उमर खय्याम हे मध्ययुगीन काळातले पुढे प्रसिद्धी पावलेले गणितज्ञ, तत्त्वज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, हिजरी पंचांगकार आणि कवी होते. अनेक विषयांचे जाणकार असलेले उमर खय्याम त्यांनी लिहिलेल्या रुबाया या काव्यप्रकारामुळे अधिक लोकप्रिय झाले. पर्शियातील तेहरानजवळील निशापूर येथे १०४८ साली जन्मलेल्या हजरत गियासुद्दीन अल खय्यामी ऊर्फ उमर खय्याम यांचे शिक्षण समरकंद आणि बुखारा येथे झाल्यावर त्यानंतर ते समरकंद येथे स्थायिक होऊन तिथल्या वेधशाळेत एक खगोलशास्त्रज्ञ आणि गणिती म्हणून काम करू लागले. सामाजिक प्रतिष्ठा, कीर्ती आणि संपत्ती यांचे आकर्षण नसलेल्या उमर खय्यामनी वेधशाळेतल्या एकांतातच ज्ञानसाधना करणे पसंत केले. त्यामुळे त्यांच्या हयातीत त्यांचे विविध विषयांवरील साहित्य अज्ञातच राहिले. ११२३ साली त्यांच्या निधनानंतर सहाशे वर्षांनंतर त्यांची हस्तलिखिते जगासमोर आली. उमर खय्याम स्वत: भारतीय गणितशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांनी भारतीय गणितशास्त्रावर लिहिलेल्या ‘अल जब्र’ या हस्तलिखितांचे संकलन ‘अल्जिब्रा’ या नावाने फ्रेंच भाषेत ग्रंथ स्वरूपात झाले. पुढे हा ग्रंथ अनेक भाषांमध्ये भाषांतरित केला गेला. समरकंदचा सुलतान मलिक शहा याने जुन्या हिजरी पंचांगात सुधारणा करण्याची कामगिरी उमर खय्यामवर सोपविली होती. सध्या वापरले जाणारे सुधारित हिजरी पंचांग ही उमर खय्यामचीच निर्मिती आहे. गणित आणि खगोलशास्त्रीय संशोधनाबरोबरच खय्यामने ‘रुबायात’ या फारसी काव्यप्रकारातही मोठी कामगिरी करून ठेवली आहे. इंग्लंडमधील एडवर्ड फिट्झ जेराल्ड या फारसी भाषा जाणणाऱ्या लेखकाने १८५९ साली प्रथम खय्यामच्या रुबाया इंग्रजीत ‘द रुबायात ऑफ उमर खय्याम’ या नावाने ग्रंथ स्वरूपात प्रसिद्ध केल्या. या ग्रंथामुळे खय्यामचा हा अलौकिक काव्यसंग्रह प्रकाशझोतात आला आणि अनेक भाषांतरे होऊन त्याला जागतिक प्रसिद्धी मिळाली. कर्मठ धार्मिक रूढींचा तिटकारा असणाऱ्या खय्यामच्या काव्यात तत्त्वज्ञान आणि सृष्टीचे गूढ उकलणे हे दोन विषय प्रामुख्याने होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

वनस्पतींचे पाणीव्यवस्थापन

जमिनीवरील वनस्पती मुळांद्वारे जमिनीतील पाणी घेतात. झाडांची मुळे जमिनीखाली आपला विस्तार वाढवतात आणि मुळांवर असलेले केशतंतू पाणी व त्यात विरघळलेले क्षार शोषून घेतात.

पाण्याचे परिवहन करण्याची विशिष्ट पद्धत वनस्पतींमध्ये विकसित झालेली आहे. लहान झाडे, झुडपे, आणि मोठमोठाले वृक्ष या सर्वामध्ये पाण्याचे परिवहन अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने होते.

मुळांमध्ये पृष्ठभागावर शोषलेले पाणी त्याच्या मध्यावर असलेल्या संवहनी उतींपर्यंत पेशीद्वारे पोहोचते. मानवी शरीरात रक्ताभिसरणासाठी रक्तवाहिन्यांचे जाळे असते, तसेच झाडांमध्ये संवहनी उतींचे जाळे असते. त्यात जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असे दोन प्रकारच्या उती असतात. जलवाहिन्या मुळातील पाणी झाडाच्या सर्व भागांना पुरवतात. रसवाहिन्या तयार होणाऱ्या अन्नाचे परिवहन करतो. जलवाहिन्यांच्या पेशींच्या भित्तिका लीग्निन या पदार्थाने लिपलेल्या असतात. त्या जाड असल्यामुळे पाण्याचा दाब सहन करण्याची क्षमता त्यांच्यात असते. जलवाहिन्यांचा व्यास लहान असल्याने केशाकर्षण पण पाण्याच्या प्रवाहाला मदत करते.

मोठय़ा वृक्षांमध्ये मुळे खोलवर गेलेली असतात, व झाडांची उंची अगदी ५० ते १०० मीटपर्यंत असू शकते. उदाहरणार्थ निलगिरीचे झाड जास्तीत जास्त ६० मीटपर्यंत वाढते. झाडे पानांवरील छिद्रांद्वारे  पाण्याचे बाष्प वातावरणात सोडतात. या क्रियेला

वनस्पतींचा बाष्पोच्छवास असे म्हणतात. जलवाहिन्यांमधील पाण्याला यामुळे ताण बसतो आणि पाण्याचा प्रवाह मुळांकडून पानांकडे अखंड सुरू राहतो. एखाद्या सक्शन पंपाप्रमाणे हे काम करते. सतत मुळांद्वारे पाणी शोषले जाते व पाणी अखंडपणे झाडात प्रवाहित राहते.

आज जगामध्ये निसर्गामधील घटकांचा अभ्यास करून नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. या शास्त्राला बायोमिमिक्री असे म्हणतात. झाडांच्या निसर्गदत्त संरचनेपासून वैज्ञानिक मानवाचे जीवन सोपे करण्याचा प्रयत्न करत आहेत. झाडांच्या पाणीव्यवस्थापनाचा अभ्यास व त्यामागील तत्त्वांचा अभ्यास करून वास्तुरचनेत काही सुविधा करता येतील का? ज्याप्रकारे झाडे मुळांपासून शेंडय़ांपर्यंत झायलममधून पाण्याचा अखंड प्रवाह ठेवतात तसे बहुमजली इमारतींमध्ये पाणी चढविता येईल का? बहुमजली इमारतींना वपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी सक्शन पंपाचा उपयोग करण्यात येतो. जर भविष्यात ही कल्पना वास्तवात आली तर इमारतींना पाणी पोहोचवण्यासाठी होणारा वीजेवरील खर्च कमी होऊ शकेल.

– डॉ. अर्चना थिटे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Omar khayyam
First published on: 03-10-2016 at 03:55 IST