१९६५ साली आयर्लंडच्या समुद्रात प्लवकांची नोंदणी करणाऱ्या एका उपकरणावर प्लास्टिकची पिशवी गुंडाळली गेली. समुद्राच्या पाण्यात प्लास्टिकचा कचरा आढळण्याची ही पहिली घटना असल्याचे जगभरातील सागरी संशोधकांनी जाहीर केले. अर्थातच तेव्हापासून आजतागायत, दशकानुदशके सातत्याने प्लास्टिकचा कचरा समुद्रामध्ये जात आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार महासागरांमध्ये आजच्या घडीला तब्बल २० कोटी मेट्रिक टन कचरा साठलेला असून प्रतिवर्षी यात जवळपास ३८१ दशलक्ष टन कचऱ्याची भर पडत आहे. सागर किनाऱ्यावर यातील मोठा भाग मासेमारीच्या तुटक्या व निरुपयोगी जाळय़ांचा आहे. प्लास्टिकची जाळी लहानमोठे मासे, समुद्री कासवे, मृदुकाय व संधिपाद प्राण्यांच्या असंख्य प्रजातींच्या शरीराभोवती, कल्ल्यांमध्ये, मानेभोवती, तोंडाभोवती गुंडाळली जाते, अडकते आणि थेट शारीरिक इजा होते.

हेही वाचा >>> कुतूहल : प्लास्टिकचे सागरी प्रदूषण

एका पाहणीद्वारे असे आढळून आले आहे की, १० लाख सागरी पक्षी  आणि एक लाख समुद्रप्राणी दरवर्षी प्लास्टिकमुळे मृत्युमुखी पडतात. सागरी परिसंस्थेतील अन्नजाल व अन्नसाखळीतील असंख्य प्राणी नष्ट होत आहेत. प्रत्येक तीनमागे एका खाद्य प्रजातीतील माशांमध्ये प्लास्टिक आढळले. समुद्रात लाटांचे तडाखे आणि सूर्यप्रकाश यांच्या संपर्कात आल्यामुळे हळूहळू प्लास्टिकच्या बाटल्या अथवा पिशव्यांचे लहान तुकडे होऊन शेवटी त्यांचे अतिसूक्ष्म कणांमध्ये रूपांतर होते. अलीकडच्या काळात समुद्रांमध्ये तयार होणारे ‘अतिसूक्ष्म प्लास्टिक’चे कण सागरी अन्नसाखळीच्या माध्यमातून थेट मानवी शरीरात प्रवेश करून आरोग्याला धोका निर्माण करत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

हेही वाचा >>> कुतूहल : सागरी प्रदूषण किती, कुठे?

२०१४ मध्ये हवाईच्या समुद्रात तळाशी असलेल्या दगडांमध्ये पीव्हीसी आणि पॉलीथिन घट्ट रुतून बसल्याचे आढळले. या दगडांना ‘प्लॅस्टिग्लोमरेट्स’ असे नाव देण्यात आले आहे. कोलकात्याच्या आयसर संस्थेतील सागरी संशोधकांना मे २०२२ मध्ये अंदमानच्या समुद्रात मोठय़ा प्रमाणात असे दगड सापडले आहेत. या दगडांच्या आश्रयाने राहणाऱ्या जीवांना धोका निर्माण झाला आहे. यावर अजून संशोधन सुरू आहे. शेवटी प्लास्टिकच्या या ‘अविनाशी राक्षसाचा’ नायनाट करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. सहज म्हणून सागरात फेकलेला प्लास्टिक कचरा समुद्र तावातावाने बाहेर फेकून देतो हे आपण आजपर्यंत अनेक वेळा किनाऱ्यावर पाहिले आहे. आता तरी या सागराचा आदर केला पाहिजे.

– डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org