सागर हा मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. शिवाय सागरातील जलचरांचे महत्त्व मानवासाठी अनन्यसाधारण आहे. महासागर हा अन्नाचे मोठा स्रोत आहे. विविध प्रकारचे सागरी प्राणी जगभर अन्न म्हणून खाल्ले जातात. सागरी अन्नाद्वारे मानवाची प्रथिनांची गरज फार मोठय़ा प्रमाणात भागविली जाते. भारतीय किनाऱ्यांवर मुबलक असणारे मृदुकाय प्राणी, शिंपले, खेकडे, झिंगे, शेवंडे, नळ-माकूळ, यांसारखे अपृष्ठवंशीय प्राणी देशाला मोठय़ा प्रमाणात परकीय चलन मिळवून देतात. सागरी पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये विविध माशांच्या प्रजाती आणि सस्तन प्राणी व्हेल, डॉल्फिन, सील इत्यादींचा समावेश होतो. यापैकी माशांच्या खाद्य प्रजाती प्राणीजन्य प्रथिनांचा आहारात मोठय़ा प्रमाणात पुरवठा करतात.

आपल्या देशात पूर्वापार मत्स्यव्यवसाय ही एक संस्कृती म्हणून अधोरेखित झाली आहे. आताच्या काळात मासेमारीसाठी यांत्रिक बोटी व जाळी यांचा वापर केला जातो. मत्स्यविज्ञान या नवीन शास्त्र शाखेत सतत संशोधन केले जात आहे. माशांचा नियमित पुरवठा व्हावा यासाठी मत्स्यशेतीच्या तंत्रज्ञानाने माशांची पैदास केली जाते. काही माशांपासून फिश लिव्हर तेल मिळविले जाते. तर अनेक जलचरांपासून मानवासाठी जीवनावश्यक औषधे तयार केली जातात. शार्क, टय़ुना, वाम, सुरमई, रावस, तारल्या, बांगडे, पापलेट, हलवा यांसारखे मासे खाद्यान्न म्हणून मोठय़ा प्रमाणात वापरले जातात. शिंपल्यांपासून पर्ल कल्चर तंत्राने उत्तम प्रतीचे मोतीही मिळविले जातात.

समुद्रात विविध प्रकारचे सूक्ष्म शैवाल, वनस्पतीप्लवक, प्राणीप्लवक आणि समुद्र तण असते. समुद्रात लाल, तपकिरी व हिरव्या शैवाल प्रजाती मोठय़ा प्रमाणात असतात. त्यांच्यात अधिक प्रमाणात तंतुमय घटक व प्रथिने असतात. म्हणून त्यांचा वापर काही देशांत अन्न म्हणून केला जातो. स्पिरुलिना या शैवालापासून पूरक पोषकद्रव्ये तयार केली जाते. चीन, जपान, कोरिया, आइसलँड व फ्रान्स येथे काही समुद्र तणांचे भाज्या म्हणून सेवन केले जाते. सागराच्या तळाशी असणाऱ्या पॉलिमेंटालिक नोडय़ूल्सपासून मोठय़ा प्रमाणात विविध धातू मिळविता येतात. समुद्र मार्गाचा दळणवळणासाठी उपयोग होतो. सागरापासून मोठय़ा प्रमाणात मीठ मिळते. सागर लाटांपासून वीजनिर्मितीही करता येते. भूतलावरील जलचक्रासाठी सागरांचे योगदान मोठे आहे. त्याचप्रमाणे सागरी सूक्ष्म जीव, वनस्पती व प्राणी यांच्यापासून मानवासाठी अनेक प्रकारची औषधे तयार केली जातात. पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून आता सागरी जलातील क्षार काढून त्याचे पिण्यायोग्य पाणी बनवण्याचे तंत्र काही देशांत वापरले जाऊ लागले आहे. अशी डीसॅलीनेशन उपकरणे आखाती देशांच्या किनाऱ्याने प्रस्थापित केलेली दिसतात.

– प्राचार्य डॉ. किशोर पवार

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org