शालेय विद्यार्थ्यांच्या आवडत्या खेळांसंबंधी केलेल्या सर्वेक्षणाची सामग्री आलेखात दाखवली, तर तात्काळ आवडत्या खेळांची क्रमवारी कळते. त्यानुसार शाळेला खेळांचे साहित्य खरेदी करता येते. संख्याशास्त्राचे मुख्य कामच आहे संख्यात्मक, गुणात्मक व मिश्रित आधारसामग्री अर्थपूर्णरीत्या सादर करून निष्कर्ष काढणे. संख्याशास्त्रज्ञ जटिल सामग्री प्रकारानुसार व मागणीनुसार वेगवेगळ्या आलेखांमध्ये दृश्यरूपात मांडून तिची ठळक वैशिष्ट्ये दाखवतात. भविष्यात घडू शकणाऱ्या काही घटनांचा त्यामुळे काही वेळा अंदाज येतो. त्यानुसार योग्य धोरणे आणि योजना आखून शासकीय प्रणालीत सुधारणा आणणे, कंपनीच्या उत्पादनाची विक्री वाढवणे, प्रकल्प-प्रगतीचा पाठपुरावा करणे अशा अनेक बाबतींत उपयोग होतो. आलेख म्हणजे सामग्रीचे प्रतिनिधित्व करणारी आकृती. आलेखांचे मुख्यत: रेषालेख (लाइनग्राफ), दंडिकालेख (बारग्राफ), स्तंभालेख (हिस्टोग्राम), वृत्तालेख (पायग्राफ), विकीर्णतालेख (स्कॅटरप्लॉट) हे प्रकार वापरले जातात. त्यांपैकी काही आलेखांची चर्चा करू…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार्टेशियन निर्देशक प्रणालीमधील रेषालेख संख्याशास्त्रात बहुउपयोगी असतात. उदा. तापमानातील बदल, पीक उत्पादनाचा कल, खनिज उत्पादन दर्शवण्यासाठी ते उपयोगी असतात. काळानुसार अखंडित बदलणारी सामग्री असेल तर रेषालेख वापरतात. सलग काही वर्षांमध्ये कंपनीची वार्षिक विक्री दर्शवण्यासाठी आडव्या क्ष-अक्षावर वर्षे असतात आणि उभ्या य-अक्षावर अवलंबित चल (विक्री) असतो. तुलनात्मक रेषालेखात एकापेक्षा जास्त विविध रंगांतील किंवा एकसंध, तुटक अशा वेगवेगळ्या रेषांनी आरेखन केले जाते. उदा. अनेक राज्यांतील किंवा देशांतील पीक उत्पादनाची तुलना अशा प्रकारे प्रभावीपणे मांडता येते. एकच प्रवर्ग असलेल्या गुणात्मक सामग्रीतील तुलना सहजरीत्या करण्यासाठी दंडिकालेखात प्रत्येक प्रकारासाठी एक दंडिका (उभी/आडवी) असते आणि दंडिकांमध्ये अंतर असते. त्यामुळे विक्रीचे आकडे, उत्पादन, लोकसंख्या, काळ आणि वारंवारता यांत तुलना होऊ शकते. मुंबईतील मासिक पर्जन्यमानाची तुलना करण्यासाठी क्ष-अक्षावर महिने आणि य-अक्षावर पर्जन्यमान (मि.मी.) असा दंडिकालेख काढतात. बहुल-दंडिकालेख दोन किंवा अधिक संचांतील सामग्रीची तुलना करण्यासाठी असतो. यातील दंडिका एकमेकांना जोडलेल्या असतात. मुंबई आणि पुणे येथील मासिक पर्जन्यमानात तुलना करण्यासाठी क्ष-अक्षावर महिने आणि मुंबई-पुण्यासाठी जोड-दंडिका आणि य-अक्षावर पर्जन्यमान (मि.मी.) असा दंडिकालेख काढतात. एकावर एक रचित (स्टॅक्ड) दंडिकालेख दोन किंवा अधिक संचांतील (उदा. आंध्र, कर्नाटक, आसाम), दोन किंवा अधिक बाबींमध्ये (उदा. चहा, कॉफी, साखर) तुलना करण्यासाठी वापरतात. दंडिका एकावर एक रचल्यामुळे एका दृष्टिक्षेपात तुलना करता येते. आलेख रेखाटनासाठी अनेक संगणक सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत, मात्र आलेखांची मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. – निशा पाटील

 

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nature of statistical graphs akp
First published on: 17-06-2021 at 00:05 IST