डॉ. रेणुसिंह-मोकाशी
पेट्री डिश हे सूक्ष्मजीवशास्त्र व पेशी संवर्धनशास्त्रातील एक अत्यावश्यक साधन आहे. ही साधी वाटणारी, पारदर्शक व सपाट तळ असलेली बशी प्रयोगशाळांमध्ये सूक्ष्मजीवसृष्टीच्या निरीक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. जर्मन जिवाणूशास्त्रज्ञ ज्युलियस रिचर्ड पेट्री यांनी १९व्या शतकात रॉबर्ट कॉख यांचा साहाय्यक म्हणून काम करत असताना ही बशी तयार केली. रॉबर्ट कॉखला घन स्वरूपातल्या संवर्धक माध्यमाच्या वापराने जिवाणूंच्या अलग-अलग वसाहती मिळवण्याचा फायदा लक्षात आला. ते पूर्वी द्रवरूप संवर्धन माध्यमे वापरत असत; परंतु त्यातील अडचणी लक्षात घेता कॉख यांच्या निर्देशनानुसार पेट्रीने एक उथळ, गोलाकार, बंद झाकणाची संवर्धक बशी तयार केली. यात घनरूप माध्यम वापरून जिवाणूंच्या अलग-अलग वसाहती मिळवण्याचा फायदा लक्षात आला. या साधनाला सध्या ‘पेट्री डिश’ किंवा ‘पेट्री प्लेट’ म्हणून ओळखले जाते. सुरुवातीला पेट्री डिश बोरोसिलिकेट काचेत बनवली जात असे. ती पुनर्वापरासाठी योग्य होती; मात्र १९६० नंतर प्लास्टिकच्या, एकदाच वापरता येणाऱ्या डिशेस प्रचलित झाल्या.

पेट्री डिशचा मुख्य उपयोग जिवाणू, यीस्ट आणि बुरशी यांसारख्या सूक्ष्मजीवांच्या संवर्धनासाठी केला जातो. यासाठी आगार किंवा आगारोज जेलसारख्या पोषक माध्यमाचा वापर केला जातो, ज्यामध्ये रक्त, क्षार, कार्बोहायड्रेट्स, अमिनो अॅसिड्स, औषधे किंवा रंगद्रव्ये यांचा समावेश असतो. ही डिश फक्त जिवाणूंपुरती मर्यादित नाही; संशोधक, वनस्पती आणि प्राणीपेशीही त्यात वाढवतात आणि त्यांच्या वाढीवर, विभाजनावर व रसायनांच्या परिणामांवर अभ्यास करतात. यामुळे कर्करोगासारख्या रोगांचे ज्ञान वाढते आणि नवीन औषधोपचार विकसित होतात. संशोधनात आता सूक्ष्म ‘ऑर्गनॉइड्स’ म्हणजेच लहान, साधे अंगसदृश नमुने. ही स्टेम पेशींपासून बनलेल्या त्रिमीत स्वयं-सुसंघटित अशा पेशींची वाढ असते. ते एखाद्या अवयवाचे कार्य करतात. हे सूक्ष्म अवयव शरीराचा विकास, रोग आणि औषधोपचार पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी मदत करतात. शालेय शिक्षणातही पेट्री डिश अत्यंत उपयुक्त ठरते. विद्यार्थी प्रत्यक्षात सूक्ष्मजीव वाढताना पाहू शकतात, त्यामुळे सूक्ष्मजीवसृष्टीतील विविधता शिकता येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रगत प्रयोगशाळांमध्ये अद्यायावत उपकरणे असली तरी पेट्री डिशची उपयुक्तता टिकून आहे. तिचा साधेपणा, कमी किंमत आणि बहुपर्यायी वापरामुळे ती जैविक संशोधनाची कोनशिला ठरली आहे. अंतराळ विज्ञानात या पेट्री डिशमध्ये जीवन रुजवण्यात वैज्ञानिकांना यश मिळाले आहे. पेट्री डिशचा शोध जरी साध्या कल्पनेतून झाला असला तरी वैज्ञानिक प्रगतीवर तिचा खोल परिणाम झाला आहे.
डॉ. रेणुसिंह-मोकाशी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org