– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

सोविएत रशियाच्या रेड आर्मीने १९३९ साली जपानने केलेल्या आक्रमणापासून आऊटर मंगोलियाचा बचाव केला, परंतु इनर म्हणजे दक्षिण मंगोलियाचा ताबा जपानकडे राहिला. पुढे १९४५ मध्ये आणखी एक सोव्हिएत-जपान युद्ध झाले आणि जपानचा पराभव होऊन इनर मंगोलिया जपान्यांच्या ताब्यातून सोडविण्यात रशिया यशस्वी झाला. १९४९ मध्ये चीनमध्ये माओ झेडांगचे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना सत्तेवर आले आणि त्याला कम्युनिस्ट मंगोलियन पीपल्स रिपब्लिकने मान्यता दिली. त्यानंतर चीनमधील माओच्या नवीन सरकारनेही मंगोलियाच्या सरकारला त्वरित मान्यता दिली. यानंतर १९६१ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने मंगोलियाला त्यांचे सदस्यत्व दिले. याच काळात रशिया-मंगोलिया-चीन या तीन देशांना जोडणारी रेल्वे सुरू झाली. १९९१ मध्ये सोव्हिएत युनियनचा अस्त झाला. त्यापूर्वी रशियात चाललेल्या राजकीय घडामोडींचा मंगोलियन राजकारणावर मोठा प्रभाव पडला. सोव्हिएत युनियन बरखास्त झाल्यावर मंगोलियन प्रजासत्ताक सरकारमधील सर्व कम्युनिस्टधार्जिण्या नेत्यांविरोधात निदर्शने होऊन त्यांच्या संसद सदस्यत्वाचा सक्तीने राजीनामा घेतला गेला आणि बहुपक्षीय संसदीय निवडणूक घेण्यात आली. यामध्ये बिगर कम्युनिस्ट लोकशाही पक्ष ७६ पैकी ७१ जागा जिंकून सत्तेवर आला. अध्यक्षीय निवडणुकीत बागाबांदी हे विजयी झाले. १९९२ पूर्वी मंगोलियाचे नाव पीपल्स रिपब्लिक ऑफ मंगोलिया असे होते ते आता केवळ रिपब्लिक ऑफ मंगोलिया झाले आहे. सध्या येथे अध्यक्षीय लोकशाही प्रजासत्ताक राज्यव्यवस्था असून एकल सभागृह असलेल्या येथील संसदेला ग्रेट खुराल म्हटले जाते.

सध्याच्या स्वतंत्र मंगोलियाला त्यांचे प्रबळ शेजारी रशिया आणि चीन या देशांकडून मोठी मदत मिळते आणि त्यामुळे मंगोलियन सरकारला त्यांच्याशी संबंध नेहमीच जपावे लागतात. मंगोलियन अर्थव्यवस्था या दोन महासत्तांच्या मदतीने सुरळीत चालू आहे. यांचे निर्यातीतून मिळणारे ९० टक्के उत्पन्न चीनबरोबर होणाऱ्या व्यापारातून मिळते. मंगोलियाची विद्युत आणि इतर ऊर्जाची गरज रशिया भागवते तसेच येथील बहुतांश लोक शेती आणि पशुपालन व्यवसायात असले तरी येथील खाणींमधून मिळणाऱ्या तांबे, दगडी कोळसा, टिन या खनिजांच्या निर्यातीतूनही अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतो.