाची (इंडियन ब्यूरो ऑफ माइन्स) स्थापना झाली आणि त्यांची नियुक्ती त्या कार्यालयात झाली. सात वर्षे त्यांनी त्या विभागात कार्य केले. पुढे १९५६ मधे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे अन्वेषण (एक्स्प्लोरेशन), विकास आणि उत्पादन यांच्यासाठी ‘तेल आणि नैसर्गिक वायू आयोगा’ची (ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन) स्थापना झाली. (आता त्याचे नाव ‘तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ’ असे झाले आहे.) भूविज्ञानाशी संबंधित असणाऱ्या शासनाच्या विविध आस्थापनांमधून काही भूवैज्ञानिकांची या नवीन आयोगासाठी निवड केली गेली. त्यात देशपांडे यांची निवड झाली. ‘मुंबई हाय’ नावाने ओळखली जाणारी अरबी समुद्रातली भूवैज्ञानिक संरचना, खंबायतचे आखात आणि आसाम इथल्या तेलक्षेत्रांच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

१९७० साली तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळातून ते ‘भूवैज्ञानिक सेवा प्रमुख’ (चीफ ऑफ जिऑलॉजिकल सर्व्हिसेस) या पदावरून निवृत्त झाले. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूविज्ञान विभागात ‘विभागप्रमुख’ या पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तिथे पाच वर्षे सेवा केल्यानंतर टांझानियातील दार-ए-सलाम विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. टांझानियात असताना त्या देशाच्या जलसंसाधनाच्या विकासात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले.

त्यानंतरही अभ्यास सुरू ठेवून त्यांनी भूकंप या विषयाचा विशेष अभ्यास केला. प्राण्यांची संवेदनक्षमता जास्त चांगली असल्याने भूकंप होणार असल्याची प्राण्यांना चाहूल लागते, त्यामुळे प्राणी अस्वस्थ होतात. त्यांच्या वर्तनात अचानक फरक पडतो. त्यावरून भूकंप होणार असल्याचा अंदाज आपण बांधू शकतो का, यावर त्यांनी ‘अर्थक्वेक्स, अॅनिमल्स अँड मॅन’ (भूकंप, प्राणी आणि माणूस) हे पुस्तक १९८७ मध्ये लिहिले. किल्लारी आणि कोयना या भागात फिरून व्याख्याने देऊन जनजागृतीही केली. या व्यासंगी भूवैज्ञानिकाचे २५ जानेवारी २००१ रोजी पुण्यामध्ये निधन झाले.

डॉ. शिल्पा शरद पाटील, मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : http://www.mavipa.org