कुतूहल – नेटवर्किंग

नेटवर्किंगचे तसे पाहिले तर महत्त्व हे सर्वच उद्योग-व्यवसायांत बघावयास मिळते.

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल.. या अभंगाबद्दल अगदी लहानपणापासून अपूर्वाई वाटायची. संत नामदेव महाराज हे संत साहित्यातील अग्रणी. घुमान साहित्य संमेलनाने त्यांचे कार्य पुन्हा एकदा देशासमोर आले. ही रचना जरी आध्यात्मिक तरीही जीवनाच्या सार्थकतेची प्रक्रिया विशद करणारी. संपूर्ण रचना ऐकल्यावर लक्षात येते की ही आधुनिक काळात आपण ज्याला ‘नेटवर्किंग’ म्हणतो त्याचेच महत्त्व येथे अधोरेखित होतेय. अगदी बेमालूमपणे. अगदी जवळच्या नात्यांपासून सुरुवात करत.
नेटवर्किंगचे तसे पाहिले तर महत्त्व हे सर्वच उद्योग-व्यवसायांत बघावयास मिळते. मात्र टेक्सटाइल हा तौलनिकदृष्टय़ा जरा मानवी शक्ती जास्त वापरणारा आणि त्यामुळे व्यक्तींचे परस्परसंबंधही बरेच जास्त असणारा उद्योग आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. त्यामुळेच की काय नेटवर्किंगची महती अगदी खूपच. सर्वच स्तरांवर. आपसांतील संवाद आणि मागोवा अगदी सततच. मग ते अंतर्गत असो अथवा बाहेरील घटकांकडून.
यशस्वी मार्केटिंगचे बरेचसे श्रेय हे अशा प्रकारे नेटवर्किंगला जाते असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. विक्रीची साखळी सांभाळणाऱ्या पार्टनरांशी सुसंवाद हा हवाच. पण त्याचबरोबर उत्पादन करणाऱ्या विविध खात्यांशीही सुस्पष्ट संवाद हवा. या सुसंवादातूनच योग्य दर्जाच्या उत्पादनाची निर्मिती होते. बाजारपेठेची दर्जाबाबत अपेक्षा सतत जाणून घेत निर्मिती व्यवस्थापनास कळवणे आवश्यक असते. अशा सुसंवादातून नवनवीन प्रकारच्या कापडाची निर्मिती होते. सुसंवादाने वस्त्रनिर्मिती प्रक्रियेतील सर्व घटकांचे विधायक सहकार्य लाभू शकते. अगदी मनापासून. मग हा संवाद तोंडी असो अथवा लेखी. माध्यमेही आस्थापना-आस्थापनांत भिन्न असू शकतील. मात्र खरी गरज असते ती विविध खात्यांना सुसूत्रपणे गुंफण्याची. सहभागी प्रत्येक व्यक्तीस कामाबद्दल आपुलकी वाटण्याची. आणि हे जेव्हा साध्य होते तेव्हा मार्केटिंग संकल्पनेस एक आगळा आयाम मिळतो. टीम वर्कचा.. ज्यात आनंद लाभतो निर्मिती प्रक्रियेतील सर्वाना. आणि विक्रीची साखळी सांभाळणाऱ्या पार्टनर्सना ग्राहकांपर्यंत पोहोचायला. बहुधा हाच तो संत नामदेव महाराजांना अभिप्रेत असणारा परमोच्च बिंदू. ‘नामा म्हणे मज विठ्ठल सापडला’. ग्राहक देवतेच्या प्रसन्नतेचा क्षण. उद्योग-व्यवसायास भरभराटीस नेणारा!
सुनील गणपुले (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – सुरगाणा राज्यकारभार
१८१९ मध्ये सुरगाणा शासक मल्हारराव याच्या सन्याने सुरतकडे जाणाऱ्या ब्रिटिश सनिकांवर हल्ला करून लूटमार केली. त्यामुळे कंपनी सरकारने मल्हाररावास कैद करून त्याला फाशी दिली आणि त्याचा पुतण्या भिकाजी यास गादीवर बसविले. पण हे पसंत न पडल्याने मल्हाररावाच्या आईने पिलाजी या नातेवाईकास भिकाजीवर पाठवून त्याचा खून करविला. कंपनी सरकारने त्यावर फौज पाठवून पिलाजी आणि त्याच्या पाच साथीदारांना अटक करून पेठ येथे सर्वाना फाशी दिले. ब्रिटिशांनी भिकाजीचा दहा वर्षांचा मुलगा यशवंतराव याला गादीवर बसवून रिजंट दिला. १८५४ साली यशवंतरावच्या मृत्यूनंतर देशमुख घराण्याच्या वंशजांच्या दोन शाखांमध्ये वारसा हक्कावरून वाद सुरू झाला. ब्रिटिशांनी त्यात हस्तक्षेप करून रविराव याला राजेपद देऊन मोरावला महसुलाचा काही हिस्सा दिला. १८५७च्या स्वातंत्र्य समरात सुरगाणा आणि शेजारच्या पेठ शासकांनी ब्रिटिशांविरुद्ध गुप्तपणे मदत केली. ही मदत करताना पेठच्या राजांना ब्रिटिशांनी पकडले व त्यांना फाशी दिले. परंतु सुरगाणा राजांविरुद्ध प्रत्यक्ष पुरावा हाती न आल्याने त्यांच्याविरुद्ध काही कारवाई झाली नाही. सुरगाणा संस्थानात महसूल, शेतसारा आकारण्याची पद्धत वेगळी होती. दोन बल आणि एक नांगर असलेल्या औतबंदी पद्धतीने महसूल वसुली गेली जाई. मानेवर वळ असलेले दोन बल व नांगर यांनी किती जमीन नांगरली, किती पीक आले याचा हिशेब सारा आकारणीसाठी ठेवला जात नसे. राज्यात फौजदारी गन्ह्य़ात फटक्यांची शिक्षा दिली जाई. सुरगाणा संस्थानातील बहुसंख्य प्रजा कुणबी, आदिवासी होती. विद्यार्थ्यांअभावी शाळा बंद पडलेल्या असत. देवी-कांजिण्यासारख्या आजारांवर औषध घेण्यास लोकांचा नकार असे. १९व्या शतकाच्या अखेरीपासून सुरगाणा शासकांनी पवार हे आडनाव लावले. सुरगाण्याचे शेवटचे अधिकृत राजे धर्यशीलराव पवार यांची कारकीर्द इ.स. १९३६ ते १९४७ अशी झाली. १९४८ साली सुरगाणा संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Networking